Donald Trump: अहमदाबादला उतरले, साबरमतीला गेले, सारे काही पाहिले, पण गांधीजींनाच विसरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 06:18 PM2020-02-24T18:18:01+5:302020-02-24T18:32:53+5:30

Donald Trump Visit At Sabarmati Ashram

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं राजेशाही विमान - एअरफोर्स वन हे ठरल्याप्रमाणे आज सकाळी ११.४० वाजता अहमदाबादच्या विमानतळावर लँड झालं. पत्नी मेलानिया, मुलगी इवान्का, जावईबापू जेरेड यांच्यासोबत ट्रम्प दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी गुजरातमध्ये दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या मित्राचं गळाभेट घेऊन, 'नमस्ते ट्रम्प' म्हणत स्वागत केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

त्यानंतर, दोन्ही नेत्यांच्या आलिशान कार मोटेरा स्टेडियमच्या दिशेनं निघाल्या. मात्र, त्याआधी त्या महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाकडे वळल्या.

साबरमती आश्रमात ट्रम्प कुटुंबाचं सहर्ष स्वागत झालं.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प दाम्पत्याला या आश्रमाची सैर घडवली. वेगवेगळ्या वस्तू दाखवल्या, त्यांचं महत्त्व सांगितलं.

डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प यांनी चरख्यावर सूतकताईही करून पाहिली.

स्वाभाविकच, संपूर्ण आश्रम फिरताना महात्मा गांधी यांच्या कार्याचीच चर्चा झाली असणार.

पण, आश्रम कसा वाटला, हे अभिप्राय वहीत लिहिताना ट्रम्प यांनी फक्त पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले.

गांधीजींचा - अर्थात बापूंचा उल्लेखही ट्रम्प यांच्या अभिप्रायात नव्हता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

याउलट चित्र 'ताजमहाल'च्या अभिप्राय वहीत पाहायला मिळालं. ट्रम्प यांनी सहकुटुंब ताजमहाल पाहिला. सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या या आश्चर्याबद्दल गाईडनं त्यांना सविस्तर माहिती दिली.

ही भव्य वास्तू पाहताना ट्रम्प भारावून गेले होते. त्यांनी एक छोटेखानी फोटोसेशनही तिथे केलं.

त्यानंतर लिहिलेल्या अभिप्रायामध्ये या वास्तूबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या. 'थँक यू इंडिया' असंही आवर्जून नमूद केलं.