बेलाजी पात्रे

पिंपरी-चिंचवड, दि. 14 - मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे सेनेला जय महाराष्ट्र करत कमळ हातात घेत भाजपात जाणार, त्यांना भाजपातून ऑफर सुरु आहेत, विरोध संपविण्यासाठी भाजपाने अशी खेळी केली असून आगामी लोकसभा निवडणुक भाजपाच्या तिकिटावर ते लढणार असल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकायला मिळत होत्या. मात्र, या सर्व अफवा आणि बातम्या बिनबुडाच्या असून मी 2019 ला पुन्हा एकदा सेनेच्या तिकिटावरच लोकसभेत जाणार असल्याची स्पष्टोक्ती देत आजवर सुरु असलेल्या अफवांना खासदार बारणे यांनी पूर्णविराम दिला.

डांगे चौक आणि जगताप डेअरी चौकातील वाहतूक समस्येबाबत महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत खासदार बारणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या बाबतीत अशा बातम्यांना पेव फुटल्याचे हास्यास्पद आहे, या सर्व अफवा बिनबुडाच्या आणि निष्फळ आहेत. त्या माझ्या विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. मला बदमान करण्यासाठीचे हे राजकीय षडयंत्र आहे. मी आजवर लोकहिताचे अनेक कामे करीत आलो आहे. लोकसभेत महत्वाचे 813 प्रश्न मांडले असून उत्कृष्ट कामगिरीमुळे सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामुळे विरोधकांची घाबरगुंडी उडाल्याने ते अशा अफवांचे पीक पसरवीत आहेत.

काही समाज कंटकाकडून अशा अफवा पसरविल्या जात आहेत आणि ते कोण आहेत तुम्हा आम्हा सर्वाना माहित आहे त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा देखील ठोकणार आहे. मी कुठेही जाणार नाही, माझे नेते केवळ उद्धवजी ठाकरे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली मी 2019 ला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपल्या सर्वांचे नेतृत्व करणार असल्याचे सांगत या अफवांना त्यांनी पूर्णविराम दिला.