आचारसंहिता लागताच परभणी शहर झाले होर्डिंग्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:39 PM2019-03-11T13:39:59+5:302019-03-11T13:41:06+5:30
रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातील होर्डिंग्ज काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
परभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग्ज काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे परभणी शहर होर्डिंग्ज मुक्त झाले आहे.
शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांवर मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावले होते. खाजगी होर्डिंग्जपेक्षा शासकीय योजनांची प्रसिद्धी करणारे होर्डिंग्ज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रशासनाकडूनच सर्वोच्च न्यायालयाच्या झिरो होर्डिंग्ज निर्णयाची पायमल्ली झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही दिल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातील होर्डिंग्ज काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, स्टेशन रोड, वसमत रोड, बस स्थानक, जिंतूर रोड आदी भागातील रस्त्यांवर असलेले होर्डिंग्ज काढून घेण्यात आले. परिणामी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहर होर्डिंगमुक्त झाले आहे.