पैसे नकोत, प्रेम मोजा!... जिथे लोकं पैसा नाहीत साठवत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 12:04 PM2017-08-31T12:04:01+5:302017-08-31T12:04:55+5:30

असं एखादं हॉटेल जिथं पदार्थांच्या किमती ठरलेल्या नाहीत, आपल्याला वाटले तेवढे पैसे द्यायचे. तेही आपल्यासाठी नाही, कुणा गरजूसाठी. पदार्थाची किंमत नाही, तर प्रेमाची भेट म्हणून पैसे द्यायचे. ही आयडिया खरी असू शकते असं वाटतं तुम्हाला? पण ते खरंय

 Do not want money, count love! ... where people are not saving money | पैसे नकोत, प्रेम मोजा!... जिथे लोकं पैसा नाहीत साठवत

पैसे नकोत, प्रेम मोजा!... जिथे लोकं पैसा नाहीत साठवत

Next

- प्रज्ञा शिदोरे

असं जग, जिथे लोकं पैसा साठवत नाहीत. असं जग, जिथे लोकांना उधळपट्टी म्हणजे काय हेच माहिती नाही. असं जग, जिथे पैशाला ‘किंमत’ नाही. किंबहुना त्यांची ‘किंमत’ तुम्हीच ठरवायची असते! असं जग, जिथे एकमेकांवरचा विश्वास हेच मुख्य चलन आहे!
आता सांगा, असं जग अस्तित्वात आहे यावर कुणी तरी विश्वास ठेवेल का?
खूप स्वप्नाळू आणि उगाच अशक्य असं कल्पनारंजन आहे हे असं वाटूच शकतं. पण काही लोकांच्या मते ‘पैसा’ ही अशी एक संकल्पना आहे जी जगातल्या बहुतांश प्रश्नांचं मूळ आहे. मग या लोकांनी फक्त विचार करत बसण्यापेक्षा काहीतरी करायचं ठरवलं. या पैशावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला उत्तर म्हणून जगभरात विविध ठिकाणी काही प्रयोग होऊ लागले.
जसं फ्रान्स किंवा अमेरिकेतल्या अनेक कॉफी शॉप्समध्ये ‘पे फॉर द नेक्स्ट पर्सन’ अशी एक पाटी असते. म्हणजे तुम्ही आपली कॉफी प्यायची आणि थोडेसे जास्त पैसे द्यायचे. म्हणजे ते कॅफे एखाद्या गरीब माणसाला तिथली कॉफी किंवा कोणतातरी खाद्यपदार्थ कोणतीही किंमत न आकारता देऊ शकेल. यामुळे त्या माणसाचंही भलं होतं आणि आपल्यालाही दुसºयासाठी काहीतरी किंचित का होईना केल्याचं समाधान मिळतं.
असे प्रयोग भारतामध्ये आहेत का?
सेवा कॅफे हा त्यातलाच एक प्रयोग. हे असं एक कॅफे आहे जिथं तुम्हाला मेन्यू कार्डावर किमती दिसणार नाही. कारण किमती पक्क्या केलेल्याच नाहीत. ग्राहकाने हवं ते खायचं आणि त्याला त्याची जी योग्य किंमत वाटेल ती देऊन निघून जायचं.
सिद्धार्थ स्थालेकर यानं प्रथम हे कॅफे अहमदाबाद इथं सुरू केलं. सिद्धार्थ म्हणजे टिपिकल ‘यशस्वी’ माणूस. आयआयएम अहमदाबादमधून आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षं मुंबईमध्ये गलेलठ्ठ पगारावर नोकरी केली. दलाल स्ट्रीटवर नऊ वाजता मार्केट उघडलं की याचं काम सुरू व्हायचं. सी.एन.बी.सी.वर तो तेव्हा लोकांना, त्या दिवशी कोणते स्टॉक्स वर जातील काय खाली येईल वगैरे माहिती सांगायचा. तो म्हणतो की अनेक वेळा एखादं मोठं डील क्लोज होण्याच्या मीटिंग्ज तो पंचतारांकित रेस्टॉरण्टमध्ये घ्यायचा. कोट्यवधींची उलाढाल झाली आणि स्नॅक्सचं बिल २-३ हजार आलं तरी काही वाटायचं नाही. पण काही वर्षांनंतर त्याला या सगळ्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला. माणसाच्या अधाशीपणाची जाणीव होऊ लागली. त्यामुळे आपलं प्रोफेशन सोडून देऊन तो काहीतरी ‘विधायक’ करण्याचा विचार करू लागला. तसं काही सुचेना, म्हणून तो आणि त्याची व्यवसायाने इंटिरिअर डेकोरेटर असलेली बायको, हे दोघे भटकायला बाहेर पडले.
त्यांच्या ५-६ महिन्यांच्या भटकंतीमध्ये त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना भेटी दिल्या. तिथेच त्यांना या ‘गिफ्ट इकॉनॉमी’ची कल्पना पहिल्यांदा समजली. अहमदाबादमधल्या गांधी आश्रमामध्येही असेच काही प्रयोग चालतात. या प्रयोगांचं नाव त्यांनी ‘मूव्हड बाय लव्ह’ असं ठेवलं. या इन्क्युबेटरमध्ये ‘सेवा कॅफे’ ही संकल्पनाही मांडली गेली होती. सिद्धार्थ आणि त्याची बायको लहर यांनी २०११ साली अशाच एका कॅफेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं.
या कॅफेमध्ये एक पाटी आहे. ‘तुम्ही खाल्लेल्या अन्नासाठी कृपया पैसे देऊ नका, तुम्हाला या डिशेस आधीच्या ग्राहकांनी सप्रेम दिल्या आहेत. पण तुम्ही मात्र एवढंच करा, तुम्हाला वाटेल तेवढं पुढच्या ग्राहकांसाठी सप्रेम ठेवून जा!’.
असंच एक कॅफे प्रयोग म्हणून पुण्यात आणि बंगलोरमध्ये सुरू करण्याचा सिद्धार्थचा विचार आहे. याबरोबरच नुकतंच मुंबईमध्ये असंच कॅफे त्याने सुरू केलं आहे. लोकांना जास्तीतजास्त आर्थिक फायदा करून देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास प्रेमाच्या पुंजीपाशी असा येऊन पोहचला आहे. हा प्रवास काही सोपा नाही. त्यासाठी त्यानं स्वत:ची मानसिकता बदलण्यासाठीही अनेक प्रयत्न केले. या मानसिकता बदलण्याच्या प्रयत्नांबद्दल तो त्याच्या एका टेडएक्समधील भाषणात बोलतो. ते भाषण नक्कीच ऐकावं असं. या प्रयोगाची ‘मूव्हड बाय लव्ह’ नावाची एक छानशी वेबसाइट आहे. ज्यामध्ये त्यांनी यासारख्या अनेक प्रयोगाबद्दल माहिती तर तुम्हाला मिळेलंच पण इथे तुम्ही सहभागी कसे होऊ शकता याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल, तसेच इतर लोकांचे अनुभवही वाचायला मिळतील.

त्यासाठी वाचा आणि जरूर पहा
सोबतच्या या लिंक्स

सिद्धार्थचा टेड टॉक या लिंकवर पहा..
 Siddharth Sthalekar at TEDxNMIMSBangalore https://www.youtube.com/watch?v=MdPRHbK41y 


मूव्हड बाय लव्हच्या प्रयोगांबद्दल वाचण्यासाठी ही लिंक पहा..
http://www.movedbylove.org/index.php

 pradnya.shidore@gmail.com 

Web Title:  Do not want money, count love! ... where people are not saving money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.