महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:07 PM2018-09-19T14:07:53+5:302018-09-19T14:10:14+5:30

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़

After months the police stations have been reconstituted on paper | महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच 

महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच 

ठळक मुद्देपुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ आॅगस्टपासून सुरु झाले़. त्याच्याबरोबरच पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते़ परंतु, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़. 
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पोलीस ठाणी पिंपरी आयुक्तालयात व पुणे शहर पोलीस दलाकडे पुणे शहरातील पोलीस ठाणी अशी रचना ठरविण्यात आली आहे़. त्याचबरोबर परिसरातील भागही दोन्ही पोलीस आयुक्तालयात घेण्याचे निश्चित करण्यात आले़. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चाकण व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणी समाविष्ट करण्यात आली़. मात्र, पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अजूनही लोणी काळभोर आणि लोणीकंद ही पोलीस ठाणी समाविष्ट केली गेली नाही़. 
पूर्वीच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात मुंबई - बंगळुरू महामार्गाचा काही भाग येतो़ या पोलीस ठाण्याची हद्द अगदी पुण्यातील चांदणी चौकापासून सुरु होते़. आधीच हिंजवडीला असलेली वाहतूकीची समस्या पाहता चांदणी चौक परिसरातील नागरिकांना आपल्या समस्यांसाठी थेट हिंजवडी गाठावी लागते़. पुणे शहरात येणारा हा भाग नवीन बाणेर पोलीस ठाण्याची स्थापना करुन त्यात समाविष्ट करावा, असा प्रस्ताव अनेक महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. परंतु, त्याला अजूनही मान्यता मिळाली नाही़. त्यामुळे आजही चांदणी चौक परिसरातील नागरिकांना हिंजवडी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येत आहे़. 
पुणे पोलीस आयुक्तालयाने आपल्या कडील पोलीस ठाण्यांची रचना करताना चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हे परिमंडळ ४ मध्ये समाविष्ट केले आहे़. या परिमंडळाच्या उपायुक्तांचे कार्यालय येरवडा येथे आहे़. भोगौलिक सलगता लक्षात घेता चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हे परिमंडळ १ मध्ये असायला हवे होते़. त्यामुळे बाणेर, औंध, पाषाण भागातील नागरिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना थेट येरवड्याला शहराच्या दुसऱ्या टोकाला जावे लागणार आहे़. 
..................
पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल़.
शेषराव सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त
 

Web Title: After months the police stations have been reconstituted on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.