भारतीय हवाई दलाला मिळाली 'हॅमर मिसाइल', आता 'बालाकोट'सारखे हल्ले करणं आणखी सोपं By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:45 PM 2021-11-16T14:45:14+5:30 2021-11-16T14:48:51+5:30
भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. चीन विरुद्धच्या सततच्या सीमावादामुळे उत्तर-पूर्व सीमेला सुरक्षित करण्यासाठी आता नवं शस्त्र हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. याच नव्या मिसाइलबाबत आपण जाणून घेणार आहोत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नवं मिसाइल दाखल झालं आहे. नवं मिसाइल भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणार असून शत्रुचा समूळ नायनाट करण्याची क्षमता या मिसालइची आहे. 'हॅमर' असं या नव्या मिसाइलचं नाव असून नावाप्रमाणेच शक्तीशाली आहे. फ्रान्सनं भारताला 'हॅमर' मिसाइल सुपूर्द केली आहे.
हवाई दलाच्या तेजस फायटर विमानात हॅमर मिसाइल लावण्यात आल्यानंतर शत्रूच्या बंकरला ७० किमी दूरवरुनच लक्ष्य करता येणार आहे. हे अंतर कदाचित खूप कमी वाटू शकेल पण वास्तविक पातळीवर याचा विचार करायचा झाल्यास बालाकोट एअर स्ट्राइकसारखे मिशन पूर्णत्वास नेण्यास यानं मदत होणार आहे.
एलसीए तेजस फायटर विमानासाठी हॅमर मिसाइलची आपात्कालीन परिस्थितीअंतर्गत मागणी करण्यात आली होती. याच पद्धतीचे मिसाईल राफेल फायटर जेटमध्येही लावण्यात आलेले आहेत. एकूण किती मिसाईल भारतात आल्या आहेत याची माहिती अद्याप हवाई दलानं जाहीर केलेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार एकूण १०० मिसाइल भारतात पोहोचल्या आहेत.
हॅमर मिसाइलमुळे आता तेजस फायटर विमानाची ताकद वाढली आहे आणि हिमालयासारख्या पर्वतरांगांच्या परिसरात लपलेल्या चीनी शत्रुंना ठार करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. लदाखच्या पूर्व भागात चीनी सैन्याचे बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता या मिसाइलमध्ये आहे.
तेजस फायटर विमान चीनच्या स्वदेशी फायटर जेट जेएफ-१७ ला टक्कर देण्यासाठी सक्षम आहे. उलट त्याहीपेक्षा अधिक सक्षम आहे. हॅमर मिसाईल लागल्यानंतर तेजस विमान अधिक घातक होईल. तसंच मारक क्षमतेत वाढ होणार आहे.
हॅमर मिसाइलची खास माहिती आपण जाणून घेऊयात. हॅमर मिसाईल हवेतून जमीनीवर मारा करणारे मिसाईल आहे. मिसाईलचं एकूण वजन ३४० किमी इतकं आहे. तर १०.२ फूट लांबी आहे. तसंच मिसाईलच्या नेव्हिगेशन आणि गायडन्स सिस्टम बसविण्यात आलेली आहे.
मिसाईलचं इंजिन सॉलिड रॉकेट मोटरचं आहे. याचा उपयोग अंतराळात उड्डाण घेणाऱ्या रॉकेटमध्ये करण्यात येतो. निश्चित केलेल्या लक्ष्यापर्यंत मिसाईल पोहोचत नसेल तर मिसाइल त्याआधीच नष्ट होऊन जाते. राफेल आणि मिराज लढाऊ विमानात याआधीच हे मिसाईल लावण्यात आलेली आहेत. आता तेजसमध्ये बसविण्यात येत आहे
हॅमर मिसाइल २७५० मीटर प्रति सेकंद गतीनं मारा करू शकतं. त्याचे आकार देखील वेगवेगळे आहेत. १२५ किली, २५० किलो ,५०० किलो आणि १ हजार किलो असे पर्याय यात उपलब्ध आहेत. राफेल विमानात सध्या १ हजार किलोग्रॅमचं सर्वाधिक वजनाचं मिसाईल तैनात आहे.