ना लोडशेडिंगची कटकट, ना वीजबिलाचं टेन्शन, घरच्या घरीच मिळवा अखंड वीज, सरकार देतंय भरपूर सब्सिडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:32 PM2022-08-26T13:32:39+5:302022-08-26T13:39:12+5:30

Solar Rooftop Scheme: सध्या भारत सरकार उर्जेच्या पारंपरिक स्त्रोतांऐवजी अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. खनिज तेल नैसर्गिक वायू यांच्या आयातीवर तसेच वीजनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने सरकार सध्या घरांवरच सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करण्याला प्रोत्साहन देत आहे.

सध्या भारत सरकार उर्जेच्या पारंपरिक स्त्रोतांऐवजी अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. खनिज तेल नैसर्गिक वायू यांच्या आयातीवर तसेच वीजनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने सरकार सध्या घरांवरच सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करण्याला प्रोत्साहन देत आहे.

उर्जेच्या या पर्यायी स्रोतामुळे पर्यावरण संरक्षणालाही मदत मिळणार आहे. ही बाब विचारात घेऊन २०३० पर्यंत ४० टक्के वीज उत्पादन अपारंपरिक स्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. सरकारने २०३० या वर्षाच्या अखेरीस १०० गीगावॅज वीजेचं उत्पादन सौर उर्जेच्या माध्यमातून करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. त्यापैकी ४० मेगावॅट उत्पादन हे घरांच्या छतांवर सोलर पॅनल लावून करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच घरांच्या छतांवर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सब्सिडीसुद्धा देत आहे.

ही योजना सर्वसामान्यांसाठी बऱ्याच दृष्टीने फायदेशीर आहे. त्याचं कारण म्हणजे सोलर पॅनल लावण्यासाठीचा खर्च हा खूप कमी येतो. कारण या खर्चावरील एक भाग केंद्र सरकार सब्सिडी म्हणून देते. तर राज्य सरकारेही आपल्याकडून काही रक्कम सब्सिडी म्हणून देतात. तसेच सोलर पॅनल लावल्यावर लोडशेडिंग आणि महिन्याच्या विजबीलाच्या कटकटीतूनही मुक्तता होते. तसेच दैनंदिन वापरासाठी पुरेशी वीज उपलब्ध होते.

या योजनेचा अजून एक फायदा म्हणजे या स्कीममधून आर्थिक कमाईची संधीही मिळते. जर घरावर लावलेल्या सोलर पॅनलमधून अतिरिक्त वीज निर्माण होत असेल तर वीज वितरण कंपन्या या विजेची खरेदी करतील. ही अशी गुंतवणूक आहे ज्यामधून तुमची बचतही होईल आणि तुम्हाला उत्पन्नही मिळेल.

सर्वसाधारणपणे घरासाठी २-४ केव्हीचा सोलर पॅनल पुरेसा ठरतो. यामध्ये तुम्ही एक एसी, दोन चार पंखे, एक फ्रिज, ६ ते ८ एलईडी लाईट, १ पाम्याची मोटर आणि टीव्ही अशा वस्तू वापरू शकता. समजा तुमच्या घराचं छत १००० स्केअर फूट आहे आणि त्यापैकी ५०० स्क्वेअर फुटावर तुम्ही सोलर पॅनल लावले तर या प्लँटची एकूण क्षमता ही ४.६ केव्ही एवढी होते. त्यासाठी तुम्हाला एकूण १.८८ लाख रुपये खर्च येऊ शकतो. सब्सिडीनंतर ही रक्कम घटून १.२६ लाख रुपये एवढीच उरते.

जर तुमच्या घरातील विजेची गरज सोलर पॅनलच्या माध्यमातून पूर्ण होत असेल तर तुमची दर महिन्याला सुमारे ४ हजार २३२ रुपयांच्या बीज बिलाची बचत होईल, म्हणजेच वर्षाकाठी ५० हजार रुपयांची बचत होईल. त्यामुळे केवळ अडीच वर्षांमध्येच तुमचा सोलर पॅनेल बसवण्याचा खर्च वसूल होईल.

जर तुमच्या घरातील विजेची गरज अगदी कमी असेल तर तुम्ही २ केव्हीचे सोलर पॅनल लावू शकता. सरकारकडून ३ केव्हीपर्यंतच्या सोलर पॅनलसाठी ४० टक्क्यांपर्यंत सब्सिडी मिळते. त्यामुळे तुमचा खर्च घटून ७२ हजार रुपये एवढाच राहील. म्हणजेच सरकारकडून तुम्हाला तब्बल ४८ हजार रुपये एवढी सब्सिडी मिळू शकते.