सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना जीपने उडवले; दोघे ठार तर एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:50 IST2018-11-02T13:32:27+5:302018-11-02T13:50:23+5:30
सैनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगत रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या दोघा तरुणांचा जीपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.

सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना जीपने उडवले; दोघे ठार तर एक गंभीर जखमी
पूर्णा (परभणी) : सैनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगत रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या दोघा तरुणांचा जीपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. आज पहाटे झिरोफाटा मार्गावर ही घटना घडली. या भीषण अपघातात आणखी एक तरुण गंभीर जखमी असून एकजण थोडक्यात बचावला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील माटेगाव येथील संदीप उत्तम साबळे, गोविंद उर्फ नथुराम देविदास साबळे, करण रमेश साबळे व कुणाल दिनाजी साबळे हे चोघे सैनिक भरतीची तयारी करतात. यासाठी चौघेही दररोज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास माटेगाव ते नावकी पाटी दरम्यान धावण्याचा सराव करत. आज पहाटे येथे सराव करत असताना भरधाव वेगात पूर्णामार्गे नांदेडकडे जाणाऱ्या एका जीपने ( एम एच 05 बी जे 0118 ) संदीप, गोविंद आणि करण यांना जोरदार धडक दिली. यात संदीप व गोविंद या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर करण गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जीपचालक पूर्णा पोलीस स्थानकात हजर झाला आहे.
चौथा तरुण थोडक्यात बचावला
संदीप उत्तम साबळे, गोविंद उर्फ नथुराम देविदास साबळे, करण रमेश साबळे व कुणाल दिनाजी साबळे हे चोघे सोबतच सैनिक भरतीसाठी सराव करतात. आज झालेल्या अपघाता पूर्वी कुणाल हा लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला गेला होता. यामुळे जीपच्या जोरदार धडकेतून तो थोडक्यात बचावला.