निळूभाऊ म्हणजे अस्सल राजकारणी रंगवणारा अराजकारणी माणूस 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 09:07 PM2019-07-13T21:07:09+5:302019-07-13T21:11:19+5:30

बाई वाड्यावर या' एवढ्या एका वाक्यापुरते सीमित नसलेल्या हाडाचे रंगकर्मी आणि उत्तम सिनेअभिनेते निळू फुले यांच्याबद्दलच्या आठवणींचा पट अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी लोकमतसमोर उलगडला. 

Actress Jyoti Chandekar talk about late Nilu Phule | निळूभाऊ म्हणजे अस्सल राजकारणी रंगवणारा अराजकारणी माणूस 

निळूभाऊ म्हणजे अस्सल राजकारणी रंगवणारा अराजकारणी माणूस 

googlenewsNext
ठळक मुद्देदहाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी जागवल्या आठवणी 

नेहा सराफ 

पुणे : 

'निळू  फुले नाव जरी डोळ्यासमोर आले तर आठवतात ते पडद्यावर अस्सल राजकारणी रंगवणारे पण मनातून अतिशय अराजकारणी माणूस. माणूस किती संयमी असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे निळूभाऊ होते'. बाई वाड्यावर या' एवढ्या एका वाक्यापुरते सीमित नसलेल्या हाडाचे रंगकर्मी आणि उत्तम सिनेअभिनेते निळू फुले यांच्याबद्दलच्या आठवणींचा पट अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी लोकमतसमोर उलगडला. 

चांदेकर यांनी निळू फुलेंसोबत 'राजकारण गेलं चुलीत आणि रखेली' या दोन नाटकांमध्ये काम केले. सुमारे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ या नाटकांचे प्रयोग सुरु होते. त्यावेळी त्यांच्याविषयी सहकलाकार आणि व्यक्ती म्हणून असलेली आपुलकी चांदेकर यांनी मांडली. 

त्या म्हणाल्या की, 'ते अतिशय बेधडक, आक्रमक आणि सडेतोड होते. अतिशय उत्तम वाचन आणि प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्याची उर्मी त्यांच्यात होती. मुळात त्यांना समाजाच्या प्रश्नांमध्ये रस होताच. त्यातून पुढाऱ्यांशी आलेले संबंधामुळे त्यांनी इरसाल राजकारणी पडद्यावर साकारले. त्यातले काही गुण मात्र त्यांच्यात पूर्ण उतरले होते. कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा, कसं, काय बोलायचं हे त्यांना पक्क ठाऊक असायचं. त्यामुळे गावागावात असलेल्या प्रयोगात त्यांची अक्षरशः क्रेझ निर्माण झाली होती. अनेक राजकारणी त्यांनी भाषणासाठी यावे यासाठी धडपड करायचे. एकदा की निळूभाऊ सभेला गेले की ते एकहाती सभा काबीज करत असत. 

कलाकार म्हणून तर ते प्रचंड अभ्यासू होते. कुठल्या भूमिकेसाठी द्यायचं आहे याचा विचार कायम त्यांच्या मनात असायचा. आम्ही एकत्र तुडूंब भरलेलं प्रेक्षागृह, हजारो टाळ्या आणि कौतुक एकत्र अनुभवले त्याप्रमाणे जेवण न मिळाल्याने भेळीवरही दिवस काढून प्रयोग केले आहेत. प्रयोगानंतरही हेच जेवण हवं असा आग्रह त्यांनी कधीही धरला नाही. ते खाण्यातले दर्दी असले तरी वेळप्रसंगी पिठलं भाकरीही त्यांनी आनंदाने खाल्ली आहे. निळूभाऊंच्या आठवणी म्हणजे आम्हा सर्व कलाकारांसाठी जणू मोत्यांचा ठेवा आहे. ते आज नसले तरी त्यांना कायम मनात जपले आहे. 

गरजूला मदत पण.... 

निळूभाऊ अतिशय सहृदयी होते. गरजू व्यक्ती त्यांच्याकडे गेले तर प्रसंगी सगळं मानधनही ते द्यायचे. पण व्यक्ती खरंच गरजू आहे की नाही हे तपासून बघायचे. अनेक वर्ष समाजातील स्तरांमध्ये वावर असल्यामुळे ते अगदी क्षणात प्रामाणिक माणूस ओळखायचे आणि सढळ हस्ताने मदत करायचे. मात्र व्यक्ती फसवत असेल तर क्षणात त्याचे सोंग उघडकीस आणण्याचा कणखरपणाही त्यांच्यात होता. 

Web Title: Actress Jyoti Chandekar talk about late Nilu Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.