मुद्राराक्षस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:35 AM2018-05-31T10:35:01+5:302018-05-31T10:35:01+5:30

बिटकॉइन नावाच्या आभासी चलनाविषयी आपण किती ऐकतो? पण त्याचा ‘व्यवहार’ चालतो कसा?

mudrarakshash | मुद्राराक्षस

मुद्राराक्षस

Next

-डॉ. भूषण केळकर
गेल्या आठवड्यात आपण थ्रीडी प्रिंटिंगविषयी बोललो. अमेरिकेतल्या एका विद्यार्थिनीने मला सांगितलं की ग्रॅबकॅड, शेपवेज नावाच्या कंपन्यांची ओळख आपल्या वाचकांना व्हायला हवी. विशेषत: ग्रॅबकॅड ही तर क्लाउडवर आधारित विनामूल्य सेवा आहे. विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांनी याचा जरुर लाभ घ्यावा. काही डिझाइन वा कल्पना डोक्यात असेल तर त्याचं कॅडमधील रूपांतर तुम्ही फुकट करून घेऊ शकाल. प्रत्यक्ष वस्तू बनवून घेण्यासाठी अर्थात पैसे मोजावे लागतील.
आपली लेखमाला इण्टरॅक्टिव्ह होते आहे याचं अजून एक उदाहरण म्हणजे बऱ्याच वाचकांनी मला बिटकॉइन यावर काही लिहा अशा ई-मेल्स पाठवल्या. खरं तर क्रिप्टोग्राफी आणि बिटकॉइनचे ट्रेडिंगसाठीचे (शेअर बाजारात असतात त्या प्रकारच्या ट्रेडिंगचे) सल्ले या दोन भागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. आपल्या लेखमालेच्या इंडस्ट्री ४.० विषयात बिटकॉइन प्रत्यक्षरीत्या येत नाही. परंतु इंडस्ट्री ४.० च्या या भौतिक अभासी विश्वात, कमी-अधिक काळात ही आभासी चलने येणार आहेत हे मात्र सत्य आहे. म्हणून आणि लोकाग्रहास्तव मी बिटकॉइनबद्दल थोडेफार मुद्दे तुमच्यासमोर मांडतो आणि मग आपण आयओटी अर्थात इंटरनेट आॅफ द थिंग्जबद्दलचा आपला संवाद पुढे नेऊ..
तर बिटकॉइन. सुमारे नऊ वर्षांपूर्वी, २००९ मध्ये, ‘सातोशी नाकामोटो’ या गोष्टीनं बिटकॉइन प्रकरण निर्माण केलं. हे जपानी माणसाचं नाव वाटत असलं तरी बिटकॉइन हे सर्वच आभासी असल्यानं याचा नेमका प्रवर्तक व उद्गाता कोण आहे हे कोडंच आहे.
बिटकॉइन हे काय नेमकं ‘नाही’ ते आपण आधी पाहू म्हणजे ते काय ‘आहे’ ते कळायला मदत होईल.
आपले नेहमीचे वापरातील रुपये, डॉलर्स, पाउण्ड इ. विनिमयाची चलनं ही भौतिक आहेत. (नोटा, नाणी इ.), बिटकॉइन हे चलन संपूर्ण आभासी आहे. भौतिक नाही.
प्रत्येक देश किती चलन बाजारात आणेल यावर मर्यादा नाही. परंतु बिटकॉइनला मर्यादा आहे.
देशाची एक मध्यवर्ती नियंत्रक संस्था ही चलन, त्याचे व्यवहार यावर नियंत्रण ठेवते. बिटकॉइन ही विकेंद्रीकरण असणारी प्रणाली आहे. त्यावर रिझर्व्ह बँक वगैरे सारखं नियंत्रण नाही. म्हणून याला पिअर टू पिअर अर्थात पीआयपी म्हणतात.
बिटकॉइन म्हणजे इ पेमेण्ट नव्हे ! इ-पेमेण्ट मग ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ‘भीम’ अ‍ॅप वा अन्य काही पद्धतीने असलं तरीही ते शेवटी रुपये- पैसे या भौतिक चलनाशी व रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीशी संलग्न आहे.
बिटकॉइन म्हणजे बार्टर सिस्टीम. वस्तुविनिमय प्रणालीसुद्धा नाही. वस्तुविनिमय प्रणालीमध्ये गहू देऊन तांदूळ घेणं, ऊस देऊन कापड घेणं व त्यात पैशाचा वापर नसणं हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण. बिटकॉइनमध्ये वस्तू व सेवा यांचे भाषांतर कॉमन चलनात होतं!
बिटकॉइन, इथेरिअम, लाइटकॉइन ही क्रिप्टॉलॉजीची उदाहरणं.
हे बिटकॉइन कसं चालतं?
तर ब्लॉकचेन प्रणालीमध्ये ‘अ’ व्यक्ती ‘ब’ व्यक्तीला काही ‘क्ष’ बिटकॉइन देते. हे सर्व ‘अ’ आणि ‘ब’च्या संगणक नोडवर होते. ही ब्लॉकचेन म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली लोकांची बँक होय! ‘अ’ व ब’ हे नोड्स म्हणजे तुम्ही - आम्ही ! आपण सर्वजण या बँकेच्या एकेक नोंद आहोत.
मग तुम्ही नोड म्हणजे शृखंलेतील एक कडी म्हणून बिटकॉइनचा विनियोग करू शकता वा त्याची निर्मितीपण करू शकता. त्यासाठी तुम्हाला लागेल पुरेशी क्षमता असणारा संगणक वा संगणकाची मालिका इंटरनेटला जोडलेली!
यात सिक्युरिटीमध्ये, क्रिप्टॉलॉजीमध्ये दोन संज्ञा येतात पब्लिक की व प्रायव्हेट की. पब्लिक की म्हणजे ती तुम्ही जगजाहीर करू शकता. पण प्रायव्हेट की मात्र तुमची खासगी. हे क्रिप्टॉलॉजीच्या सुरक्षिततेचं रहस्य. समजायला सोय म्हणून सांगतो की बँकेच्या लॉकरला दोन किल्ल्या लागतात. एक बँकेकडची, दुसरी तुमची ! तसंच ‘पब्लिक की’ आणि ‘प्रायव्हेट की’ वापरल्याशिवाय व्यवहार होत नाही!
आपण हल्ली वाचतोय की, लाच मागणं हे या आभासी चलनानं सोप झालंय ! कारण यामध्ये माणसाला ट्रेस करणं अवघड असतं.
मी कॉलेजमध्ये असताना ‘पाणीपुरी’वाल्याकडे आमचेही कॅशलेस अकाउण्ट असायचे, या इंडस्ट्री ४.० मध्ये जग फारच पुढे आलंय ! आधुनिक काळातला हा ‘मुद्राराक्षस’ काय करतो बघू!

लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com

Web Title: mudrarakshash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.