अकोल्याची सोनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:36 AM2018-03-29T08:36:59+5:302018-03-29T08:36:59+5:30

लहानपणापासून आकाश हाका मारायचं मोठं झाल्यावर ठरवलं, आपण याच क्षेत्रात काम करायचं, ‘स्पेस’चं शिक्षण घ्यायचं..

Akola Sonal | अकोल्याची सोनल

अकोल्याची सोनल

googlenewsNext


- सोनल बाबरेवाल

‘स्काय इज द लिमिट फॉर आॅर्डिनरी पीपल, बट फॉर एक्स्ट्राआॅर्डिनरी वन्स, स्काय इज जस्ट द बिगिनिंग...’
हे वाक्य एरव्ही फक्त एक वाक्यच वाटलं असतं. मात्र गेल्या वर्षभराच्या अनुभवानं माझ्या या वाक्यावरचा विश्वास वाढला आहे.
लहानपणापासून मला आकाश निरीक्षणाचा छंद होता. रात्रीचं चमचमतं आकाश हाका मारायचं. चमचमता चंद्र आवडायचा. वाटायचं कधी या चंद्रावर जाता येईल का, तिथल्या कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या जमिनीवर उड्या मारत आकाशातून आपली पृथ्वी पाहता येईल का? हे स्वप्न हळूहळू मनात पक्कं व्हायला लागलं. सुदैवानं माझ्या घरच्यांनी माझ्या या स्वप्नांना साथ दिली, त्यांच्यावर विश्वास ठेवला. मला उत्तम शिक्षण दिलं. माझ्या घरच्यांनी, विशेषत: माझ्या वडिलांनी माझ्या शिकण्याच्या, वेगळं काहीतरी करून पाहण्याच्या ऊर्मीला कायम पाठबळ दिलं.
अकोल्याच्या माउण्ट कार्मल शाळेत मी शिकले. एसटीइए क्षेत्राशी संबंधित अभ्यास करायचा ठरवला आणि विज्ञान-तंत्रज्ञान अभ्यासक्रम दहावीनंतरच निवडला. याविषयात आपल्याला नुसती आवड नाही तर चांगली गती आहे हे माझ्या याच टप्प्यात लक्षात यायला लागलं. मग मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. त्यासाठी अमरावतीला गेले. तिथल्या सिपनाज इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग केलं.
इंजिनिअरिंग करतानाच मला इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्राचा बारकाईनं अभ्यास करता आला. कॉलेजचे शिक्षक, स्टाफ, प्राचार्य अगदी चेअरमनही अत्यंत आनंदानं मला मदत करत राहिले. त्यातून माझा पाया पक्का झाला. मग मी ठरवलं की अंतराळ संशोधन क्षेत्रातच आपण काम करायचं. त्यादरम्यान लीला बोकील यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यातून मी फ्रान्सच्या अंतराळ संशोधन विद्यापीठात अर्ज करायचं ठरवलं. या विद्यापीठात आधीपासून शिकणाऱ्या अविशेक घोषनंही मला मार्गदर्शन केलं. त्यातून मी अर्ज केला, निबंधाची तयारी केली.
आणि मला पहिली कल्पना चावला फेलोशिप मिळाली. अंतराळ संशोधनासाठी फक्त मुलींनाच ही फेलोशिप दिली जाते. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ साली ही पहिली फेलोशिप मला मिळाली. माझ्या करिअरचा पाया घालत मी एक मोठी भरारी घेतली, या फेलोशिपने मला खूप बळ दिलं. एक नवीन जग मला यानिमित्तानं पहायला मिळालं. २०१७च्या स्पेस स्पेस प्रोग्रॅम (एसएसपी) या आयर्लण्डच्या कोर्क येथे झालेल्या परिषदेला मला जाता आलं. तिथं मला अनेक गोष्टी पाहता आल्या, शिकता आल्या. समुद्रात आपली काळजी कशी घ्यायची, हे सी सेफ्टी ट्रेनिंगही मला मिळालं. त्यानंतरच्या फ्रान्सच्या या विद्यापीठात मी शिकतेय. अंतराळ विज्ञान अभ्यास करतेय. हे पूर्णत: वेगळं जग आहे. इथं मी एसएस करतेय. इथं काम करण्याचं, शिकण्याचं बौद्धिक समाधानही मिळतं आहे. पुढच्या पिढीकडे आपण जे शिकतोय ते तंत्रज्ञान पोहचवणं, साºया मनुष्यजातीसाठी काम करणं हा अनुभवच निराळा आहे. इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीमुळं मला हा अनुभव मिळाला, त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
हल्ली नवीन पिढीत खरं तर प्रत्येकाला मंगळावर जाण्याची घाई झाली आहे, मला अखिल मानवजातीसाठी काम करण्याची, अंतराळ संशोधन करण्याची इच्छा आहे.
हे शिक्षण पूर्ण झालं की, भारतात परत यायचं मी ठरवलंय. अंतराळ विज्ञानातच संशोधन करण्याचं ठरवलं आहे. अंतराळ विज्ञान संशोधनात तरुण मुलांनी यावं म्हणून या क्षेत्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करण्याची इच्छा आहे. आपल्या समाजात मुलींची स्वप्न, त्यांचं जगणं महत्त्वाचं मानलं जात नाही, त्यासाठी जनजागृतीचं काम करावं, असंही मनात आहे.
सध्या मी इथं डॉक्टर कलाम इनिशिटिव्ह अर्थात डीकेआय या प्रोजेक्टसाठी तरुण अंतराळ अभ्यासकांसोबत काम करतेय. इथं माझी मार्गदर्शक नासा अंतराळवीर निकोल स्कोट मला उत्तम मार्गदर्शन करतेय. जगभरात स्पेस कम्युनिटीमध्ये भारताची घोडदौड सुरू रहावी, त्यासाठी काम करावं, हीच इच्छा आहे.


(फ्रान्सच्या इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीची कल्पना चावला फेलोशिप २०१७ विजेती. सध्या याच विद्यापीठात मास्टर्स शिक्षण पूर्ण करते आहे.)

Web Title: Akola Sonal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.