दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:10 AM2019-04-15T04:10:32+5:302019-04-15T04:10:57+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादाचे आघात सहन केले आहेत.

Opponents do not have the right to ask Rahul Gandhi about the issue of terrorism | दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही

दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादाचे आघात सहन केले आहेत. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे काँग्रेस नेते व दूरसंचार क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य भाजप नेते लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधींवर कठोर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पित्रोदा यांनी सांगितले की, राहुल गांधीच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी दहशतवादाचे बळी ठरले. राहुल गांधी यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल शंका घेणाऱ्यांना त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे.
पित्रोदा म्हणाले की, अडवाणी यांच्याशी अनेक मुद्द्यांबाबत मतभेद असूनही मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. स्वप्रसिद्धीसाठी हपापलेले असणे व विरोधी मतप्रणालींच्या लोकांना देशद्रोही संबोधणे या विरोधात अडवाणींनी नुकतीच आपल्या ब्लॉगमध्ये ठाम भूमिका मांडली आहे. अडवाणी यांच्याकडून भाजप नेत्यांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसºयांना देशद्रोही ठरविण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी विचारला.
आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला किती यश मिळेल या प्रश्नावर ते म्हणाले की, या निवडणुकांच्या निकालांतून अनेक आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. आपण विचारपूर्वक मतदान न केल्यास देशाचे भवितव्य बिघडूही शकते याचा विचार मतदारांनी करावा. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक आहे. मोदी यांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. राहुल हे प्रामाणिक युवा नेता असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्यांनी आजवर अनेक आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केला आहे. स्वातंत्र्यासाठी लढण्याची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेस पक्षाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना विरोध करणाºया पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीत नेमके योगदान काय आहे, असा सवालही पित्रोदा यांनी केला.
।राहुल देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज
राजीव गांधी प्रचंड बहुमताच्या बळावर पंतप्रधान झाले होते. राहुल गांधी यांनी अगदी तळागाळापासून पक्षकार्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यावर खूप टीका झाली. वैयक्तिक शेरेबाजीने कळस गाठला. तरीही राहुल गांधी यांचे नेतृत्व वाढत राहिले. ते आता देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Opponents do not have the right to ask Rahul Gandhi about the issue of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.