Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:20 AM2022-12-14T07:20:19+5:302022-12-14T07:27:39+5:30

Eknath Shinde, Devendra Fadanvis predictions: दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप; काय सांगतेय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस, मोदींची कुंडली...

औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीत केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येईल, नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील; परंतु पक्षांतर्गत गटबाजीचा मोठ्या प्रमाणात सामना करून त्यांना त्या पदापर्यंत जावे लागेल. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. शिवाय ते आगामी काळात ताकदवान नेता होणार असल्याचे भविष्य ज्योतिषांनी वर्तविले आहे.   

योगीराज वास्तू अनुसंधानतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप मंगळवारी झाला. यात देश व राज्यातील १४० वास्तुशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचे ज्योतिषी सहभागी होते. ‘निवडणुका आणि ज्योतिष’ या विषयावर अनंत पांडव यांनी मार्गदर्शन केले. 

अरविंद केजरीवाल : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत राजयोग आहे. २०२६ पर्यंत ते मुख्यमंत्री असतील. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत उच्च राजयोग आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री होतील. कुंडलीत संन्यास राजयोग आहे.

 राहुल यांना राजयोग आहे; पण पंतप्रधानपदापर्यंत त्यांना जाता येणार नाही. कारण त्यांच्या कर्मस्थानातील गुरू तसेच षष्ठम स्थानातील रवि, मंगळ हे ग्रह त्यांना पदापासून दूर ठेवतील.  

 पंतप्रधानांना राजयोग असला तरी अनेक विरोधक समोर असतील, त्यावर ते मात करतील. आगामी लोकसभा निवडणूक दहशतवाद आणि राष्ट्रवाद या विषयांवर भाजप लढेल. 

देवेंद्र फडणवीस : कुंडलीतील अष्टमस्थानातील गुरूचे भ्रमण चालू असल्याने त्यांना पक्षांतर्गत भरपूर विरोध होण्याची दाट शक्यता आहे; पण फडणवीस संकटांचा सामना करून बुधादित्य राजयोगामुळे पुन्हा उच्चपदावर बसतील.

कुंडलीनुसार सध्याचा काळ भाग्योदयाचा आहे. राजयोग आहे. मात्र, पुढे ते मुख्यमंत्री होतील की नाही, हे आताच सांगता येणार नाही. 

कुंडलीनुसार सहकाऱ्यांसोबत त्यांचे मतभेद वाढतील. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबतच ते असतील.