दूरच्या रानात, केळीच्या बनात; मुख्यमंत्री शिंदे शेतीत रमले, गाईंनाही कुरवाळले

By दीपक शिंदे | Published: November 1, 2022 05:16 PM2022-11-01T17:16:53+5:302022-11-01T17:27:27+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे, असे त्यांनी म्हटले.

विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी दुपारी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले. सायंकाळी मूळगावी त्यांनी जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या.

मुख्यमंत्री आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले. पण, त्यांनी आपला मंगळवारचा पूर्ण दिवस शेती कामासाठी ठेवला. गावच्या मातीत अन् स्टॉबेरीच्या शेतीत मुख्यमंत्री रमल्याचे दिसून आले.

एकनाथ शिंदे यांनी गावात लावलेल्या आंबा, चिकू, नारळ या झाडांच्या बागेत फेरफटका मारला. त्याबरोबरच हळदीच्या शेतात जाऊन पाहणी केली. स्ट्रॉबेरीचीही लागवड केली.

गोशाळेतील गाई आणि वासरांना चारा खाऊ घातला आणि मायेने त्यांना कुरवाळले देखील. यावेळी, गाय-वारसांसमवेत आपला वेळ खर्ची केला.

शेतीसाठी केलेल्या शेततळ्याच्या स्थितीचीही पाहणी केली. यापूर्वी देखील मुख्यमंत्री शिंदे हे शेतीकामात दरवर्षी लक्ष घालत होते. पावसाळ्यात त्यांना यावर्षी फार काळ थांबता आले नाही. आता, मात्र त्यांनी शेतीकामासाठी पूर्ण एक दिवस दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी शेतात आपला दिवस खर्ची केल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यावेळी, कुळव चालवण्यापासून चिखलात पाय भिजवल्याचेही त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.