मुंबई लोकलमधून प्रवास करणारा हा कोट्यधीश व्यक्ती आहे कोण?; कहाणी ऐकून कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:34 PM2023-06-20T18:34:07+5:302023-06-20T18:39:43+5:30

सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो मुंबईच्या लोकल ट्रेनमधला आहे. लोकल ट्रेनमधील एका व्यक्तीच्या फोटोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर फोटोत दिसणारी व्यक्ती सामान्य माणूस नसून कोट्यवधीची मालक आहे.

थायरोकेअरचे(Thyrocare) संस्थापक डॉ. ए. वेलुमणी साध्या कपड्यात, हातात फाईल आणि गर्दीच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत त्यांच्या कार्यालयात पोहोचले. अनेकदा अशा अब्जाधीश आणि करोडपतींचे फोटो समोर येतात, पण त्यात वाहनांचा ताफा दिसतो पण वेलुमणींचा हा फोटो लोकांची मने जिंकत आहे.

त्याचा साधेपणा पाहून लोक त्याचे कौतुक करत आहेत. आज भलेही ते करोडोंचे मालक असतील, पण त्यांचे जुनं वास्तव कधीच विसरत नाही. एक काळ असा होता की संपूर्ण घराची कमाई ५० रुपये होती, पण यशस्वी होऊनही वेलुमणी आपला भूतकाळ विसरले नाहीत.

वेलुमणी आरोक्यस्वामी यांचा जन्म १९५९ मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहणाऱ्या वेलुमणीच्या वडिलांकडे स्वतःची जमीनही नव्हती. एक वेळ अशी आली की वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना हातचे काम बंद करावे लागले.

संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. वेलुमणी हे चार भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. आईने आपल्या मुलांचा अभ्यास थांबवला नाही, त्यांना पुढील शिक्षणासाठी घरापासून दूर पाठवले. आई दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.

संपूर्ण कुटुंबाचा खर्च ५० रुपयांत चालला होता. वेलुमणी आईची अवस्था समजून घेत होते. वयाच्या १९ व्या वर्षी ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी कोईम्बतूरमध्ये केमिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. एकेकाळी त्याच्याकडे पॅन्ट आणि चप्पल घेण्यासाठीही पैसे नव्हते. डॉ.वेलुमणी यांनी बीएस्सी पूर्ण केल्यानंतरच नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

त्यांना दीडशे रुपये पगार मिळत असे. यातील १०० रुपये वेलुमणी आपल्या घरी पाठवायचे आणि ५० रुपयांवर भागवायचे. त्यांनी मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीसाठी अर्ज केला. भाभा अणुसंशोधन केंद्रात त्यांची निवड झाली. पगार म्हणून ८०० रुपये मिळू लागले.

अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी वेलुमणी यांनी कामासोबतच मुलांना शिकवणीही शिकवायला सुरुवात केली. आपल्या कमाईतील बहुतांश भाग ते आईला पाठवत असे. नोकरीसोबतच त्यांनी पीएचडीचे शिक्षणही पूर्ण केले.

त्यांनी BARC मध्ये १४ वर्षे काम केले. नोकरीतून जी थोडीफार बचत व्हायची आणि पीएफचे पैसे काढून सुमारे एक लाख रुपये घेऊन थायरोकेअरचा पाया रोवत मुंबईतच पहिली टेस्टिंग लॅब सुरू झाली. हळूहळू, देशाच्या विविध भागांमध्ये लॅब सुरु झाल्या. परंतु सुरुवातीला त्याची चाचणी केवळ मुंबईतील मध्यवर्ती केंद्रावर करत होते. सुरुवातीला ते एका फार्मा कंपनीत कामाला होते. त्यावेळचा अनुभव त्याच्या कामी आला. पहिल्या तीन महिन्यांत ते नफा कमवू लागले.

कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना लॅबमध्येच झोपावे लागे, असे अनेकदा घडायचे. पीएफचे पैसे काढून त्यांनी जी कंपनी सुरू केली, आज ती कंपनी करोडोंची आहे. २०२१ मध्ये त्यांनी कंपनीतील ६६ टक्के भागभांडवल फार्मईझीच्या मूळ कंपनीला ४५४६ कोटी रुपयांना विकले. सध्या, थायरोकेअरचे मार्केट कॅप २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. थायरोकेअर डायग्नोस्टिकची देशभरात मोठी साखळी आहे. त्यांची देशभरात ११२२ आउटलेट आणि चाचणी केंद्रे आहेत.

करोडोंचे मालक असूनही वेलुमणी साधेपणाने जीवन जगतात. नवी मुंबईतील त्यांच्या मोठ्या प्रयोगशाळेच्या वरच्या एका छोट्या भागात राहणाऱ्या वेलुमणी हे साधी जीवनशैली जगतात. त्याच्याकडे बघून ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत, याचा अंदाज कुणीही लावू शकणार नाही.