हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 09:43 AM2020-07-30T09:43:59+5:302020-07-30T10:06:56+5:30

हजारो मैलांचे अंतर कापत राफेल लढाऊ विमाने भारतात आणणाऱ्या हवाई दलाच्या फायटर पायलटांची माहिती पुढे आली आहे.

अनेक वादविवाद आणि अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अखेर राफेल लढाऊ विमान करारामधील पहिली पाच विमाने काल भारतात दाखल झाली आहेत. फ्रान्स ते भारत हा तब्बल सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमाने भारतातील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरली. दरम्यान, हजारो मैलांचे अंतर कापत ही लढाऊ विमाने भारतात आणणाऱ्या हवाई दलाच्या फायटर पायलटांची माहिती पुढे आली आहे.

अरबी समुद्रावरून या विमानांनी जसा भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर समुद्रावर गस्त घालत असलेल्या नौदलाच्या आयएनएस कोलकाला या यद्धनौकेने वायरलेसवरून भारतात स्वागत असल्याचा संदेश दिला.

दरम्यान, या राफेल लढाऊ विमानांना भारतात आणणाऱ्या शूर वैमानिकांमध्ये काश्मीरपासून बिहारपर्यंतच्या वैमानिकांचा समावेश होता. दरम्यान, या वैमानिकांचे स्वागत करण्यासाठी स्वत: हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया अंबाला येथील हवाई तळावर उपस्थित होते.

या फायटर पायलटांच्या दलाचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह करत होते. तर या विमानांचे सारथ्य विंग कमांडर एमके सिंह, ग्रुप कॅप्टन आर. कटारिया, विंग कमांडर मनीष सिंह आणि हिलाल अहमद करत होते.

ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह १७ वी स्क्वाड्रन गोल्डन एरोचे कमांडिंग ऑफिसर आहेत. तर २००१ मध्ये हवाई दलात दाखल झालेले विंग कमांडर अभिषेक त्रिपाठी राजस्थानमधील जालौर येथील रहिवासी आहेत. त्यांनी राफेलचे सारथ्य केल्याने त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण होते.

काश्मीरमध्ये राहणारे एअर कमोडोर हिलाल अहमद यांनी राफेल विमानांना भारतातील परिस्थितीच्या अनुरूप घडवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हिलाल हे दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २७ जुलै रोजी फ्रान्समधून राफे विमाने निघण्यापूर्वी त्यांचे निरीक्षण केले होते.

विंग कमांडर मनीष सिंह यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा या क्षणाची आनंदाने वाट पाहिली जात होती. तसेच मुलाला राफेल विमानाचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याने आई उर्मिलादेवी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राफेल विमानांना भारतात आणतानाच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनलेले ग्रुप कॅप्टन रोहित कटारिया यांच्या कुटुंबानेसुद्धा आनंद व्यक्त केला. आपल्या नातवाला लढाऊ विमान उडवताना पाहिल्याने आजोबांच्या आनंदालाही पारावार उरला नव्हता.

राफेल लढाऊ विमानांचा जगातील सर्वात शक्तिशाली विमानांच्या यादीमध्ये समावेश होतो. त्यामुळे या विमनांच्या वैमानिकांची निवड ही त्यांच्या गुणवत्तेची परख करूनच करण्यात आलेली आहे. आता हे वैमानिक इतर वैमानिकांना ट्रेनिंग देण्यासाठी सज्ज झाले आहेत.