प्रेशर कुकरची व्हॅलेण्टाइन शिट्टी

By admin | Published: February 8, 2017 03:08 PM2017-02-08T15:08:27+5:302017-02-08T15:08:27+5:30

प्रेम आहे ना कुणावर, मग ते अमुक पद्धतीनंच साजरं करा, तमुकच गिफ्ट द्या, ढमुकच रंगाचे कपडे घाला, हे कुणी ठरवलं? आणि ठरवलं असेलही, तर त्या चाकोरीत झापड लावून आपण का फिरायचं? असेल कुणावर प्रेम, तर आपल्या पद्धतीनं करू.. नसेल कुणी, तर आपले आपण जगू बिनधास्त त्यात काय लोड घ्यायचा?

Pressure cooker valentine bleed | प्रेशर कुकरची व्हॅलेण्टाइन शिट्टी

प्रेशर कुकरची व्हॅलेण्टाइन शिट्टी

Next
- प्राची पाठक

प्रेम म्हणजे ‘केमिकल लोचा’ हे एक वाक्य एकदम हिट असतं तरुण जगात.
पण कितीही केमिकल्स असले, तरी ते वापरून प्रेम करायची ठरावीक अशी एक रेसिपी नसते! 
प्रेमात हे झालं की ते करावं असा काही प्रोटोकॉल पण नसतो. 
आणि तरीही व्हॅलेण्टाइन्स डे जवळ आला की गडबड सुरू होतेच. सगळे प्रोटोकॉलच्या मागे धावतात. काहींना (असलेल्या) व्हॅलेण्टाइनला काय गिफ्ट द्यावं, प्रेमाचा दिवस कसा साजरा करावा हे टेन्शन असतं. कुणाला याच दिवशी कुणाला तरी प्रपोज करायचं असतं. कुणाला वाटतं, ‘साला, नकार आला तर दरवर्षी याच प्रेमाच्या दिवशी हीच दिल टूट गया आठवण येत राहील. आपण या दिवशी थेट प्रपोज नको करायला. किंवा केलंच, तर आपल्याला ‘हो’ आलाच पाहिजे. ते नातं कायमचं टिकलंच पाहिजे, असं प्रॉमिस घेऊन टाकलं पाहिजे. पण नाहीच टिकलं तर अशी नकाराची किती भीती असते. 
कुणाला वाटतं आपलं प्रेम आहे की नाही? यापेक्षा चांगलं कोणी नंतर सापडलं तर? ओढ वाटतेय म्हणजे प्रेम का? आकर्षण म्हणजे प्रेम का? घरचे काय म्हणतील? त्यांना कधी सांगायचं? सांगायचं की नाही? कधी एकदा फेसबुकवर रिलेशनशिप स्टेटस अपडेट करेल, असं अनेकांना झालेलं असतं! 
कुणाला जोडीचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी लावायचा असतो. मन आणि शरीर दोन्ही प्रेमाच्या कल्पनेत आपल्याला हतबल करून टाकतात. करून बघायला काय हरकत, असंही वाटत असतं. आधी प्रेम आहे हे त्या व्यक्तीला सांगायचं कसं करायचं हा त्रास आणि मग आहे ते प्रेम दाखवायचं कसं हे टेन्शन!
आणि म्हणे..प्रेमाचा दिवस.
कसला आलाय प्रेमाचा दिवस?
जणू स्पर्धा लागलीये! 
विचार करा, स्वत:च्या नकळत त्या स्पर्धेत आपणही उतरतो का?
ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांचं तर काय होतं? प्रेमाच्या दिवसाचे इतरांचे फोटो पाहून त्यांनाही वाटतं की मला व्हॅलेण्टाइन आहे, पण तिने /त्यानं माझ्यासाठी हे केलं नाही, ते केलं नाही. लगेच तुलना सुरू होते. त्यात ज्यांना कोणी व्हॅलेण्टाइन नाही, ते बिचारे एकटे पडतात. 
पण विचार करा, आपल्याला कोणीतरी प्रेमाचे असलंच पाहिजे, हे प्रेशर किती भयानक आहे! नसेल तर कुठून आणायचं? इतरांचं पाहून आपल्यालाच कोणी मिळत नाही, आपल्यात काही कमी आहे, आपण एकटेच आहोत, या विचारांशी एकट्यानंच लढायचं? सगळे गिफ्ट्स आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आणि आपण एकाकी एका कोपऱ्यात? अगदी ठरवून एकटे आणि मजेत एकटे राहणाऱ्यांनादेखील या दिवसाचं टेन्शन यायला लागतं. मग आपण कुठेतरी वाचतो, आपल्याला अगदी तसा व्हॅलेण्टाइन नसला जोडीदार म्हणून, तरी काय झालं आपण आईला, वडिलांना, शिक्षकांना, शेजाऱ्यांना, बहीण- भावाला, आजी आजोबांना, अजून कोणाकोणाला व्हॅलेण्टाइन मानू... 
बास! ही एक पळवाट काढली की आपण पण जोडीदारवाल्यांच्या प्रेशर कुकरमध्ये! कसा साजरा करायचा हा दिवस? काय गिफ्ट द्यायचं? किती महागाचं द्यायचं? आपल्याला काय गिफ्ट मिळेल समोरून? ते आवडेल का? सरप्राइझ द्यायचं का? कसं? ते फ्लॉप झालं तर? 
पण हे सारं करताना एक लक्षात येतंय का? प्रेम करणं आणि प्रेम दाखवणं यात फार फरक आहे. प्रेम करणं ही छान गोष्ट आहे. प्रेमासाठी असा दिवस असणं पण मस्त आहे. पण केलेलं प्रेम दाखवायचं टेन्शन येणं, असाच फोटो काढू, तसंच सेलिब्रेट झालं पाहिजे, असेच गिफ्ट्स दिले पाहिजेत, अमुक ठिकाणीच गेलं पाहिजे, आपल्याला कोणी तरी जोडीदार पाहिजेच हे सारं काय आहे? कुणीतरी करतंय म्हणून झापडं लावून आपण करणं?
आणि प्रेम नाही तर हे ‘ठरल्याप्रमाणं’ करणं हे आपल्या ताणाचं मूळ आहे. प्रेम राहतं बाजूलाच आणि कित्येक वेळा फक्त प्रोटोकॉलला महत्त्व येतं. या प्रोटोकॉलमुळे ‘आॅपेरेशन यशस्वी पण पेशंट मेला’ अशी स्थिती होऊ शकते! हार्ट्स, चॉकलेट्स, महागड्या गिफ्ट्स, कार्ड्स, फुलं, बुके असं सारं विकतचं घेऊनच प्रेम व्यक्त करता येतं, असं काही नाही. कोणाकडे नसले इतके पैसे तर? मग त्यांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांचा हेवा करत बसायचा की काय? त्यात आपल्या आयुष्याचा विचार आपण करण्यापेक्षा दुसऱ्याच्याच आयुष्यात डोकावत बसायची सवय लागते. त्यानं आपल्या आयुष्यातले प्रश्न तर सुटत नाहीतच, पण आहेत ते प्रश्नही अजूनच बिकट होत जातात. 
त्यामुळे, सगळं प्रेम असं त्या एका दिवसाला बांधून टाकायची काय गरज? 
लव्ह इज आॅलवेज इन द एअर!
प्राची पाठक


प्रेम आहे, पण पैसे नाहीत..
तुमचं कुणावर खूप प्रेम आहे. व्हॅलेण्टाईनच ना म्हणजे. पण डे साजरा करायला पैसे नाहीत. मग आपण एक करू शकतो का? या निमित्तानं पैसे कमावण्याबद्दल एकमेकांचे विचार जाणून घेता येतात का पाहा. एखादं गिफ्ट आपण कमावलेल्या पैशात एकमेकांना पुढच्या वर्षी देऊ. करिअरचं काही टार्गेट एकमेकांशी बोलून ठरवू. एखादं गिफ्ट आपण एकमेकांसाठी स्वत: बनवू. आधीच नोकरीला असू, तर एकमेकांना विचारू आपल्या आवडी निवडी. प्रेम पैशात, गिफ्ट्समध्येच मोजायची काय गरज? त्याचं टेन्शन घ्यायची तर त्याहून गरज नाही. एकमेकांसोबत छान वेळ घालविला, गप्पा मारल्या, तरी आनंद काही कमी होत नाही..


एकटेच आहात, तर मग काय?
मलाही व्हॅलेण्टाइन असलाच पाहिजे, ही अपेक्षा फारच टोकाची आहे. मिळेल की कालांतरानं. कदाचित हवं तसे कोणी मिळणारदेखील नाही. पण म्हणून तुमचे आयुष्य एकदम बोगस व्हायची गरज काय? त्यापेक्षा सध्या एकटे आहात तर तुम्ही किती स्वतंत्र आहात, त्याचं सेलिब्रेशन करा. ते कराल की नाही? अगदीच एकटं वाटत असेल, तर असे अजून एकेकटे मित्र-मैत्रिणी एकत्र या आणि सगळ्यांनी एकत्र धमाल करा. गप्पा मारा, गाणी म्हणा, नाचा. यात गिफ्ट्सचा प्रोटोकॉल कुठं आला? अशा सेलिब्रेशनमध्ये ‘इथे कोणीतरी सापडेलच’ अशा अपेक्षेने जाऊ नका. मुळात स्वत:ला आधी नीट जाणून घ्या. समोरच्याला जाणून घ्या. पुढच्या पाच वर्षांनी हे नातं कुठं असेल, अशी चर्चा करून बघा. मनमोकळं बोला. त्यातूनच एकेक गाठ सुटत जाईल. सगळं एकदम क्लिअर दिसायला लागेल. 
बाकी, प्रेमाच्या गप्पा करायला फक्त एक दिवस पुरेसा नाहीच. 
एखादा दिवस स्पेशल असेल. पण एखादा दिवस म्हणजे आख्खं प्रेम नाही! 
 
 ( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

prachi333@hotmail.com

Web Title: Pressure cooker valentine bleed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.