२०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं 'हे' कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 12:45 PM2022-12-25T12:45:52+5:302022-12-25T12:48:12+5:30

राज्यातील राजकारणात सध्या शिवसेनेचे २ गट पडले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यात नेत्यांची विभागणी झालीय. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी आणि १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला तर उर्वरित १५ आमदारच उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना यांच्यात युती झाली. मात्र निकालात भाजपाचे १०६ आमदार निवडून आले त्यानंतर ५६ जागांवर विजय मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून भाजपाशी फारकत घेतली.

२०१९ च्या निकालानंतर पहिल्यांदाच राज्यात परस्पर विरोधी असलेले शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर राज्यात मविआचं सरकार स्थापन झाले त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. या घडामोडी सगळ्यांनाच ठाऊक आहेत.

परंतु २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपा उमेदवार पाडण्याचं काम केले. त्याचसोबत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्लॅनिंग, कारस्थान हे निवडणुकीपूर्वीच करण्यात आल्याचा मोठा दावा माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटात असलेले विजय शिवतारे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

विजय शिवतारे म्हणाले की, ७० जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे करून त्या जागा घालवण्यात आल्या. उद्धव ठाकरेंनी हे केले. निवडणुकीपूर्वी सेटलमेंट करण्यात आली होती. कुठल्या जागा पाडायच्या, कुठल्या जागा जिंकवायच्या आकडेवारी कशी जुळवून आणायची हे सगळं कारस्थान होतं.

महाविकास आघाडी निकालानंतर झाली नाही. ही अगोदरच झाली होती. ते लोकांना फसवलं गेले. त्यानंतर जे सरकार निर्माण झाले ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. हा उठाव करण्याचं बीज एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात मीच घातलं असा गौप्यस्फोटही विजय शिवतारेंनी केला.

साडेचार तास नंदनवनला बसलो होतो. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही. उद्धवसाहेब चुकतायेत. तुम्ही त्यांच्यावर दबाव आणा. ही आघाडी तोडली पाहिजे. भाजपा-शिवसेनेचे सरकार आले पाहिजे अशा भावना मी एकनाथ शिंदेंसमोर मांडल्या होत्या असं शिवतारेंनी सांगितले.

याआधीही विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले. राज्यात शिंदे सरकार विराजमान झाल्यानंतर विजय शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी प्रतिक्रिया देताना शिवतारेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

विजय शिवतारे तेव्हा म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांच्याशी माझी भेट झाली नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेक मागण्यांचे पत्र मी लिहिली. त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उत्तरही दिले नाही. ज्यांनी १५ वर्ष मतदारसंघ बांधला त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून लढा असा निरोप दिला जातो हा काय प्रकार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

त्याचसोबत संजय राऊतांची निष्ठा कुणाशी आहे हे जनतेला माहिती आहे. जे महाराष्ट्राला कळतं ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना का कळत नाही? राऊत यांना स्किझोफ्रेनिया आजार झाला असावा. राऊतांना आपल्यालाच सगळं कळतं असा भास होतो अशी टीकाही विजय शिवतारेंनी केली होती.