डान्स अन् सिनेमांचं वेड, पण फुटबॉल अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ नाहीच! जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:28 PM2022-12-19T12:28:28+5:302022-12-19T12:35:59+5:30

अर्जेंटिनानं ३६ वर्षांनंतर फीफा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये फ्रान्स विरुद्धच्या रोमांचक लढतीत अर्जेंटिनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ नं मात दिली. या ऐतिहासिक विजयानंतर अर्जेंटिना देशाचं नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. भारतापासून १६,३०६ किमी अंतरावर असलेला हा दक्षिण अमेरिकी देश जगातील आठवा आणि द.अमेरिकेतील दुसरा सर्वात मोठा देश आहे.

अर्जेंटिनाच्या सीमा पाच देशांना लागून आहेत. यात उरुग्वे, चिली, ब्राझील, बोलिव्हीया आणि पराग्वे यांचा समावेश आहे. अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ पाटो (Pato) हा आहे. पण फुटबॉल सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. अर्जेंटिना जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत ३२ व्या क्रमांकावर आहे. २०१९ सालच्या जनगणनेनुसार अर्जेंटिनाची लोकसंख्या ४.६ कोटी इतकी आहे. राजधानी ब्यूनस आयर्स हे अर्जेंटिनातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. इथं १.३ कोटी लोक राहतात. तसंच अर्जेंटिना नैसर्गिस साधनसंपत्तीनं समृद्ध देश आहे.

अर्जेंटिना जवळपास ४० वर्ष स्पेनच्या गुलामगिरीत होता. पण १८१६ साली अर्जेंटिनानं स्वतंत्र्य देश म्हणून घोषणा केली. अर्जेंटिना खरंतर लॅटिन भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ चांदी असा होतो. देशातील बहुतांश लोक स्पॅनिष भाषा बोलतात आणि रोमन कॅथलिक इसाई धर्माशी जोडले गेलेले आहेत. तसंच इंग्रजी, जर्मन आणि इटालियन बोलणारेही लोक मोठ्या प्रमाणात या देशात आहेत.

एका माहितीनुसार अर्जेंटिनाचा जीडीपी ४७४.८१२ अब्ज डॉलर इतका आहे. इथं दरडोई उत्पन्न ११,५७२ डॉलर इतकं आहे. यामुळे अर्जेंटिना उच्च कमाई असणारी अर्थव्यवस्था आहे.

अर्जेंटिनामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती असतो. यासोबतच उपराष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षाची भूमिकाही महत्वाची मानली जाते. अर्जेंटिनामध्ये १९८३ साली लोकशाही प्रधान सरकार स्थापन झालं होतं आणि १९८९ साली देशाला पहिला मुस्लिम राष्ट्रपती मिळाला होता.

अर्जेंटिनात साक्षरतेचा दर अधिक आहे. देशातील बहुतांश लोक साक्षर आहेत. कारण देशात मोफत शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं. २०१० साली अर्जेंटिनाच्या साक्षरतेचा दर ९८.०७ टक्के इतका होता. अर्जेंटिनाचं साहित्य देखील जगभर प्रसिद्ध आहे.

अर्जेंटिनामध्ये फुटबॉल व्यतिरिक्त येथील लोकांना सिनेमा आणि डान्स करणं खूप पसंत आहे. त्यामुळेच अर्जेंटिनातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डान्स शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशीप योजना दिल्या जातात. अर्जंटिनाचाचा टांगो डान्स जगभरात प्रसिद्ध आहे.

अर्जेंटिनाबाबत एक म्हण आहे की इथं प्रत्येक घरात एक फूटबॉल प्रेमी असतो. देशात फूटबॉल फक्त खेळ नव्हे, तर एक परंपरा समजली जाते. ज्याचं प्रत्येक अर्जेंटियन नागरिक पालन करतो. पण असं असतानाही फूटबॉल अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ नाही. पाटो खेळाला अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पाटो म्हणजे एकाप्रकारे पोलो सारखाच खेळ आहे. ज्यात स्पर्धक घोडे सवारी करुन पोलो खेळतात.

दक्षिण अमेरिका प्लास्टिक सर्जरीसाठी ओळखला जातो. जगभरातील लोक प्लास्टिक सर्जरीसाठी द.अमेरिकेत येतात. ब्राझीलनंतर अर्जेंटिनामध्ये सर्वाधिक प्लास्टिक सर्जरी होतात. तसंच अर्जेंटिनाचा त्या देशांमध्ये समावेश होतो तिथं रेडिओचं प्रसारण सर्वात आधी केलं गेलं होतं.