5 विनिंग सिक्रेटस

By admin | Published: July 18, 2014 12:08 PM2014-07-18T12:08:50+5:302014-07-18T12:08:50+5:30

जर्मन संघ जगज्जेता ठरला. का? त्या टीममध्ये एकही स्टार नाही, एकही हिरो नाही. पण टीम मात्र सुपरहिरो ठरली. ती कशी? आणि तीच सूत्रं वापरून आपण आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये गोलवर गोल करत, चॅम्पियन ठरू शकतो का?

5 Winning Secrets | 5 विनिंग सिक्रेटस

5 विनिंग सिक्रेटस

Next

- श्रीकांत बच्छाव बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टीम्सना प्रशिक्षण देणार्‍या  ‘सॉफ्टएज’ संस्थेचे संचालक आणि ट्रेनर 

शब्दांकन - ऑक्सिजन टीम
 
 
१) मेक शॉर्ट पासेस 
    जर्मन टीमची संपूर्ण स्ट्रॅटेजीच एका मुख्य सूत्राभोवती गुंफलेली दिसते. मेकिंग शॉर्ट पासेस. अत्यंत छोटे छोटे पासेस देत जर्मन खेळाडूंनी चेंडूचा ताबा तर स्वत:कडे ठेवलाच; पण त्या छोट्या छोट्या पासेसमुळे प्रत्येक खेळाडू त्या गेममध्ये इनव्हॉल्व्ह होताना दिसला. सगळी टीम ‘एक’ होत, एकाच वेळी खेळत होती. त्याचा दुसरा परिणाम असाही झाला की,  छोट्या पासमुळे  चुकण्याची शक्यताही कमी झाली.
नव्या वर्ककल्चरमध्ये खरंतर हेच अपेक्षित आहे. टीममध्ये काम करत आपलं एक मोठं टार्गेट सेट करून ठेवायचं. (जसं त्यांचं होतं, मॅच जिंकणं) पण टार्गेट मोठं असलं तरी त्याचे अचिव्हेबल टप्पे करता येऊ शकतात. तेच छोटे छोटे पासेस. आपल्यावर मॅनेजमेण्टने, बॉसने हे काम थोपवलंय असं वाटून न घेता, ते आपल्या स्पीडने, आपल्या आवाक्यात घेऊन करता येऊ शकतं. दुसरं म्हणजे टीममधल्या प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो, एकाला जमतंय तर ते दुसर्‍याला का जमू नये असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही किंवा मला जमतंय आणि माझा सहकारी का असा ठोंब्या असंही म्हटलं तर टीमचं टार्गेट अचिव्ह होत नाही. त्यावर उपाय एकच, आपल्या टार्गेटचे छोटे टप्पे करायचे, एक टप्पा गाठला की पुढचा. मग त्या पुढचा. जर्मन्सनं हेच तर केलं.
 
२) डोण्ट लूज द बॉल.
 जर्मन टीमने या सगळ्या वर्ल्डकपमधे हे तत्त्व अचूक पाळलं. बॉलवरचा कण्ट्रोल त्यांनी जाऊ दिला नाही. त्याच्यावरची मालकी सोडली नाही. त्यामुळे समोरची टीम फ्रस्ट्रेट होत गेली, त्यांचा संयम सुटला.
टीममध्ये काम करताना हेच करणं अपेक्षित असतं. आपल्या कामावरची पकड तर सैल होऊ द्यायची नाही. टार्गेट अचिव्हेबल ठेवायचं त्यातून काम करणार्‍यांना ऊर्जा मिळते. मुख्य म्हणजे आपण फार वेगानं जातोय किंवा ट्रॅक सोडून भलतीकडेच चाललोय यावरही नजर ठेवता येतेच. छोटे पास, संघातल्या प्रत्येकाची इनव्हॉल्व्हमेण्ट आणि बॉलवरचं नियंत्रण .
मॅच हातची जात नाही.आणि गोल होतात,  जर्मनीने केले तसेच.
 
३) कीप कूल
   जर्मन खेळाडूंचाही प्रवास सोपा कुठं होता?
त्यांच्याही गोलपोस्टवर आक्रमण झालंच. अनेक गोल होता होता राहिले. काही झालेही. पण म्हणून काही ते डिस्टर्ब नाही झाले. इमोशनल तर अजिबात नाही झाले. एकदम शांत होते. या वर्ल्डकपमध्ये एकही टीम जर्मन टीमइतकी शांत दिसली नाही. अवघड परिस्थितीतही त्यांनी स्वत:वरचाही ताबा अजिबात ढळू दिला नाही. आपणही काम करताना, चिडतो. फ्रस्ट्रेट होतो. त्या फ्रस्ट्रेशनच्या नादात अनेक चुका करतो. जर्मन खेळाडूंकडून हा मंत्र शिकण्यासारखा आहेच. कीप कूल. चुका होतात. गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, त्यावेळी शांत रहायचं. म्हणजे अनावश्यक चुका टाळता येतात.
जर्मनीने तरी काय केलं, ज्या बाकीच्यांना केल्या त्या चुका टाळल्या, इतकंच.
 
४) स्वीच युवर रोल
   जर्मन टीममध्ये प्रत्येक खेळाडूचे रोल ठरलेले होते. संघात असतात तसे डिफेण्डर, सेण्टर फॉरवर्ड, मीड फिल्डर अशा ज्याच्या त्याच्या भूमिका ठरलेल्याच होत्या. पण माझ्या पायात चेंडू आहे तर माझा मीच जाऊन गोल करीन, कुणालाच पास देणार नाही, असा हटवादीपणा या संघात दिसला नाही. उलट अत्यंत सफाईनं प्रत्येक खेळाडू आपली भूमिका बदलत होता. जसा चेंडू पुढं जाईल, तसतसा अंदाज घेत त्या त्या ठिकाणचा खेळाडू पुढे सरकत होता. मुख्य म्हणजे असे रोल बदलण्यात कुठल्याच खेळाडूला कमीपणा वाटला नाही.
टीम स्पिरीट वेगळं काय असतं? आपलं टार्गेट जसं, त्या कामाची मागणी जशी तसतशी टीममधल्या प्रत्येकानंच आपली भूमिका बदलून ते ते काम करायचं असतं. अमुक काम मीच का करू, मला हे काम सांगताच कसं असं टीममध्ये कुणाला वाटलं तर टीम हरणारच. मीच एकटा गोल करीन, बाकीचे मागे असा हट्ट करणारे खेळाडू टीमला हरवतात. 
घोळ न घालता, रोल असे  स्वीच करणं जर्मन खेळाडूंना उत्तम जमलं.
 
५) नोबडी इज बिगर दॅन टीम
   फायनलची एक गंमत लक्षात आली असेलच तुमच्या. ज्यानं विनिंग गोल केला तो  मारिओ गोट्झे, मिडफिल्डर. तो काही प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता, बाहेर आराम करत होता. एक्स्ट्रॉ म्हणून तो ऐनवेळेस संघात आला आणि विनिंग गोल करून गेला. अर्जेण्टिनाकडे मेस्सी होता, ब्राझीलकडे नेयमार. पण नेयमारला दुखापत झाली आणि ब्राझीलची अख्खी टीम गारद झाली. तेच आपल्याकडेही आपण पाहिलंय, तेंडुलकर आउट झाला की, प्रेक्षकही एकदम हार मान्य करतात. 
जर्मन टीममध्ये मात्र असा एकही टीमपेक्षा मोठा खेळाडू नव्हता. नॉट अ सिंगल प्लेअर इज इन्डिस्पेन्सिबल हे त्यांचं सूत्र होतं. प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आणि तो त्याक्षणी त्याच्या पूर्ण क्षमेतनंच खेळायला हवा. प्रत्येक खेळाडूच्या स्कीलला त्यांनी विशेष महत्त्व दिलं. नव्या वर्ककल्चरमध्ये हे सूत्र महत्त्वाचं ठरायला हवं. टीममधला प्रत्येक माणूस महत्त्वाचा. त्याचं काम, त्याचं कौशल्य महत्त्वाचं. एखादाच सुपरपरफॉर्मर सगळ्यांपेक्षा वेगळा असू शकतो, पण तो म्हणजे टीम नव्हे. तो नसला तरी टीम जिंकलीच पाहिजे, हाच सामान्य नियम.
जर्मनीच्या टीमकडून हेच तर शिकायचंय की, स्टार्स नव्हे,  प्लेअर्सच चॅम्पियन ठरतात.

Web Title: 5 Winning Secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.