- प्राची पाठक

मला ना कुणी मित्रच नाहीत,
मित्र ना मला त्यांच्यात घेतच नाहीत.
मैत्रिणी ना मला टाळतात,
मला काहीच सांगत नाहीत.
माझ्या आत्ताच्या गु्रपमध्ये काही मजा नाही,
मला ‘त्या’ भन्नाट ग्रुपमध्ये जायचं आहे..
असं जेव्हा आपण म्हणतो,
तेव्हा आपण नक्की काय शोधत असतो?
आणि कशासाठी?

‘ते मला त्यांच्यात घेत नाहीत’, 
‘या ग्रुपमध्ये गेलो ना तरच धमाल येईल’, 
‘माझ्या आत्ताच्या ग्रुपमध्ये काहीच विशेष नाही’, 
‘मला कोणीच मित्र-मैत्रिणी नाहीत...’
या टप्प्यांवरून आपण अनेकदा जातो. 
कुणाची घरं बदलतात. वेगवेगळ्या शहरांत जावं लागतं. कॉलेज बदलतात. विषय वेगळे होतात. आधी छान असलेली मैत्री हवी तशी जास्त वेळ आता सोबत नसते. नोकऱ्या सुरू झालेल्या असतात. त्यामुळेही वेळ कमी पडतो. मैत्री करायची असते. हवी तशी मिळत नसते. कोणी आपल्याला तोडते, कुणाला आपण तोडतो. ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ हे शब्द जवळचे वाटत असतात. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ अशी गाणी कानावर पडतात. आपण आहोत त्या गु्रपमध्ये कोणीच ‘भारी’ नाही. त्या दुसऱ्याच गु्रपमध्ये सगळे भारी आहेत असं वाटत असतं. घरून आणि शाळा कॉलेजांमध्ये आपण ऐकलेलं असतं. तुमची ‘संगत’ महत्त्वाची. कुणाशी मैत्री करतात, ते महत्त्वाचं. मग आपण भारीतली संगत शोधायला निघतो. पण ते भारीतले देखील तुम्हाला भारी किंवा कमी भारी समजत असतात. मैत्री करतीलच असं नाही. 
मग आपला आटापिटा सुरू होतो. 
 ‘त्यांच्यात’ जाऊन बसायचा.
त्यांनी आपल्याला त्यांच्यात घेतलं तर ठीक; नाही घेतलं तर त्यांच्याही नावानं आपण कधी खडे फोडायला लागू सांगता येत नाही. मैत्रीपण काही सहज होत नसते. ‘हुशार मुलांशी मैत्री करा’ असा एक सल्ला पालक सतत देत आलेले असतात. कोणी पैसा-स्टेट्स-दिसणं-नोकरी पाहून इतरांशी मैत्री करतात. बसच्या रूटचे, एकाच ठिकाणी शिकायला जाणारे, एका भागात राहणारे असे लोक जास्त करून आपल्या मैत्री गटात केवळ सोयीसाठी जमा होतात. ते आपल्याला आवडतीलच असं नाही. त्यांनाही आपण आवडूच असं नाही. आपला शोध कायम दूर कुठेतरीच सुरू असतो. 
आणि मग त्या- त्या गटात आपण गेलो की शेअरिंग सुरू होतं. करिअर प्लॅन्स, अभ्यासातल्या अडचणी, घरच्या अडचणी, पैशांचे प्रश्न, नोकरीची शोधाशोध असं सगळं असतं. कॉलेजात सबमिशन्स पूर्ण करायला, अपडेट्स द्यायला, टप्पे मारायला, प्रेम करायला आणि पार्ट्याही करायला आपल्याला मित्र-मैत्रिणी हवेच असतात. यात कोणीतरी अगदी एकटे पडलेलेपण असतात. ते कोणत्या ग्रुपमध्ये नसतात आणि सगळ्यांचे थोडे थोडे मित्रही नसतात. त्यांना तर बिचाऱ्यांना कोणीच वाली नसतो.
त्यांची मोठी फाईट असते. स्वत:च्या एकटेपणाशी आणि मग समोरचे गु्रप्स, त्यांचे आनंद, एकत्र असणं बघून आणि आपल्यातला न्यूनगंड बघून त्यांचा एक झगडा सतत सुरूच असतो.
त्यात मुलांनी मुलांसोबतच राहावे/ फिरावे आणि मुलींनी मुलींसोबत, असेही नियम अजूनही कुठं कुठं असतात, तर कुठे छान मोकळीक असते. 
मग आपण परत झुरत बसतो. त्या ‘तिकडे’ कशी मोकळीक आहे. आम्ही मात्र असेच ग्रुप्स करू शकतो. फक्त मुलांचे. फक्त मुलींचे. त्यात मुलीच्या जातीने सांभाळून राहावं हा एक सल्ला कायम पाठीवर ओझ्यासारखा वाहून न्यायचाच असतो. मुलांनाही व्यसन तर लागत नाही ना यावर पालकांचा वॉच असतो. या सगळ्या कचाट्यातून जाऊन मैत्री शोधायची कशी आणि कुठे? 
प्रश्न तोच की, आपल्याला आवडतील असे चांगले गु्रप्स मिळणार की नाहीत? मिळणार तर कसे?
याला खरं तर फार सोपं उत्तर आहे आणि फार अवघडदेखील! 
आधी आपल्याला स्वत:ला एक प्रश्न विचारावा लागेल.
तो म्हणजे, आपल्याला स्वत:शीच मैत्री करता येतेय का?
आणि मग त्यानंतर पुढच्या काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील.
आपल्याला का त्या ग्रुपमध्ये जायचं आहे? 
नुसतं कोणी आपल्याला ‘त्यांच्यात’ घेतलं तर आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न, अडचणी संपणार आहेत का? तेच सर्वोत्तम शेअरिंग असणार आहे का? की त्या ग्रुपमध्ये जाऊनदेखील आपले प्रश्न आपले आपल्यालाच पार पाडायचे आहेत? तिथेही आपल्याला समजून घेणारे भेटतीलच असं कशावरून ठरवलं आपण? तिथे जाऊन वेगळी भांडणं, असूया, नात्यांमधील हेवेदावे सुरू होणार नाहीत कशावरून? सध्याच्या मित्रांमध्ये काहीच चांगले सापडत नाहीये का? 
मनातल्या शेअरिंगला एक जरी जवळचा माणूस असला तरी तो पुरेसा असतो. आपल्याला थोडीच आकाशवाणी करायची आहे आपल्या शेअरिंगची? 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर धडाधडा कोसळणारे फॉरवर्ड्स हेच आपले शेअरिंग आहे का? यालाच ग्रुप म्हणायचे का? 
बरं, शेअरिंग करून मन हलके होईल, पण ते कितीदा हलकं करायचं आहे? कोणाकडे? हे ठरवावं लागेल ना. सारखे आधारच शोधणार का आपण? ‘आपला आधार आपल्याला’ असं कधी होणार? 
या प्रश्नांची उत्तरं शोधली ना तर अनेक गोष्टी सोप्या होतात.
मान्य आहे की, समवयीन मित्र-मैत्रिणींमध्ये जायची आणि गुपितं शेअर करायची मजा असतेच. पण अगदी हवं तसं कोणी कायमच मिळेल असं नाही ना. त्यासाठी अडून बसायची, एकटं वाटून घ्यायची, कोणी आपल्याला कमी लेखतं असे वाटायची काहीच गरज नाही. आपली दोस्ती आपल्या स्वत:पासून सुरू करायची. 
ते आपल्याला त्यांच्यात घेत नाहीत, यासाठी रडायचं मग कारण उरेल का?
सोचो तो जानो!

( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)