Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:58 AM2019-03-11T04:58:02+5:302019-03-11T04:58:42+5:30

प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम; राहुल गांधी यांच्यासह ११ जणांची यादी जाहीर

Lok Sabha Election 2019: Congress's masterstroke by declaring Uttar Pradesh as a candidate | Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

Next

- धनाजी कांबळे

उत्तर प्रदेशातील निवडणूक देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष राहणार आहे. विशेषत: भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ याच राज्यात असल्याने या ठिकाणी ‘काँटे की टक्कर’ होईल, अशीच परिस्थिती आहे.

एकीकडे भाजपाचा वारू रोखण्यासाठी सपा, बसपा यांनी आघाडी केली असताना, काँग्रेस मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याने उत्तर प्रदेशातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील मतदारसंघ उत्तर प्रदेशातच असल्याने तुल्यबळ लढती होणार आहेत. यात आता मोदी लाट ओसरली असली, तरी कुणाच्याही विजयाची खात्री देता येत नसल्याने उमेदवार देतानाही राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे.

काँग्रेसचा विचार करता प्रियंका गांधी यांना प्रत्यक्ष राजकारणात आणल्यावर त्या रायबरेलीतून रिंगणात उतरतील अशी अटकळ तज्ज्ञांनी बांधली होती. मात्र, काँग्रेसने सर्व पक्षांमध्ये आघाडी घेऊन ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अमेठीतून राहुल गांधी, तर रायबरेलीतून सोनिया गांधी उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरतील, याबाबत अद्याप संदिग्धता ठेवण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून सपा-बसपावर दबाव टाकण्याचाही डाव टाकलेला आहे, हे विशेष.

काँग्रेसने एकूण १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ११ जण उत्तर प्रदेशातील, तर ४ जण गुजरातसाठी जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात देशात घडलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न भाजपा करेल, अशी शक्यता वाटत असतानाच बसपाच्या सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री मायावती आणि सपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याची स्थिती आहे. काँग्रेसदेखील राफेल, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, आरबीआय अशा संवैधानिक संस्थांमध्ये सत्ताधारी सरकारचा होत असलेला हस्तक्षेप यावर टीकाटिप्पणी करणे सुरूच ठेवले आहे.

सपा, बसपासोबत येणार काँग्रेस?
उत्तर प्रदेशात जानेवारीमध्ये जी परिस्थिती होती, त्यात बदल झाला आहे. सपा आणि बसपा यांच्या आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा काँग्रेसने व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. जागा किती सोडायच्या एवढाच मुद्दा शिल्लक असून, ९+२ अशी आॅफर काँग्रेसला देण्यात आली आहे. याआधी काँग्रेस २० जागा मागत होती. पण, आता १७ जागांवर चर्चा आली आहे. १३+२ काँग्रेस तयार होईल, असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे सपा-बसपाने अमेठी, रायबरेलीची जागा काँग्रेससाठी आधीच सोडली आहे.

उत्तर प्रदेशात सवर्ण मतदारांचे प्रमाण २१ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. सवर्णांमध्ये ब्राह्मण आणि भूमिहीन ९ ते १० टक्के, ठाकूर व राजपूत ८ टक्के आणि वैश्य (बनिया) ३ टक्के आहेत. २०१४ व २०१७ च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये सवर्णांनी भाजपाला जवळपास एकगठ्ठा मतदान केले होते. २०१३-१४ मध्ये अमित शहांनी सवर्ण जातींना भाजपाच्या जवळ आणले. आता १० टक्के सवर्ण आरक्षणाचा भाजपाला फायदा होऊ शकतो. ८ टक्के ब्राह्मण मतदार, बसपाशी असंतुष्ट असलेले ८ टक्के दलित मतदार यांना ज्या-ज्या मतदारसंघात काँग्रेस स्वत:च्या मंचावर आणू शकेल, तिथे राज्यात १९ टक्के असलेला मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मत देईल, अशी स्थिती उत्तर प्रदेशात आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Congress's masterstroke by declaring Uttar Pradesh as a candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.