सदस्यांच्या दबावापुढे प्रशासनाची माघार : सिमेंट रस्त्यांची कामे सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:08 PM2019-01-31T13:08:46+5:302019-01-31T13:10:30+5:30

शहरातील गंभीर पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले. मात्र....  

administrations decision change about city cement constructions work due to members pressure | सदस्यांच्या दबावापुढे प्रशासनाची माघार : सिमेंट रस्त्यांची कामे सुरुच राहणार

सदस्यांच्या दबावापुढे प्रशासनाची माघार : सिमेंट रस्त्यांची कामे सुरुच राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देयोगेश मुळीक : रस्त्यांच्या कामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर

पुणे: शहरातील गंभीर पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या या आदेशामुळे सदस्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. यामुळे २४ तासांच्या आत प्रशासनाने माघार घेतली असून, सिमेंट रस्त्यांची कामे सुरुच राहतील.  केवळ यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येईल, असे नवीन आदेश आयुक्तांनी काढले. पाण्याचा गैरवापर होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. 
आगामी निवडणुच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांची तर तब्बल शंभर ते दीडशे कोटी रुपयांची कामे सुरु आहेत.सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. शहरामध्ये सध्या गंभीर पाणी टंचाई असताना सिमेंट रस्त्यांना बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती.  सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, चालू कामांसाठी (वर्क ऑर्डर ) सांडपाणी वापरावे आणि नवी कामे करू नयेत, असा आदेश महापालिका प्रशासनाने मंगळवारी (दि.२९) काढला होता. त्यावर आक्षेप घेऊन नगरसेवकांनी प्रशासनाच्या आदेशाला विरोध केला. या आदेशामुळे निधी वाया जाणार असल्याचे सांगत, रस्त्यांची कामे थांबवू नयेत, अशी मागणी लावून धरली. स्थायी समितीच्या बुधवार (दि.३०) रोजी झालेल्या  बैठकीत त्याचे पडसाद उमटले. कामे थांबविण्याच्या आदेशाबाबत चर्चा झाली,तेव्हा सांडपाणी वापरण्याचा तोडगा काढण्यात आला.  रस्ते आणि अन्य प्रकारची कामे सुरू आहेत. ती थांबविली जाणार नाहीत. त्यासाठी सांडपाण्याचा वापर करावा, असे राव यांनी बैठकीत सांगितले. 
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी, कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या रोज पाचशे ते सहाशे एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. त्याचा वापर रस्त्यांच्या कामांसाठी करता येईल. 
    ----------------
पाण्याचा गैरवापर होऊ देणार नाही
आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकातील निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांची कामे थांबविणे शक्य नाही. परंतु यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होणार नाही यावर कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. सिमेंट रस्त्यांसाठी केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणीच वापरण्यात येईल, सांडपाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर होऊ न देता विकास कामे सुरु राहातील.
-योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: administrations decision change about city cement constructions work due to members pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.