अतिविचित्र फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 08:00 AM2017-11-02T08:00:58+5:302017-11-02T08:01:15+5:30

विअर्ड फॅशन. हा शब्द या वर्षी बराच गाजला. काहीशी अश्लील आणि ओंगळ वाटणारी थॉँग जिन्सही गेल्या काही दिवसात गाजली. मात्र हा विअर्ड फॅशन प्रकार काय आहे? तो का चालतो? फॅशनच्या जगात कसा मुरतो. हे सांगणारा हा ट्रेण्ड

Extreme Fashion | अतिविचित्र फॅशन

अतिविचित्र फॅशन

- अनन्या भारद्वाज

विअर्ड फॅशन हे दोन शब्द गेल्या आठवड्यात चर्चेत होते. निमित्त झालं थाँग जिन्स नावाच्या एका भयंकर जिन्सचं. आपल्या संस्कृतीप्रेमी समाजात ‘त्या’ पॅण्ट्स पचनी पडणं शक्यच नव्हतं. पण तिकडे युरोपात आणि अमेरिकेतही या पॅण्टवर भरपूर टीका झाली. सोशल मीडियात तर भयंकर समाचार घेतला फॅशनप्रेमींनी त्या प्रकाराचा. थाँग पॅण्ट म्हणजे अशी जिन्सची पॅण्ट. जिला कमरेला चिंधी आणि पायाला चिकटून दोन उभ्या चिंध्या. बाकी पाय उघडेच.

ही अशी पॅण्ट नामक लक्तरं जगभर गाजली. टीकाही झाली. एवढंच नव्हे तर फ्राइड चिकन पॅण्ट म्हणजेच कोंबडीच्या पायाच्या आकाराच्या भयंकर पॅण्ट्सही अशाच ओंगळवाण्या. त्यांच्यावरही घनघोर टीका झाली.
मात्र यानिमित्तानं एक प्रश्न समोर आला की अशा विअर्ड फॅशन्स का येत असतील? का फॅशन रॅम्पवर चालत असतील? फॅशनच्या जगात चर्चेचा विषय होत असतील? आणि काही लोक ते तसे कपडे घालूनही पाहत त्यासाठी भरमसाठ किमतीही मोजत असतील?
हे प्रश्न फॅशनच्या जगाशी संबंधित असले तरी ते फक्त फॅशनपुरते मर्यादित नाहीत. त्यात व्यक्तिगत मानसिकताही झळकते. आणि सामूहिक मानसिकताही!

फॅशन ही गोष्ट नेहमीच इतरांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी केली जाते. त्यात वेगळेपणा असतो. काही सृजनशीलता असते. आणि सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला असतो. फॅशन नावाची गोष्ट अस्तित्वात आली तेव्हापासून हेच सुरू आहे. काही गोष्टी समाजाला मान्य होतात. समाज स्वीकारतो. काही नाकारतो.

ज्या गोष्टी समाजमान्य नाही त्याही बंडखोरी म्हणून फॅशनच्या नावाखाली अनेकदा केल्या जातात. केस कापणे ते जिन्स घालणे ते चित्रविचित्र कपडे घालणे यासाºयांपासून अनेक गोष्टीत फॅशन बंडखोरीच्याही स्वरूपात उतरते.
इथवर सारं तसं फॅशन चक्राप्रमाणेच गोल गोल फिरत होतं.

आताशा विअर्ड फॅशन नावाची एक नवीच संकल्पना जन्माला आली. विअर्डला आपण अतिविचित्र म्हणू. पण व्यक्तिस्वातंत्र्य मानणाºया आणि वाट्टेल ते कपडे वापरण्याची मुभा असणाºया देशांतही काही कपड्यांना विअर्ड विशेषण लागत त्यावर टीका होते हे जरा अजब वाटतं.

त्याचं कारण असं की, सामाजिक सभ्यतेचे सारे संकेत झुगारून पोशाख घालणं आणि ते सोशल मीडियात मिरवणं हा नुस्ता फॅशनचा भाग नाही तर त्यामागे मोठी बाजारपेठ काम करते. ही बाजारपेठ ज्या गोष्टी बाजारात उतरवते त्याला आधुनिकता ते बंडखोरी असं कुठलं ना कुठलं विशेषण चिकटवते. आणि अनुकरण हा फॅशनचा सगळ्यात मोठा गुण पाहता तरुण मुलं ते फॉलो करतात. त्या फॅशनला डोक्यावर घ्यायला जातात. मुळात तिच्या पोटात बाजारपेठीय गणितांपलीकडे काहीही नसतं.

या विअर्ड फॅशनच्या चर्चेच्या निमित्तानं हेच एक समोर येतं की, फॅशन म्हणून अनुकरण करताना, त्यासाठी भांडताना, स्वीकारताना हे आपण लक्षात घ्यायला हवं की, प्रत्यक्षात यात खरंच काही कल्पकता आहे, बंडखोरी आहे की निवव्ळ बाजारपेठ आहे.

२०१७ हे वर्ष संपत आलं. या वर्षभरात फॅशनच्या जगात बरेच ट्रेण्ड आले. गेले. पण ज्यांना विअर्ड असं विशेषण लागलं. त्यातल्या काही गोष्टी पहा. वरकरणी ते किरकोळ वाटेल; पण मार्केटनं ते बाजारात उतरवताना किती विचार केला असेल. आणि आपण फॅशन म्हणून ते स्वीकारताना यासाऱ्याच विचारही केला नाही.
विअर्ड फॅशनची गंमतच ही आहे, फॅशन विअर्ड वाटते. त्यामागची आर्थिक गणितं मात्र विअर्ड नसतात !

या वर्षभरात मार्केटमध्ये आलेल्या काही फॅशन्स या विअर्ड म्हणून गणल्या गेल्या. त्या विचित्र तर होत्याच; पण बाजारपेठेनं त्या फॅशनच्या जगात आपसूक जिरतील असे प्रयत्नही केले.
 

१) डिटॅचेबल जिन्स
हे प्रकरण भन्नाट. म्हणजे काय तर जिन्सच. पण ती तीन तुकड्यात विभागलेली होती. वाटलं तर फुलपॅण्ट घालायची. वाटलं तर पायाचा भाग काढून शॉर्ट म्हणून वापरायची. किंवा स्कर्ट म्हणून. फक्त मुलींसाठी असलेल्या या जिन्सवरही टीका झालीच.

२) फोन बॅग
आपल्याकडेही रस्तोरस्ती मिळतात हे मोबाइल होल्डर. त्यात फक्त मोबाइल मावतात. जर पर्स वापरल्या जातात, तर मोबाइल बॅग स्वतंत्र कशाला; पण फॅशन म्हणूनही हेही सर्वदूर पसरलं.

३) मॅचिंग ट्रॅक सूट
जिम अ‍ॅक्सेसरीज् हे एक वेगळं प्रकरण आहेच. पण अनेक सेलिब्रिटींनी मॅचिंग ट्रॅक सूट-बूट-बेल्ट-बॅण्ड वापरून हा ट्रेण्डही रुजवला.

४) प्लॅटफॉर्म हिल्स
नव्वदच्या दशकात ही फॅशन जोरात होती. मोठमोठे उंच, आडवे हिल्स. मधल्या काळात हे हिल्स कालबाह्य झाले. पण आता ते परत आले आहेत.

५) प्लेअर जिन्स
जिन्सच. मात्र पायाशी या जिन्सला झालर लागलेली दिसते. तशी झालर काही पलाझोंनाही दिसते. हा नवीन प्रकार यंदा अनेकींनी स्वीकारला.

(अनन्या फॅशन आणि जाहिरातीच्या जगात मुशाफिरी करणारी मुक्तपत्रकार आहे.)

Web Title: Extreme Fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.