गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:27 PM2019-04-02T15:27:30+5:302019-04-02T15:33:40+5:30

न्याय योजनेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश

congress manifesto for lok sabha election rahul gandhi reiterates nyay scheme | गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा

गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे न्याय योजनेचा समावेश केला आहे. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत या योजनेची घोषणा केली होती. ही योजना गरिबीवरील अंतिम स्ट्राइक असेल, असं त्यावेळी राहुल यांनी म्हटलं होतं. आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींनी याच योजनेचा पुनरुच्चार केला. आम्ही फक्त घोषणा देत नाही, त्या पूर्ण करतो, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तो केवळ एक विनोद होता. मोदी देशवासीयांनी खोटं बोलले. त्यामुळेच आम्ही जाहीरनामा करताना जे शक्य होऊ शकतं, अशाच गोष्टींवर भर दिला, असं राहुल गांधींनी म्हटलं. यावेळी त्यांनी न्याय योजनेवर भाष्य केलं. 'आपण दरवर्षी लोकांच्या खात्यात किती रुपये जमा करू शकतो, असा प्रश्न मी जाहीरनामा समितीला विचारला होता. तेव्हा त्यांनी 72 हजार रुपये असा आकडा सांगितला. त्यामुळे आम्ही दरवर्षी गरीब कुटुंबांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला', असं राहुल गांधींनी सांगितलं. 

'गरिबी पर वार, 72 हजार' अशी घोषणा देत या न्याय योजनेचा फायदा 20 टक्के लोकांना होईल, असा दावा त्यांनी केला. वर्षाला 72 हजार रुपयांप्रमाणे 5 वर्षात लोकांच्या खात्यात 3 लाख 60 हजार रुपये जमा होतील. त्यामुळे पहिल्यांदाच लोकांच्या खिशात थेट पैसा जमा होईल, असं त्यांनी म्हटलं. लोकांच्या खात्यात थेट पैसा जात असल्यानं जीएसटी आणि नोटबंदीमुळे मरगळ आलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींनी न्याय योजनेसोबतच इतर चार मुद्द्यांवरही भाष्य केलं. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. 
 

Web Title: congress manifesto for lok sabha election rahul gandhi reiterates nyay scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.