दिमाग खुल्ला रखनेका बॉस!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 04:00 AM2017-12-28T04:00:00+5:302017-12-28T04:00:00+5:30

इतक्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपण आहोत, अखंड बोलतो. मित्रमैत्रिणीही आहेत. पण वेळ पडली तर कोणाला हाक मारावी असं कुणी नाही एकट्यानं स्वत:सोबत राहायची हिंमत होत नाही. आणि सतत दुसºयाला दोष देत आपले प्रश्न दुसरं कुणी सोडवेल ही अपेक्षा. हे सारं काय आहे? त्यापेक्षा आपल्या अंतरंगाचाच सेल्फी काढत राहिलं तर मन मस्त मोकळं राहतं, कुढत कशाला बसायचं उगीच?

Keep brain open | दिमाग खुल्ला रखनेका बॉस!

दिमाग खुल्ला रखनेका बॉस!

Next

प्राची पाठक

सेल्फी. हे नाव घेऊन आपण आपल्यालाच दर गुरुवारी भेटलो.
मनातल्या खळबळीचा, तिथल्या आव्हानांचा, अस्थिरतेचा आणि दुखावलं जाण्याचा वेध वर्षभर या कॉलममधून घेतला. घरीदारी आपल्याला ‘स्वत:ला समजतो काय?’ ‘ह्या वयात पाय घसरू देऊ नका’, ‘मापात राहा’, ‘ध्येय ठरवा’, ‘ते बघा कुठे गेले आणि तुम्ही कुठे’ असे उपदेश, तुलना, स्पर्धा यांना सामोरं जावं लागतं. सेल्फीमध्ये स्वत:चा चेहरा आणि दिसणंच महत्त्वाचं नाही, तर मनात काय सुरू आहे, आपल्याला कोणी समजून घेणार आहे की नाही, संवाद वाढवावा म्हणजे काय करावं असे अनेक विषय आले. त्यात आपल्या असण्या-दिसण्यानंदेखील आपल्याला येणारा ताण, आपण बरे दिसतो का, हे सूट होतं का, ते कसं दिसेल असंही काही समजून घेतलं. किती वेगवेगळ्या प्रकारचे ताण आणि अपेक्षा आपण आपल्यासोबत वागवत असतो, त्यांचं नियोजन कसं करावं आणि त्यांचा सकारात्मक उपयोग आपल्याला अधिक समृद्ध करण्यासाठी कसा करता येईल याबद्दल बोललो.
आपल्या मनात स्वत:चा एक निरंतर शोध सुरू असतो. मी कसा आहे/कशी आहे आणि असं असेल तर तसं का आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. दरवेळी चपखल उत्तरं मिळतातच असं नाही. मिळालेली उत्तरं आपल्याला आवडतील असंही नाही. त्या उत्तरांमधूनसुद्धा वेगळे प्रश्न समोर येतात आणि डोक्याचा पार भुगा होऊन जातो. कधी कधी अनेक समस्या समोर असतात. अगदी पळून जावंसं वाटतं. पळून जावंसं वाटणं या भावनेशी किती जणांना जोडून घ्यावंसं वाटतं ही काही आनंदाची गोष्ट नाही.
आपण सध्या कोणत्यातरी सापळ्यात अडकलो आहोत आणि हे दिवस चटकन सरावे, नाहीतर मीच इथून निघून गेलेलं काय वाईट, असा तो शॉर्टकट असतो. पण आधीच मनाची गाडी मेंटेनन्सला आलेली असताना, तीच गाडी घेऊन एकट्यानं पळून जाऊन दामटल्यानं फार काळ सुखासुखी पळून जाता येणार नाही, तिथं अजून नवीन आव्हानं समोर येतील, हेही समजावून घेता आलं.
आहे ते ठीक सुरू नाही आणि यातून सुटकेचा शेवटचा पर्याय म्हणजे आत्महत्या, असंही खचणं आजूबाजूला दिसतं. त्यावेळी कसा मार्ग काढणार, ते दु:ख आणि खचणं कसं समजून घेणार हे तर घ्यायला हवंच. पण आपल्या आजूबाजूला असे कोणी असतील तर त्यांना आधार कसा देणार, त्यांना मुळात समजून कसं घेणार ह्याबद्दलदेखील आपण बोललो, बोलत राहिलं पाहिजे.
मला कोणी समजून घेत नाही, मनातलं कोणाला सांगता येत नाही अशीही भावना अनेकांना सतत टोचत असते. आतल्या आत खात असते. संवाद साधा, घरातल्या लोकांशी, जवळच्या मित्रमैत्रिणींशी मनातलं बोला म्हणजे नेमकं काय करा आणि कसं करा याविषयी आपण बोललो.
आपण काहीतरी करायला जातो. पण जसं प्लॅन करतो, तसं होत नाही. आज करू, उद्या करू असं होतं. त्यावर मात करायला शिकायलाच हवं. त्या धडपडीत कोणी आपल्याला स्वीकारेल, कोणी नाकारेल. अशावेळी नाकारलं जाणं कसं हाताळावं हे आपण स्पष्ट, थेट बोललो याचा आनंद आहे.
सतत कोणीतरी आपल्याला टाळत असतं असं अनेकांना वाटतं. मेसेज बघितला, लास्ट सीनच्या खुणा दिसल्या तरी उत्तर नाही, अशावेळी काय करायचं हा एक भयंकर प्रश्न अनेकांना सतावत असतो. त्यामुळे किती तरी ब्रेकअप्स, गैरसमज आणि त्यातून येणारे ताण असतात. ते असह्य झाले की दूर कुठेतरी पळून जावं असं वाटत आणि दुष्टचक्र परत सुरूच राहतं. यातून काही वेगळं, भरीव आणि दिलासादायक आपण निर्माण करू शकतो का, कसं हे शोधलं तर प्रश्न सुटू शकतात या शक्यतेविषयी आपण बरंच बोललो.
भास मारण्याविषयी तर कितीतरी बोललो. आणि त्यातून स्वत:विषयी बरंच काही उलगडलं.
वर्षभर हे सारं वाचत असताना तुमच्याही लक्षात आलं असेल की गोष्टी सुटू शकतात.
फक्त त्यासाठी दिमाग खुला रखने का ! मनातला केमिकल लोचा समजून घ्यायचा आणि मनातलं व्यक्त करायचा सराव करायचा/वाढवायचा. तो वाढो, स्वत:मध्ये डोकावत हा सेल्फी आपण घेत राहो याच शुभेच्छा !

- आपले प्रश्न सतत केवळ इतरांमुळेच निर्माण होत नाहीत, तर आपल्या आपलीदेखील कठोर चिकित्सा करायची गरज असते. वेळ पडली तर चुका मान्य करून सुधारायची हिंमत बाळगावी लागते, हेही मुद्दे समजून घेतले.

- समुपदेशकांकडे जाणं अजूनही अनेकांना आवडत नाही. चटकन प्रश्न सुटलेले हवे असतात.

- इतकी संवादसाधनं आणि मनातलं बोलायला कोणी नाही. इतक्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आहोत पण वेळ पडली तर कोणाला हाक मारावी, मारावी का, हा प्रश्न असतोच.

- आपलं ऐकून घेतलं गेलंच पाहिजे, असा आग्रह असतो. ऐकून घेणाºयानं आपल्याच नजरेनं प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे, तो चुटकीसरशी आपल्याला हवा तसा सोडवून दिला पाहिजे, अशा अपेक्षा असतात.
 

Web Title: Keep brain open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.