कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 03:40 PM2022-04-25T15:40:38+5:302022-04-25T16:00:36+5:30

Indomethacin : लसींच्या निर्मितीबरोबरच औषधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. देशात अशी 12 राज्ये आहेत जिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांचाही समावेश आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,541 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,22,223 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहेत. मागील काही दिवसांत शहर, उपनगरातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. लसींच्या निर्मितीबरोबरच औषधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जगाला त्रास देणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. लसींच्या निर्मितीबरोबरच औषधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे. आता सौम्य ते मध्यम कोरोनावर सहज मात करू शकेल, असे औषध निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

नव्या औषधाचे नाव इंडोमेथासिन असे आहे. कॅप्सुलच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या या औषधामुळे सौम्य ते मध्यम प्रकारचा कोरोना बरा होतो. ज्या गोष्टींमुळे शरीरात वेदना, ताप आणि जळजळ यांची निर्मिती होते, त्या पेशींची निर्मिती रोखण्याचे काम इंडोमेथासिन करते.

इंडोमेथासिनचा अभ्यास चेन्नईतील पनिमलार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये आयआयटी, मद्रास यांच्यातर्फे करण्यात आला. सुमारे 210 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. त्यातील 103 जणांना इंडोमेथासिन तर उर्वरित रुग्णांना इतर औषध देण्यात आले.

ज्या रुग्णांना इंडोमेथासिन देण्यात आले. त्यांच्यात प्राणवायूचे प्रमाण योग्य आढळून आले. इंडोमेथासिन घेतलेल्या रुग्णांची सर्व लक्षणे अवघ्या चार दिवसांत गायब झाली. अन्य रुग्णांना बरे होण्यास थोडा वेळ लागला.

इंडोमेथासिन कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर परिणामकारक ठरते. याआधी या औषधाच्या कोरोनाच्या दोन्ही लाटांदरम्यान चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी 72 रुग्णांवर औषधाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळीही औषधाचे निष्कर्ष आतासारखेच होते. सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांमध्ये हे औषध उपयुक्त ठरले.