ड्रॅगनची नवी चाल, भारत सतर्क; भूतानबाबतीत चीनचं हे पाऊल देशासाठी धोक्याचं ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:38 PM2023-10-25T12:38:45+5:302023-10-25T12:42:35+5:30

हिमालयाच्या कुशीत वसलेलं शेजारील राष्ट्र भूतान अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताच्या रणनीतीसाठी भूतान महत्त्वाचे राष्ट्र आहे. भूतान हे तिन्ही बाजूने भारत आणि एका बाजूने चीनच्या सीमेशी जोडलेले आहे. शेजारी राष्ट्रांशी चीनचा कायम संघर्ष सुरू असतो. त्यात भारत-भूतान या दोन्ही देशांचा समावेश आहे.

चीन आणि भूतान यांच्यात राजकीय संबंध नाहीत. परंतु दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संवाद सुरू असतो. भूतानसोबत सीमावाद सोडवण्यासाठी चीन नेहमी सक्रीय असतो. त्यामुळे भारत नेहमी या देशांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असतो.

गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि भूतान यांच्यात लष्करी करारांसह सामरिक संबंध आहेत. हे एकमेव शेजारी राष्ट्र आहे ज्याच्यासोबत भारताचा कधीही संघर्ष झाल्याचे पुढे आले नाही. आता सीमा प्रश्नावर बीजिंगला गेलेले भूतानचे परराष्ट्र मंत्री डॉ. टांडी टोरजी यांच्या दौऱ्यावर भारताची करडी नजर आहे.

टांडी दोरजी यांनी मंगळवारी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. भूतानवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि सीमा समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी चीनचा दबाव आहे. अशा स्थितीत या भेटीमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

भूतान आणि चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चर्चेची प्रक्रिया पुढे गेली आहे. अशावेळी भारताने थिंपूला आग्रह केलाय की, त्यांनी चीनच्या दबावात येऊन डोकलाम कॉरिडॉरवर कुठलाही करार करू नये. सीमावादावर चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भूतान यांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केल्याने दोन्ही देशांचे दीर्घकालीन हित साधले जाईल. डोकलाम कॉरिडॉरसारख्या संवेदनशील मुद्द्यावर तडजोड न करण्याबाबत नवी दिल्लीने भूतानला कळवले आहे

भारताचा संदेश स्पष्ट आहे की, सीमा विवादाच्या कोणत्याही निराकरणाचा आपल्या हितसंबंधांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होऊ नये. २०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम ट्राइजंक्शनवर २ महिन्यांपर्यंत अडथळा आला होता. डोकलाम क्षेत्रावरून चीन आणि भूतान यांच्यात वाद आहेत.

हा भाग भूतानचा आहे असं भारत म्हणतं. चीनचे सैन्य याठिकाणी नेहमी घुसखोरी करते त्यामुळे भारतीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. डोकलाममध्ये सिक्किम(भारत), भूतान आणि चीनच्या सीमा जोडल्या आहेत.

भूतान भारताच्या सर्वात जवळच्या सहकारी देशांपैकी एक आहे. गेली अनेक दशकं भारतासोबत भूतानचे लष्करी करार संबंध आहेत. आता चीन-भूतान यांच्यातील संवादानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की, चीन भूतानसोबत एकत्र काम करेल. या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्यासाठी आणि मैत्री मजबूत करण्यासाठी आमची तयारी आहे असं चीननं म्हटलं.

भूतानच्या वायव्य आणि मध्य भागावर सुमारे ७६४ चौरस किमी चीनचा दावा आहे. आता चीनने भूतानसोबत सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चेला गती देण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या कारवाया पाहता भूतानसोबत चर्चेच्या या पाऊलावर भारताला शंका निर्माण झाली आहे.