पाहिले नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र; जांबे परिसरात ‘पवनामाई उगम ते संगम’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:54 IST2018-01-22T16:49:21+5:302018-01-22T16:54:15+5:30
हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने आच्छादलेली पाहण्याची सवय असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रूप पाहायला मिळाले. जांबे परिसरात घाटावरती पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पाहिले नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र; जांबे परिसरात ‘पवनामाई उगम ते संगम’ अभियान
पिंपरी : हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने आच्छादलेली पाहण्याची सवय असणाऱ्या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रूप पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला मुठा नदीपात्र मात्र जलपर्णीने पूर्ण आच्छादलेले आहे. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे.
जांबे परिसरात घाटावरती पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा अभियानाचा ७८वा दिवस होता. या वेळी पाच ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. आजअखेर ३२५ ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते व शिवाजी मोरे आणि मित्र परिवार हे कार्यकतेर्देखील आजच्या उपक्रमात सामील झाले. तसेच लेवा पाटील संस्थेच्या महिला आणि जामगावात महिला व स्थानिक ग्रामस्थ व रोटरीचे सर्व सदस्य सामील झाले होते.
मुळा-मुठा नदी सांगवी येथेही जलपर्णीने पूर्ण भरलेली आहे. ही सत्य परिस्थिती आहे; परंतु पिंपरीपासून दापोडीपर्यंत पवना नदी पूर्णपणे जलपर्णीमुक्त आहे. आम्ही गेले काही दिवस रोज करीत असलेल्या कामाची ही खरी पावती आहे, असे समाधान संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब वाल्हेकरवाडी प्रदीप वाल्हेकर यांनी व नदीवर प्रत्यक्ष काम करणारे सोमनाथ मुसुडगे यांनी व्यक्त केले. तर हा पॅटर्न परिणामकारक वाल्हेकरवाडी पॅटर्न प्रशासनाने लवकरात लवकर अमलात आणावा, अशी अपेक्षा वाल्हेकर यांनी व्यक्त केली. अभियानाच्या शेवटाकडे जाताना जास्तीत जास्त लोकांनी यांच्यामध्ये सहभागी व्हावे. नदी स्वच्छतेचे काम केवळ रविवारी नाही तर दररोज काही कामगार जलपर्णी काढण्याचे काम करीत आहेत. तर दर रविवारी आवर्जून आम्ही लोकही नदी काठावर जमतो. ज्यामध्ये येत्या २८ जानेवारीला रावेत बंधाऱ्यावर जलपर्णी काढण्याचा उपक्रम केला जाणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे सचिव दीपक वाल्हेकर यांनी सांगितली.