भारतात 18 लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:31 PM2022-05-02T17:31:01+5:302022-05-02T17:49:33+5:30

WhatsApp : युजर्सची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे यूजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कंपनीने या अकाउंट्सवर कारवाई केली आहे.

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) खूप लोकप्रिय आहे. कंपनी युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी नवीन फीचर्स जारी करण्याव्यतिरिक्त अनेक अकाउंट्सवर कारवाई देखील करत आहे. आता व्हॉट्सअॅपने भारतात 18 लाखांहून अधिक अकाउंट्स बंद केली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने मार्च 2022 चा रिपोर्ट जारी केला आहे. 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने 18 लाखांहून अधिक अकाउंट्सवर बंदी घातल्याचे सांगण्यात आले आहे. हे फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत सुमारे 8 लाख अधिक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने फेब्रुवारी महिन्यात जवळपास दहा लाख खात्यांवर बंदी घातली होती. कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, आयटी नियमांचे (IT Rules 2021) पालन करून हा रिपोर्ट जारी केला आहे. मार्च महिन्याचा रिपोर्टही जारी करण्यात आला आहे.

युजर्सची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे यूजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कंपनीने या अकाउंट्सवर कारवाई केली आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर गैरवर्तनाशी लढण्यास मदत करेल. तसेच, ही अकाउंट्स विघातक कामात गुंतल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे मानले जात आहे.

यामध्ये छळ करणे, बनावट माहिती फॉरवर्ड करणे किंवा इतर युजर्सच्या नावाने अकाउंट्स वापरणे यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टंट मेसेजिंग अॅप सातत्याने अशा कारवाया करत आहे. गेल्या 1 वर्षापासून कंपनीने बनावट माहितीचा प्रसार रोखण्यासाठी अनेक फीचर्स जारी केली आहेत.

अ‍ॅपचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. याशिवाय खोटी माहिती, संशयास्पद लिंक्स किंवा अनव्हेरिफाइड फॉरवर्ड मेसेज पसरवण्यासाठीही या अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. जर तुम्हीही असा प्रकार करत असाल तर तुमच्याही व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी येऊ शकते.