देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; मोदींनी स्वतः शेअर केले फोटो, पाहा कसे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:33 PM2023-08-18T18:33:19+5:302023-08-18T18:40:05+5:30

या 3D पोस्ट ऑफिसचे बांधकाम २१ मार्च रोजी सुरू झाले आणि ३ मे रोजी पूर्ण झाले.

सायबर सिटी बंगळुरूमध्ये भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उद्घाटन केले. पोस्ट ऑफिसचे संपूर्ण बांधकाम ४४ दिवसांत पूर्ण झाले आहे. खर्च आणि वेळेची बचत पारंपारिक इमारत बांधकाम प्रणालींना 3D काँक्रीट प्रिटिंग टेक्नॉलॉजी एक व्यवहार्य पर्याय बनवते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "हे पोस्ट ऑफिस पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. आपल्या देशाच्या नवकल्पना आणि प्रगतीचे हे एक प्रमाण आहे, ते आत्मनिर्भर भारताच्या भावनेचेही प्रतीक आहे. पोस्ट ऑफिस पूर्ण करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे अभिनंदन."

बंगळुरू येथील केंब्रिज लेआउटमध्ये असलेली ही बिल्डिंग रेकॉर्ड ४४ दिवसांत प्रिंट होऊन तयार झाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या बिल्डिंगचे उद्घाटन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या 3D पोस्ट ऑफिसचे बांधकाम २१ मार्च रोजी सुरू झाले आणि ३ मे रोजी पूर्ण झाले.

थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे पोस्ट ऑफिस बिल्डिंगचे बांधकाम इतक्या कमी वेळेत तयार होऊ शकले. या बिल्डिंगचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, बंगळुरूने नेहमीच देशाचे एक नवे चित्र सर्वांसमोर आणले आहे.

तसेच, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, "तुम्ही या 3D प्रिंट पोस्ट ऑफिस बिल्डिंगचे जे नवीन चित्र पाहिले, ते आज भारताची भावना आहे. याच भावनेने भारत आज प्रगती करत आहे."

दरम्यान,  बंगळुरूमध्ये बांधलेल्या या बिल्डिंगला केंब्रिज लेआउट पोस्ट असे नाव देण्यात आले आहे. एकूण ११०० चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. हे केवळ कमी वेळातच नव्हे तर कमी खर्चातही बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

थ्रीडी प्रिंटिंगच्या या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे, ड्रॉइंग इनपुटवर थर-बाय-लेयर काँक्रीट ओतले जाते. ज्या ठिकाणी बिल्डिंग बांधायची आहे, त्या ठिकाणी त्या मशीनला असेंबल केले जाते.