तुमची प्रेरणा कोणती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:32 AM2018-03-29T08:32:29+5:302018-03-29T08:32:29+5:30

तुम्ही एखादं काम भीतीपोटी करता की आनंदाने? काय जमलं नाही हे सांगता, की काय जमलं हे तपासता?

Which is your inspiration? | तुमची प्रेरणा कोणती?

तुमची प्रेरणा कोणती?

Next


- चिन्मय लेले

अमुकतमुक माझी प्रेरणा आहे, ढमुक गोष्टीमुळे मला प्रेरणा मिळाली ही वाक्यं आपण किती सहज म्हणतो. पण खरंच अशी काही बाह्य प्रेरणा असते की आपण आपल्याच अंतस्थ प्रेरणांमुळेच आयुष्यात पुढं पुढं सरकत असतो आणि रोजच्या जगण्यात अशा प्रेरणा काम करतात. फक्त त्या आपल्याला ओळखता आल्या तर आपल्या जगण्याचं सुकाणू आपल्या हातात राहतं. तेच कळत नाही म्हणून आपण जे ठरवतो ते होतं किंवा होत नाही.
असं सांगणारा एक अभ्यास आहे. अमेरिकेतील विनिपेग विद्यापीठातल्या ओलिया बुलर्ड यांनी केलेला. त्या म्हणतात, माणसाच्या मेंदूत दोन प्रकारच्या प्रेरणात्मक व्यवस्था कार्यान्वित असतात. पहिली असते तिला म्हणायचं प्रोत्साहनपर यंत्रणा. ही यंत्रणा आपल्याला मिळालं काय, मिळवलं काय याच्या जोरावर माणसाला पुढं पुढं जायला मदत करते. दुसरी असते प्रतिबंधात्मक यंत्रणा. जी माणसाला सतत शिक्षेची भीती दाखवते. म्हणजे काय तर सतत आपलं काय नुकसान होईल या धास्तीत जगवते. दोन्हीही यंत्रणा माणसाला कामालाच लावतात. मात्र जो यशस्वी होतो, ज्याची स्वप्नं आणि लक्ष्य पूर्ण होतात त्या माणसांच्या शिक्षेपेक्षा बक्षीसाधारित प्रेरणाच अधिक प्रबळ असतात. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षा होईल या भीतीनं काम न करता, आपल्याला जमेल, जमतेय या इच्छेनं काम केलं तरच यशाचे टप्पे जास्त पटकन दिसतात.
हा अभ्यास प्रेरणांचा हा प्रकार जास्त सोप्या भाषेत उलगडून सांगतो.
एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या टीमला एक लाख वस्तू विकायच्या आहेत. आणि त्यांच्या बॉसने रोज आरडाओरडा केला की, किती हळू काम करता, ही एवढी विक्री झाली नाही तर नोकरीवरून काढून टाकीन. तर लोक विक्री वाढवतात, प्रयत्न करतात, पण त्यांच्या मनात नोकरी जाण्याची धास्ती असते; आपलं लक्ष्य गाठण्याची, टार्गेट पूर्ण करण्याची आनंदी भावना नसते.
त्याउलट एखादा बॉस म्हणतो की, आपण शून्यातून सुरू केलं, हळू प्रगती करतोय पण आठ दिवसांत पाच हजार वस्तू विकल्या म्हणजे जमेल आपल्याला. प्रयत्न करा. तर आपण काहीतरी केलं, मिळवलं याचा आनंद टीमला होतो आणि ते अधिक जिद्दीनं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करतात.
मुद्दा काय, परिस्थिती तीच पण आपली प्रेरणा काय यावर आपला काम करण्याचा आनंद आणि त्यानंतरचा निकाल अवलंबून ठरतो. भीतीपोटीही काम होतंच, पण त्यात आनंद नसतो तर राग किंवा चीड असते. या नकारात्मक भावनांसह जगणं जास्त क्लिष्ट होतं.
हा अभ्यास म्हणतो की, आपली प्रेरणा अशी प्रोत्साहनस्नेही आहे की भितरी हे समजलं तर ती बदलूनही घेता येते. आपण आपल्या प्रेरणांना सकारात्मक आयाम दिला तर आपली ध्येयप्राप्ती सहज आणि आनंददायी होऊ शकते. त्याला बुलर्ड मोटिव्हेशनल अ‍ॅप्रोच म्हणतात. तो योग्य असेल तर गोष्टी सोप्या हातात.
त्यासाठी करायचं काय?
त्यावर एक छोटा उपाय म्हणजे, पुढे नाही तर मागे पाहायचं.
म्हणजे काय तर?
उदाहरणार्थ आपण १० किलोमीटर चालत निघालोय तर आपण सतत अजून ८ किलोमीटर राहिले, मला काही वेगच नाही असं म्हणून चालणार?
की, माझा वेग कमी आहे तरी मी दोन किलोमीटर चालत आलो. मस्त वाटतंय असं म्हणणार?
दुसऱ्या टप्प्यातल्या प्रेरणेत तुम्ही स्वत:ला प्रोत्साहन देता आणि पुढे ८ किलोमीटर सोपे होतात.
तेच करायचं. आपण ज्या शून्यातून सुरुवात केली, त्याकडे पाहिलं तर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ती सकारात्मक प्रेरणा.
ठरवायचं आपण, आपल्याला आनंद हवा की भीती?

Web Title: Which is your inspiration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.