१ ऑगस्टपासून मोठी मोहिम! आधार- व्होटिंग कार्ड लिंक करावे लागणार; नाही केल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 01:22 PM2022-06-19T13:22:24+5:302022-06-19T13:28:22+5:30

aadhar voter id link in Marathi:

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. मतदारांसाठी त्यांची आधार माहिती मतदान ओळखपत्राशी जोडणे ऐच्छिक असले तरी, न जोडण्याची कारणे सांगावी लागणार आहेत. निवडणूक आयोगाशी चर्चेनंतर कायदा मंत्रालयाने शुक्रवारी याचे नोटिफिकेशन जारी केले आहे.

यासोबतच गेल्या वर्षी पारित झालेल्या निवडणूक सुधारणा कायद्यांना लागू करण्याची सुरुवात झाली आहे. नवीन बदल हे १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहेत.

नव्या नियमांनुसार १ एप्रिल २०२३ पर्यंत ज्यांची नावे निवडणूक आयोगाच्या यादीत असतील त्यांना त्यांचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाला सांगावा लागणार आहे. यामुळे डबल व्होटिंगसारखे प्रकार टाळले जाणार आहेत. यासाठी फॉर्म 6B चा वापर करावा लागणार आहे.

जर एखाद्याला आधार नंबर द्यायचा नसेल तर त्याला त्याच्याकडे आधान कार्ड नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. यानंतर या मतदारांना ११ पैकी कोणत्याही एका कागदपत्राने मतदार ओळखपत्र व्हेरिफाय करावे लागणार आहे. याबाबत विस्तृत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत.

आधार कार्ड काढलेले नसल्यास त्या व्यक्तीला त्याच्या व्होटर आयडीच्या व्हेरिफिकेशनसाठी ११ प्रकारची कागदपत्रे वापरता येणार आहेत.

यामध्ये MGNREGS जॉब कार्ड, फोटो असलेली बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन, भारतीय पासपोर्ट, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, पेन्शन प्रमाणपत्र, सरकारी सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांनी जारी केलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेले युनिक आयडेंटिटी आयडी आदी कागदपत्रे असणार आहेत.

नव मतदारांच्या नोंदणीसाठी चार क्वालिफाईंग तारखा दिल्या जातील. आतापर्यंत केवळ पुरुष सर्व्हिस व्होटरच्या पत्नीला त्याच क्षेत्रात मतदाराच्या नोंदणीसाठी परवानगी होती. परंतू नव्या नियमांनुसार आता जेंडर न्युट्रल करण्यात आले आहे. पत्नीच्या क्षेत्रातही पतीला यापुढे मतदार नोंदणी करता येणार आहे.

सुत्रांनुसार नवीन व्होटर रजिस्ट्रेशनच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्म्ससाठी आधार अनिवार्य करण्यात येणार नाही. तसेच पत्ता बदल किंवा अन्य कामासाठी आधार बंधनकारक करण्यात येणार नाही.