या फ़ुटबाँल वर्ल्डकपने शिकवलेले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:00 AM2018-07-12T03:00:00+5:302018-07-12T03:00:00+5:30

रविवारी फुटबॉल वर्ल्डकप फायनल . एक थरारक प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. काय दिसलं या प्रवासात? कुठले धडे नव्यानं गिरवायला मिळाले.?

Lessons taught by this football World Cup | या फ़ुटबाँल वर्ल्डकपने शिकवलेले धडे

या फ़ुटबाँल वर्ल्डकपने शिकवलेले धडे

Next
ठळक मुद्दे.अब ‘कतार’में है!

- चिन्मय भावे

फुटबॉल वर्ल्डकप  स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण पोहोचलो आहोत. रशियाच्या रंगीत संस्कृतीची छाप या स्पर्धेवर तर आहेच, पण ही स्पर्धा डार्क हॉर्सेसची आणि अनपेक्षित निकालांची आहे. वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकाल लागणं ही गोष्ट नवीन नाही. पण, यावेळी जागतिक फुटबॉलचे चित्न बदललं म्हणावं की काय इतपत धक्के या स्पर्धेत पाहायला मिळाले. या धक्क्यांची सुरुवात स्पर्धेआधी निवड फेरीतच सुरू झाली. इटलीसारखा चार वर्ल्डकप जिंकलेला संघ रशियात पोहोचला नाही, हॉलंडसारख्या प्रतिभावान टीमलासुद्धा निवड फेरीत यश लाभलं नाही. अमेरिका आणि चिलेसारखे संघही या स्पर्धेत आपले स्थान पक्के करू शकले नाहीत. स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून आलेला आणि 2002 पासून सतत किमान उपांत्य फेरीत पोहोचणारा जर्मनी संघ पहिल्या फेरीतच बाद झाला आणि धक्क्यांची मालिका सुरू झाली. अर्जेटिना, स्पेन हे पूर्व वर्ल्डकप विजेते आणि पोर्तुगाल युरोपियन चॅम्पियन सगळे देश नॉक आउट फेरीच्या पहिल्याच टप्प्यात गारद झाले.
त्यांची जागा घेतली बेल्जियम, क्रोएशिया, यजमान रशिया या संघांनी. युरुग्वे हा दोनदा वर्ल्डकप जिंकलेला देशही उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिल या पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या देशासह बाद झाला. नंतर रशियाही क्रोएशियाकडून हरलाच.
हा उलटफेर थरारक असताना काही गोष्टी आजवर तरी या वर्ल्डकपमध्ये प्रामुख्यानं दिसल्या.

1) छोटा पॅकेट बडा धमाका

 मोठय़ा देशांमध्ये व्यावसायिक फुटबॉल लीग आहेत. नेटकी व्यवस्था आहे. आर्थिक सुरक्षितता आहे. ट्रेनिंगसाठी उत्तम सोयीसुविधा आणि वैज्ञानिक, तांत्रिक मदत आहे. त्यामुळे अशा देशांच्या टीम्स यशस्वी ठरणं हे आश्चर्यकारक नाही. पण या वल्र्डकपमध्ये नवख्या टीम्सनीसुद्धा चमक दाखवली. एकीकडे जरी मोठी नावं अपयशी ठरत असली तरी नवीन तार्‍यांचा उदय या स्पर्धेत झालेला आपल्याला दिसतो. आइसलॅण्ड आणि पनामा या देशांनी या स्पर्धेत पदार्पण केलं.  आइसलॅण्डने तर अर्जेटिनाला बरोबरीत रोखून खळबळजनक निकालही नोंदवला. युरोपच्याही उत्तरेला असलेला हा बर्फाच्छादित देश. लोकसंख्या फक्त साडेतीन लाख, म्हणजे अंधेरीसारख्या उपनगरापेक्षा कमी, जवळपास सर्व खेळाडू हौशी. तरीही दमदार निकाल. पनामानेसुद्धा स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंदवून आपल्या फॅन्सना जल्लोष करण्याची संधी दिली. मोरोक्को आणि इराणसारख्या देशांनी स्पेन व पोर्तुगालला चांगलीच टक्कर दिली. 32 वर्षानी स्पर्धेत स्थान मिळवणार्‍या पेरूने फ्रान्स व डेन्मार्कला लढत तर दिलीच, ऑस्ट्रेलियाचा पराभवही केला. गतविजेत्या जर्मनीला धक्कादायक मात देऊन मेक्सिको चमकलं, तर दक्षिण कोरियाने 2-0 ने जर्मनीचा पराभव करून त्यांना बर्लिनची तिकिटे काढायला भाग पाडलं.

2) प्रस्थापितांना धक्का


बेल्जियम ही गुणी टीम. डी ब्रूयेन, हझार्ड, लुकाकू, मेर्टेन्स असे जबरदस्त क्लब फुटबॉलपटू या संघात आहेत. पण विशेष म्हणजे एकत्न येऊन ते बेल्जियमला विजयही मिळवून देत आहेत. नेमारच्या ब्राझिलला स्पर्धेतून याच संघानं बाहेर केलं. फुटबॉलवेडय़ा या छोटय़ाशा देशात जर वर्ल्डकप आला तर किती मोठा उत्सव ब्रसेल्स, अँटवर्प वगैरेला होईल कल्पना करा. प्रस्थापितांच्या जागी नवे संघ अभिषिक्त होतील हे नक्की.

3) रांगडे लढवय्ये जिंकले


या स्पर्धेत एक वेगळं जागतिकीकरणही दिसलं.   इंग्लंडची टीम तरुण आहे आणि आक्रमक खेळत आहे. फ्रान्ससुद्धा. एम्बापेसारख्या तरुण खेळाडूंचा संघ आहे. या दोन्ही संघांच्या यशाला एक राजकीय किनारसुद्धा आहे. दोन्ही संघांमध्ये विविध देशांतून आलेले स्थलांतरित खेळाडू आहेत  ते संघासाठी चमकदार कामगिरी करत आहेत. काही खेळाडूंचा वैयक्तिक प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. घरात अन्न आणायला पैसे नाहीत हे पाहिलेल्या लहानग्या लुकाकूने फुटबॉल मैदानात पराक्र म गाजवून प्रारब्ध बदललं. पॉकेटमनीसाठी रस्त्यांवर रंगकाम करणार्‍या गॅब्रिएल हेजूसने ब्राझिलच्या संघात जागा पटकावली. कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं. इराणचा अली बैरानवाद बेघर होता, फुटबॉल खेळता खेळता आयुष्याला आकार देत गेला. या कहाण्याही फुटबॉलची रग आहे.


4) फॅन्स पागलप्रेमी


 फॅन्स क्रूर असतात हे कटू सत्यही समोर येतच असतं. इराणच्याच सरदार अझमूनला अपेक्षित प्रदर्शन नाही करता आलं म्हणून इतक्या तिरस्काराला सामोरे जावे लागले की 23 व्या वर्षी त्यानं निवृत्ती घेतली. फुटबॉलचं हे वेड टोकाचंच.  फॅन्समधला जोश खेळाडूंच्या पेक्षा कमी नसतो. विविध पोशाख, चेहरे रंगवणे हे तर नित्याचेच. पण कोणी हजारो किलोमीटर सायकल चालवून आलं तर कोणी आपल्या म्हातार्‍या वडिलांना स्पर्धा दाखवायला पृथ्वीला अर्धी प्रदक्षिणा घातली. 85 वर्षाचे पन्नालाल चटर्जी आणि त्यांची 76 वर्षाची पत्नी चैताली हे असेच फुटबॉलवेडे. प्रत्यक्ष जाऊन पाहिलेला हा त्यांचा दहावा वल्र्डकप. प्रेम, अजून वेगळं काय असतं?


5) खेळात राजकारणाची झलक


जागतिक स्तरावरचं राजकारणही या खेळात आपला ठसा उमटवून गेलं. क्रोएशियाच्या अध्यक्षा कोलिंडा ग्राबर किटरोविच. त्यांच्या संघानं बलाढय़ रशियावर विजय मिळाला आणि त्यांनी सामान्य फॅनप्रमाणे जवळजवळ उडय़ा मारत हा विजय व्हीआयपी बॉक्समध्ये साजरा केला, याचे पडसाद आता क्रोएशियाच्या आणि पूर्व युरोपच्या राजकारणात उमटणार असं दिसतंय. 

6) जपानी शिस्तीचा धडा


या स्पर्धेमध्ये स्टार खेळाडू असलेल्या संघांपेक्षा जास्त यशस्वी ठरले टीम म्हणून एकत्न खेळणारे आणि संतुलित परस्पर पूरक कौशल्य असणारे संघ. मेस्सी, रोनाल्डो, नेमार अशा मोठय़ा नावांनी मंचावरून लवकर एक्झीट घेतली. मात्र स्टेडियम आणि टीव्ही सेट दोन्हीकडे संघभावना दाखवून खेळणार्‍या देशांच्या टीम्सनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. जपानसारख्या संघाने ड्रेसिंग रूम स्वच्छ केली. जपानी फॅन्सनी तर विजयाचा जल्लोष करून तत्काल स्वयंस्फूर्तीने स्टेडियमची स्वच्छता केली. आपलं देशावरचं प्रेम असं वेगळ्या शिस्तीत व्यक्त केलं. आत्मविश्वास असेल आणि झुंजण्याची तयारी असेल तर कोणतेही मोठे लक्ष्य प्रत्यक्षात येऊ शकतं हे या स्पर्धेत वारंवार सिद्ध झालं. 
पुढचा वर्ल्डकप कतारला होणार आहे. म्हणजे आपल्या आशिया खंडात. मध्यपूर्वेचे रंग या स्पर्धेवर कसे चढतील हे पाहूच.


 

Web Title: Lessons taught by this football World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.