आपकडून जोरदार प्रचार, काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये भाजपा सत्ता राखणार की परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमध्ये दिसला असा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:43 PM2022-10-15T12:43:28+5:302022-10-15T13:02:35+5:30

Gujarat, Himachal Pradesh opinion polls: दरम्यान, दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्ता राखणार की, यावेळी सत्ता परिवर्तन होणार, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता या दोन्ही राज्यांमधील मतदासांचा कल काय आहे हे सांगणारे ओपिनियन पोल समोर येऊ लागले आहेत.

या वर्षाअखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्ता राखणार की, यावेळी सत्ता परिवर्तन होणार, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता या दोन्ही राज्यांमधील मतदासांचा कल काय आहे हे सांगणारे ओपिनियन पोल समोर येऊ लागले आहेत.

एबीपी-सी-वोटरच्या ओपिनियन पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी भाजपाला ३८ ते ४६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या खात्यात २० ते २८ जागा जाण्याची शक्यता आहे. आपला ० ते १ तर इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात.

एबीपी-सी-वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाल ४६ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला ३५.२ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पक्षाला ६.३ टक्के आणि इतरांना १२.५ टक्के मते मिळू शकतात.

तर गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाच सत्तेवर येईल, अशी शक्यता ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात येत आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपाला १३५ ते १४३ जागा मिळतील. तर काँग्रेसला ३६ ते ४४ जागा मिळण्याची शक्याती आहे. आम आदम पक्षाला ० ते २ जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यामध्ये ० ते ३ जागा जाऊ शकतात.

ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार यावेळच्या निवडणुकीत भाजपा आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्याची शक्यता आहे.

या ओपिनियन पोलमध्ये गुजरातमधील ६३ टक्के लोकांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा कल नोंदवला आहे. तर ९ टक्के लोकांनी काँग्रेस आणि १९ टक्के लोकांनी आम आदमी पक्षाचा विजय होईल, असं म्हटलं आहे.