Pooja Shukla Akhilesh Yadav UP Election 2022: अखिलेश यादवांनी जुन्या मित्राचं तिकीट कापून उमेदवारी दिलेल्या पुजा शुक्ला नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:38 PM2022-02-03T14:38:54+5:302022-02-03T15:11:33+5:30

पुजा शुक्लांना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून देण्यात आली उमेदवारी

Pooja Shukla: उत्तर प्रदेशचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. सत्तेची गणितं लक्षात घेता काही वेगळ्या पद्धतीचे निर्णय सर्वच पक्षांकडून घेतले जात आहेत. त्यातील एक निर्णय म्हणजे लखनौ उत्तरमधून पुजा शुक्ला यांना दिलेली उमेदवारी.

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचा जवळचा जुना मित्र मानले जाणारे आणि ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अभिषेक मिश्रा यांचं तिकीट कापून त्याजागी पूजा शुक्ला यांना उमेदवारी देण्यात आली.

अखिलेश यादवांच्या या निर्णयाची उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चा रंगल्याचं दिसून आलं. जाणून घेऊया या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पुजा शुक्ला नक्की कोण आहेत...

पुजा शुक्ला यांनी लखनौ विद्यापीठातील डाव्या संघटनेतून विद्यार्थी नेत्या म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

२०१७ मध्ये भाजपाचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाल्यानंतर पूजा शुक्ला यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखनौ विद्यापीठात जाताना काळे झेंडे दाखवले होते.

योगींना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी पुजा यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. पूजा शुक्ला तब्बल २६ दिवस तुरुंगातच होत्या. त्या समाजवादी विद्यार्थी सभेच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत.

सरकारच्या धोरणांबाबत पूजा शुक्ला आक्रमक असतात आणि सतत आंदोलन करत असतात. त्यामुळे अनेकदा पोलिसांच्या लाठीचार्जलाही त्यांना सामोरं जावं लागतं.

पुजा शुक्ला या मध्यमवर्गीय कुटुंबातीलच एक आहेत. त्यांचे वडिल प्रॉपर्टी डिलर आहेत. आई गृहिणी आहे आणि लहान बहिण अजूनही शिक्षण घेत आहे.

२०१९ साली CAA च्या विधेयकाविरोधात पुजा शुक्ला यांनी अनेक आंदोलने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर ४ FIR दाखल करण्यात आल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत उत्तर लखनौतून उमेदवार असलेल्या पुजा शुक्ला यांची लढत भाजपाच्या नीरज बोरा यांच्याशी होणार असल्याने अटीतटीची झुंज पाहायला मिळेल असं बोललं जात आहे.