मनसे-भाजपत रंगणार ‘व्हिडीओ गेम’; आधीच्या वक्तव्यांतून पोलखोल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:22 AM2019-04-25T06:22:07+5:302019-04-25T07:25:18+5:30

‘किणी’पासून विविध माहिती गोळा

MNS - BJP will play 'video games'; Polls in earlier statements? | मनसे-भाजपत रंगणार ‘व्हिडीओ गेम’; आधीच्या वक्तव्यांतून पोलखोल?

मनसे-भाजपत रंगणार ‘व्हिडीओ गेम’; आधीच्या वक्तव्यांतून पोलखोल?

googlenewsNext

मुंबई : ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर प्रत्येक प्रचारसभेत हल्ले चढवत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. एकाच विषयावर राज यांची आधीची आणि आताची वक्तव्ये; तसेच त्यांच्यावर रमेश किणी प्रकरणापासून झालेले अन्य आरोप प्रचाराच्या सांगतेवेळी २७ तारखेच्या सभेत दाखविले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांत राजकारणाचा ‘व्हिडीओ गेम’ रंगणार आहे.
 



भाजपवरील आरोपांबाबत वस्तुस्थिती मांडण्यासाठी असे व्हिडीओ दाखविणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, राज ठाकरे ज्या स्टाईलने आरोप करीत आहेत, त्याच स्टाईलने भाजप २७ तारखेच्या सभेत उत्तर देणार आहे. आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, २७ एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरू ठेवाव्यात. कारण या टुरिंग टॉकिजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसेही त्यांचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरू ठेवायला काही हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काळाचौकी येथील सभेत राज ठाकरेंनी चिले कुटुंबाचा दाखविलेला फोटो भाजपच्या किंवा राज्य सरकारच्या अधिकृत जाहिरातीतला नाही. कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर तो प्रसिद्ध झाला नाही. एखाद्या मोदीप्रेमीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला असू शकतो. मात्र अशा पद्धतीने फोटो वापरणे चुकीचे असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंच्या नावानेही अनेक पेजेस् आहेत, ती सगळेच काही अधिकृत नाहीत. त्यांच्या अधिकृत पेजवरील माहितीच आम्ही खरी मानतो, असा टोलाही तावडेंनी लगावला. असा काही फोटो अपलोड झाल्याचे चिले परिवारातील सदस्यांच्याच लक्षात आले. त्यामुळे आपणच फार काही शोधून काढल्याचा आव राज ठाकरेंनी आणू नये, अशी टीका तावडे यांनी केली.



उद्योगपतींच्या मतांवर नाही, तर सर्वसामान्यांच्या मतांवर लोकशाही टिकून आहे. पण, पवारांचे बोट धरून चालणाऱ्या राज यांना याची कल्पना नाही. शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांनी रशियावरून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला आहे. नशीब त्यांनी अंतराळातून ईव्हीएम हॅक होते असे म्हटले नाही. पराभव लक्षात आल्यामुळेच विरोधकांनी आतापासून कारणांचा शोध सुरू केला आहे, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांच्या विविध वक्तव्यांचे राज चुकीच्या पद्धतीने भांडवल करीत आहेत. मात्र, त्यातील वास्तव आम्ही दाखवू. राज यांनी आतापर्यंत अनेकवेळा कशी आणि का भूमिका बदलली हेही या सभेत दाखविले जाणार आहे, असे ते म्हणाले.



शेवटच्या दिवसाची मुद्दाम निवड
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले, तर ते त्याचा प्रतिवाद करू शकणार नाहीत. त्यांना तेवढा वेळही मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यानंतरही मनसैनिकांनी उत्तर द्यायचे ठरवले, तर त्यांना ते सोशल मीडियावर द्यावे लागेल, हे गृहीत धरून भाजपने प्रचाराचा शेवटचा दिवस निवडल्याचे सांगण्यात येते. राज ठाकरेंवर आरोप करणाऱ्या काही व्यक्तींना व्यासपीठावर आणण्याचाही पक्षाचा प्रयत्न आहे.

मनसेकडे पर्याय फक्त ठाण्याच्या बैठकीचा
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईतील त्यांची शेवटची सभा पार पडली. आता पुढील सभा नाशिक आणि इचलकरंजीत आहेत. तेथेही त्यांच्या सभेनंतर लगेचच भाजपकडून ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत राज यांच्या भूमिका बदलल्याच्या चित्रफिती दाखविल्या जाणार आहेत. यातून त्यांच्या प्रचारातील हवा काढून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाची वॉर रूम कामाला लागली आहे. त्यामुळे भाजपच्या सभेवेळीच मनसेची ठाण्याची सभा पार पाडावी आणि त्यातील पदाधिकाºयांसमोरील भाषण ‘लाइव्ह’ करावे, अशी तयारी त्या पक्षातर्फे सुरू असल्याचे समजते. त्यातून भाजपच्या आरोपांना त्याचवेळी उत्तरही देता येईल.



उद्धव ठाकरेंकडूनही ‘व्हिडीओ’चा बार
नाशिकमधील सभेत राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरे यांनीही बुधवारी ‘व्हिडीओ’चा बार उडवून दिला. गेले दोन दिवस मुंबई, ठाणे, कल्याणमधील सभेत उद्धव यांनी ‘लाज कशी वाटत नाही?’ या वक्तव्याचा उल्लेख केला होता. तसेच राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत जे निवडणूक लढवत नाहीत किंवा ज्यांचा निवडणुकीशी संबंध नाही, ते आम्हाला निवडून देऊ नका म्हणतात, अशा आशयाची वक्तव्ये केली होती. मात्र त्यानंतरही राज यांनी भाजपवरील टीकेचा फोकस बदलला नाही आणि शिवसेनेला अजिबात लक्ष्य केले नाही. वेगळ्या पद्धतीने अनुल्लेखाने मारले. त्यामुळे नाशिकच्या सभेत उद्धव यांनी स्वत:च राहुल यांचा व्हिडीओ दाखवत या युद्धात स्वत:हून उडी घेतली.
 

Web Title: MNS - BJP will play 'video games'; Polls in earlier statements?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.