एक गोळी रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:34 AM2018-03-29T08:34:22+5:302018-03-29T08:34:22+5:30

थायरॉईड हा आजार नाही, कमतरता आहे. एक गोळी रोज घेतल्यानं ही उणीव भरून काढता येते, मग इतका संशय का घेता?

One pill daily | एक गोळी रोज

एक गोळी रोज

- डॉ. यशपाल गोगटे

एकदा हायपोथायरॉईडीझमचं निदान झालं की मनात अनेक शंका-कुशंका घर करतात. अनेकांकडून मिळणारे सल्ले या दुविधेत भर घालतात. काय करावं कळत नाही. त्यावर उपाय एकच, ऐकावे जनाचे; पण करावे मनाचे. आपल्या डॉक्टरांच्या मताशी ठाम राहून औषध योजना सुरू करावी. खरं तर हायपोथायरॉईडीझमचा आजार हा थायरॉईड हार्मोन्सच्या एका छोट्या गोळीनं नियंत्रणात ठेवता येतो. शरीरामध्ये थायरॉईड हार्मोन्स ज्या घटकांपासून बनतात तेच रासायनिक घटक वापरून हे औषध तयार केलं जातं. शरीरात नैसर्गिकरीत्या बनणाऱ्या हार्मोन्सप्रमाणेच ही फॅक्टरीत बनलेली गोळी काम करते. शरीरामध्ये योग्य प्रमाणात असलेले थायरॉईड हार्मोन्स कधीही नुकसान करत नसतात, तसेच योग्य प्रमाणात घेतलेली थायरॉईडची गोळी काहीही अपाय करत नाही, उलट फायदाच करते. थायरॉईडच्या या गोळीचा डोस त्या व्यक्तीच्या टीसीएचचं वाढलेलं प्रमाण, वजन, वय व आजाराचा काळ इ. यावरून ठरत असते.
प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगळी असते आणि शरीर प्रकृतीही भिन्न असते. जसे प्रत्येकाच्या बूट-चपलांचे माप वेगवेगळे असते, त्यानुसार फक्त चपलेचा नंबर न पाहता आपल्या पायात योग्य प्रकारे फिट होणाºया चपला आपण घेतो. तसेच हायपोथायरॉईडीझमच्या आजारावर उपचार करताना लागणारा थायरॉईडच्या गोळीचा डोस वेगवेगळा असू शकतो. काहींचे एकदम कमी डोसवर निभावते तर काहींना अगदी अव्वाच्यासवा डोस लागतो. त्यामुळे इतरांशी तुलना न करता, थायरॉईडच्या गोळीचा डोस न पाहता आजार नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं.
डोस घ्या रोज
आपल्या शरीराला थायरॉईड हार्मोन्सशी आवश्यकता अत्यल्प प्रमाणात असते; परंतु सुदृढ शरीराचा पाया या हार्मोन्सवरच उभा असतो. त्यामुळे या गोळीचा डोस रोज घेणं गरजेचं असतं. आपल्या दैनिक चयापचय क्रिया या हार्मोन्सवरच अवलंबून असतात. पोटात असलेल्या अन्नामुळे या गोळीच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो म्हणून ही गोळी उपाशी पोटी घेणं गरजेचं आहे. गोळी घेतल्यानंतर कमीतकमी अर्धा ते एक तास काही खाणंपिणं टाळल्यास त्याचा फायदा होतो.
हार्मोन्स जिथे संदेश पोहोचवतात त्या पेशीवरील भागाला रिसेप्टर असं म्हणतात. हार्मोन्सची तुलना पोस्टमनशी केल्यास, पिनकोडच्या मदतीने पत्र अचूक पत्त्यावर पोहोचतं तसंच रिसेप्टरही हार्मोन्ससाठी पिनकोडचे काम करतात. हार्मोन्सचं प्रमाण व रिसेप्टरची संख्या यांचं प्रमाण बºयाचवेळा व्यस्त असतं. सविस्तरपणे सांगायचं झाल्यास रक्तात हार्मोन्सचं प्रमाण वाढलं, तर रिसेप्टरची संख्या कमी होते व हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं, तर रिसेप्टरची संख्या वाढते.
हायपोथायरॉईडीझमच्या आजारात सुरुवातीच्या काळात, वरील गणिताप्रमाणे हार्मोन्स नसल्यामुळे रिसेप्टरची संख्या वाढलेली असते. त्यामुळे थायरॉईडच्या गोळीचा डोस कमी प्रमाणात पुरेसा होतो. या उलट थायरॉईडची गोळी चालू केल्यावर, नैसर्गिक नियमाप्रमाणे हळूहळू रिसेप्टरची संख्या रोडावते व हार्मोन्सच्या औषधाचा डोस वाढवावा लागतो. हे न समजल्यामुळे हार्मोन्सच्या आजारात नेहमी औषधाचा डोस वाढतच जातो हा भ्रम पसरला आहे.
त्यामुळे हे सारं बाजूला ठेवा, उचित डोस घ्या, हे उत्तम.


आजार नव्हे, कमतरता
हायपोथायरॉईडीझम हा आजार नसून ही शरीरात झालेली थायरॉईड हार्मोन्सची कमतरता आहे. त्यामुळे थायरॉईडची गोळी घेण्याशिवाय या आजाराला दुसरा कुठलाही पर्याय नाही. जशी पाण्याची तहान ही पाण्यानेच भागते, तसेच थायरॉईड हार्मोन्सची कमतरता फक्त थायरॉईडच्या गोळीनेच दूर होऊ शकते. हायपोथायरॉईडीझम पूर्णपणे बरा होऊन, गोळी घेणे कधी थांबेल हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. याचे उत्तर न मिळाल्यास इतर औषधपद्धतींमध्ये यावर इलाज आहे का? याचा तपास केला जातो. काही काही वेळेस कोणीतरी खोटी आशा दाखवून, आजार बरे करण्याचं आश्वासन देऊन पैशांची लूट करतात. कुठल्याही उपचारपद्धतीत या आजाराला कायमस्वरूपी उपाय नाही व निघणेदेखील अवघड आहे. मनातील सगळ्या शंका-कुशंका दूर सारून नियमित थायरॉईडचे औषध घेणं गरजेचं आहे. हीच हायपोथायरॉईडीझमला नियंत्रणात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन्सतज्ज्ञ आहेत.)
dryashpal@findrightdoctor.com

Web Title: One pill daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.