थर्टीफस्ट जवळ आलाय तुम्ही पार्टीच्या की संस्काराच्या...कोणत्या गटात आहे ते लवकर ठरवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:00 AM2018-12-27T08:00:00+5:302018-12-27T08:00:05+5:30

थर्टीफस्ट साजरा करणार्‍यांचे दोन गट असतात. एक रात्री पार्टी करणारे, दुसरे पहिल्या सूर्याच्या स्वागताला भल्या पहाटे दबा धरून बसणारे ! तुम्ही कोणत्या गटात आहात, ते ठरवा ! - सोप नाही ते, इतकंच सांगतो

You have come close to 31 Dec.. have you decide to celebrate or not? | थर्टीफस्ट जवळ आलाय तुम्ही पार्टीच्या की संस्काराच्या...कोणत्या गटात आहे ते लवकर ठरवा!

थर्टीफस्ट जवळ आलाय तुम्ही पार्टीच्या की संस्काराच्या...कोणत्या गटात आहे ते लवकर ठरवा!

Next

-- आदित्य पाटील 

थर्टीफस्ट चा वीकेण्ड आजपासून सुरू होणार ! कुणाचे काय तर कुणाचे काय प्लॅन्स ठरलेले असतात.

पण आपल्या ‘टाइप’चं साधंभोळं-घरेलू क्राउड असतं ना, त्यांना कुणी विचारलंय की, दादा काय प्लॅन यंदा?

उत्तर एकच, काही नाही यार बघू काय तरी काय ठरत नाही आपलं. पोरं ऐन टायमाला टप्पे मारतात !

तर ज्यांचे दोस्त असे टप्पेमारू, मैत्रीची कायम ‘घरी विचारून सांगते’ याच मोडवर त्यांचं थर्टीफस्ट   कायम शेवटच्या मिनिटापर्यंत लटकलेलंच असतं ! आणि मग 1 तारखेला कुणी विचारलं की, कसा काय झाला थर्टीफर्स्ट ?
तर उत्तर सालाबादप्रमाणे तेच ‘पाहिले टीव्हीवरचेच कार्यक्रम, काय खास नव्हतं त्यात. मग झोपलो नि काय लवकर !’
कळायला लागल्यापासून आपले पंधरा-वीस थर्टीफस्ट    तरी असेच ‘गेलेले’ असतात. काही थर्टीफस्टला एकदम सात्विक झटका आलेला असतो. असले रात्री जागून धांगडधिंगा करायचे, नव्या वर्षाचं स्वागत उगवत्या किरणांच्या साक्षीनेच व्हायला हवं. पहिल्या वर्षाचा सूर्योदय तरी पाहू, त्याला वंदन करू असे ज्ञान पाजणारे व्हॉट्सअँप मेसेज आपणही वाचलेले असतात. मग पहिल्या तारखेचा पहिला सूर्याेदय पाहण्यासाठी आपणथर्टीफर्स्ट रात्री 10 वाजताच झोपून घेतो. ‘लवकर निजे लवकर उठे’चा मंत्रजप करतो. उद्यापासून आपलं आयुष्य बदलूनच जाणार याची आपल्याला प्रचंड खात्रीच असते. पहाटे उठणं, व्यायाम, दैनंदिन वेळापत्रक, अभ्यासाला पुरेसा वेळ हे सगळं मनात मुरवत डोळ्यात झोप उतरते. तिकडं सारं जग आज जगाचा शेवटचाच दिवस असल्यासारखं सेलिबेट्र करत असतं.

आपण मात्र ‘संयम’ धारण करून झोपतो. पहाटे 5 वाजता गजर होतो. अंघोळ-पावडर टिकली करून आपण उगवत्या सूर्याचं स्वागत करायला सिद्ध होतो. थंडीत सूर्यही उशिराच उगवतो याची आपल्याला काही कल्पनाच नसते. भल्या पहाटे थंडीत करायचं काय हेच माहिती नसल्यानं कुडकुडत झोपही यायला लागते. पण सूर्यदर्शन करायचं म्हणत चहा पित आपण वाट पहावी. सूर्य उगवतो. त्यापूर्वी आकाश गुलाबी होतं. शब्दश: तांबडं फुटतं, आपण मोबाइलवर उगवत्या सूर्याचे, गुलाबी गारठल्या आकाशाचेही फोटो काढतो. वेलकमिंग न्यू इअर, फर्स्ट सन असे काहीबाही लिहून हॅशटॅग लावून सोशल मीडियात टाकतो. पण लाइक-कमेण्ट करणारं पब्लिक जागंच झालेलं नसल्यानं कुणी पटपट लाइक ठोकत नाहीत. मग कितीवेळ मोबाइल स्क्रीनकडे पाहणार? पेपर तरी किती वाचणार, तोही वाचून होतो. 

तोवर भूक लागते, घरात खुडबूड सुरू होते. घरी माउली खूश असल्या तर  गरमागरम नास्ता मिळतो. तो दणकून खाऊन झाला की मस्त वाटतं. परत एक चहा मारला त्यावर की जीव सुखावतो. वाटतं भारी असतं. हे सकाळी लवकर उठणं, भरपूर वेळ असतो हाताशी उद्याही उठू, व्यायाम करू, कॉलेजात वेळेवर जाऊ, लाइफच बदलून टाकू ! सक्सेसफूल लोकांच्या ग्रेट हॅबीट्स अशाच ग्रेट असतात. हे कुठेतरी वाचलेले फॉरवर्ड आठवतं ! एकदम फिलिंग प्राउड अबाउट मायसेल्फवालं फिलिंग येतं. 
आणि त्यासोबतच येते झोप ! काय करायचं हातशी असलेल्या वेळेचं याचं काही प्लॅनिंगच केलेलं नसल्यानं आणि दोस्तांचं उजाडलेलाच नसल्यानं आपण काय करायचं हे कळत नाही. मग लोळायला सुरू होतं. पडू थोडावेळ म्हणत आपण जरा पडतो! आणि मग दुपारचे 11 वाजून जातात तरी गाढ झोप काही पांघरूण सोडत नाही. थोड्या वेळात घरातून आपल्या सन्मानार्थ कटु शब्द फुलं उधळणे सुरू होतं. आळशी, नस्ती सोंग केली, लवकर उठायची, कामं नकोत वगैरे नियमित शब्द कानाला फटके मारू लागले की जाग येते. लक्षात येतं, वर्ष बदलले, सूर्योदय नवा असला तरी आपल्या अवतीभोवतीचं वातावरण तेच आहे. आपली माणसंही तीच आहेत. ती काही बदलत-सुधारत नाहीत. 
एवढं आपण ‘सक्सेसफूल’ होण्यासाठी, ग्रेट हॅबिट डेव्हलप  करायला  सुरुवात केली. पण त्यांना काही त्याची ‘कदर’ नाही. लोकांची मुलं कुठं पाटर्य़ा करतात. पैसे उधळतात, दारू पितात, दंगा करतात यांचा तरुण मुलगा घरातच संस्कारी होण्याचा प्रयत्न करतोय तर हे बघा कसे मांजर आडवं गेल्यासारखे आडवे चाललेत!

आपण डोक्यावर पांघरूण घेऊन अशी स्वत:चीच आरती करत असतो तोवर मातोश्री  येतात नि डोक्यावरचे पांघरूण फर्रकन खेचत म्हणतात, ‘उठ, दळण पडलंय’. कालपासून गिरणीत ते आण, जेवायची वेळ झाली, कणीक नाही पोळ्यांना, गिळायला लागेल ना तुला, वरवर! 

आपण ग्रेट होण्याचा विचार करतो. यांना दळण आणायचं पडलंय, हे लोक कधीच सुधारणार नाहीत. आपली कदर नाही, आपण महान झाल्याशिवाय काही या स्ट्रगलचं कौतुक या जालीम जमान्याला वाटणार नाही असं म्हणत आपण निमूट तोंडावर पाणी मारतो नि पायात चपला सरकवून दळण आणायला जातो.. चरफडतच!
चिडचिड होते.. पण गेल्यावर्षीसारखाच नवीन वर्षाचा सुमारे अर्धा दिवस सरतो. मग नव्याचे नऊ दिवस सरतात. मग पुन्हा महिने म्हणता म्हणता वर्ष सरतं.. 
आणि आपलं ग्रेट होणं ‘असं’ राहून जातं !

दोस्तहो, हे स्वानुभवाचे बोल आहेत. भयंकर परिश्रमाने मला ही ज्ञानप्राप्ती झाली आहे. हाऊ टू सेलिब्रेट थर्टीफस्ट यावर माझी आता पीएच.डी.च होणं तेवढं बाकी आहे. त्यातून तुम्हाला काही फुकट ग्रेट टीप्स देतो, पहा ट्राय करून.. नाहीतर आहेच आपली गोधडी, काटा झोप? हॅपी न्यू इयर! 

गट क्रमांक - 1 
तुम्ही थर्टीफस्ट पार्टीवाले आहात का! 
- तर हे तुमच्यासाठी ! 
कुठून तरी, कुठल्या तरी पार्टीचे फुकट पास मिळावा, एखाद्या ग्रुपला चिकटा, खाऊन-नाचून घ्या ! रात्री कोण पाहतंय! 
फुकट पार्टी पास, भाड्यानं किंवा याचे त्याचे मागून आणा कपडे, बूट वगैरे, उगीच त्यापायी पैसे खर्च करू नका.
घरी सांगून जा, ठरत्या वेळी घरी परत या, घरी येण्यासाठी गाडी आधीच बुक करून ठेवा. 
घरच्या घरीच नाहीतर मित्रमैत्रिणी बोलवा, अंताक्षरी करा ओके, सिंगल पावभाजी हा बेत सगळ्यात आनंददायी आणि सेफ ! 

गट क्रमांक - 2 
पहिल्या सूर्याचं स्वागत गट! 
लवकर उठा; पण उठून करणार काय हे ठरवा, नाहीतर झोप उगीच हाफ डे खाते. 
फिरून या, त्यासाठी कुणी दोस्त सोबत असेल, तर बेस्ट. 
घरकाम, स्वयंपाक मदत अशी काही जबाबदारी घ्या, म्हणजे नवीन वर्षात घरातलं वातावरण आनंदी होतं. 
चौथं सगळ्यात महत्त्वाचं, झोप आली तरी झोपू नका, ती कशी उडवतात ते मात्र तुमचं तुम्हीच शोधा! 

Web Title: You have come close to 31 Dec.. have you decide to celebrate or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.