50 वर्षांपूर्वी क्रॅश झाले होते भारतीय विमान, 2013 मध्ये सापडला विमानातील खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:46 PM2021-12-08T17:46:28+5:302021-12-08T17:50:16+5:30

एका गिर्यारोहकाला फ्रान्सच्या मोंट ब्लांक पर्वतांवर 50 वर्षांपूर्वी क्रॅश झालेल्या भारतीय विमानातून खजिना सापडला आहे.

पॅरिस: तुम्ही अनेकदा खजिना सापडल्याच्या बातम्या वाचल्या असतील. बहुतांशवेळा खजिना मिळालेला व्यक्ती तो खजिना सरकारकडे जमा करत नाही. पण, फ्रान्समधील एका व्यक्तीने त्याला सापडलेला मौल्यवान खजिना सरकारला परत केला. याचे बक्षिस म्हणून त्याला या खजिन्यातील एक वाटा मिळाला आहे. विशेष म्हणजे फ्रान्समध्ये सापडलेला खजिना भारतीय आहे.

2013 मध्ये एका गिर्यारोहकाला फ्रान्समधील मॉन्ट ब्लँक येथील हिमनदीवर अनेक दशकांपासून गाडला गेलेला हिऱ्यांचा खजिना सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षांपूर्वी एका भारतीय विमानाचा या परिसरात अपघात झाला होता, त्या विमानात एका धातूच्या पेटीत हा खजिना लपवून ठेवण्यात आला होता.

या खजिन्यामध्ये हिरे, मोती आणि माणिक आहेत. क कॅमोनिक्सचे महापौर एरिक फोर्नियर म्हणाले की गिर्यारोहकाने प्रामाणिकपणे हा खजिना सरकारकडे सपुर्द करुन प्रामाणिकपणा दाखवला. त्यामुळे आता या गिर्यारोहकाला यातील एक भाग दिला जाणार आहे. याची अंदाजे किंमत 150,000 युरो ($169,000) आहे.

50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1950 आणि 1966 मध्ये मॉन्ट ब्लँकमध्ये एअर इंडियाची दोन विमाने कोसळली होती. त्या अपघातानंतर विमानाचे अवशेष त्याच ठिकाणी पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून, गिर्यारोहकांना नियमितपणे या विमानाचे अवशेष त्या ठिकाणी दिसून येतात.

विशेष म्हणजे सप्टेंबर 2012 मध्ये भारताने मुंबईहून उड्डाण केलेल्या बोईंग 707 मधून एक मेल बॅग जप्त केली होती. ही बॅग 24 जानेवारी 1966 रोजी मॉन्ट ब्लँकच्या नैऋत्य-पश्चिम भागात क्रॅश झालेल्या विमानात होती. त्या अपघातात भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख होमी भाभा यांच्यासह 117 जणांचा मृत्यू झाला होता.