भविष्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिंदे गटातील मंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:24 PM2022-11-02T16:24:14+5:302022-11-02T16:27:00+5:30

राज्यातील सत्तांतर घडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची असा वाद शिंदे-ठाकरे गटात निर्माण झाला. एकनाथ शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यानंतर ठाकरे गटानेही आयोगाकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवण्याचा निर्णय घेतला.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कटुता वाढत गेली. मात्र ठाकरे घराण्यातील अन्य व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या जवळ येताना दिसत आहेत. वांद्रे येथील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे सुपुत्र जयदेव ठाकरे, नातू निहार ठाकरे, सून स्मिता ठाकरे हे शिंदेच्या व्यासपीठावर दिसले.

त्याचसोबत आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत राज ठाकरे आणि त्यांच्या भेटीगाठी, संवाद वाढला आहे. त्यामुळे राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले तर त्यानंतर वर्षावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे कुटुंबीय त्याठिकाणी गेले होते. तेव्हा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक गप्पा आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

राज ठाकरे-एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येण्याशिवाय चांगला योग नाही. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित आले होते. आज पुन्हा राज ठाकरे एकनाथ शिंदे एका चित्रपटाच्या कार्यक्रमात एकत्र येत असतील तर त्यात नवल नाही असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

त्याचसोबत भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येत पुढे जात असतील तर त्याच्या एवढा चांगला योग नाही असं सांगत सामंत यांनी मनसे-बाळासाहेबांची शिवसेना युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

मुंबई भाजपच्यावतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वेक्षणे केली जात आहेत. या निकषावर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने मास्टरप्लॅन तयार केला. भाजपा मनसेशी थेट युती टाळण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गट मनसेशी युती करुन जागा देणार असल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटाने मनसेशी युती करुन त्यांना जागा द्याव्या. शिंदे गटाने मनसेच्या ताकदीनुसार त्यांना जागा देणे, असा भाजपाचा मास्टरप्लॅन आहे. मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा वापर ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी करता येईल, असा भाजपाचा प्लॅन आहे.

तसेच ज्या जागांवर मनसेचं वर्चस्व आहे, असा जागांवर भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा राज ठाकरेंना फायदा होणार की तोटा, हे आगामी काळातच समोर येईल.

त्यामुळे राज ठाकरे - एकनाथ शिंदे यांच्या जवळकीमुळे युतीबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे-राज एकत्र येऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्यामुळे येत्या निवडणुकीत नेमकं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय राजकीय समीकरणं जुळतात हे पाहणं गरजेचे आहे.