भाऊबंदकी... शिंदेंच्या स्टेजवरील जयदेव ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमधील वाद काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:59 AM2022-10-06T10:59:31+5:302022-10-06T11:33:56+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खू्र्चीवर जयदेव ठाकरे पाहायला मिळाले आणि त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन भाषणही केलं. एकनाथला कधीच एकटा नाथ होऊ देऊ नका ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे.

ते जे काही कामं करत आहेत ती भल्यासाठी आहेत. सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात, असं मोठं विधान जयदेव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आलं, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. तर, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद काय आहे, याचीची उत्सुकता आता लोकांना लागली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद उफाळून आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टातही गेला.

पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी दावा मागे घेतला आहे.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतली.

17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने सध्या याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता.

हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले होते. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला होता.

परंतु मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे, न्यायलयीन लढाईनंतर दोन्ही बंधूंमधील वाद अधिकच तीव्र झाल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यावरुन दिसून आले.