संजिता चानूचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:00 AM2018-09-14T00:00:21+5:302018-09-14T00:01:02+5:30

डोपिंगचा डाग पुसून काढण्यासाठी धडपडणारी भारोत्तोलक संजिता चानू हिच्या अडचणीत आणखी भर

Sanjita Chanu's 'B' Sample Positive | संजिता चानूचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह

संजिता चानूचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह

Next

नवी दिल्ली : डोपिंगचा डाग पुसून काढण्यासाठी धडपडणारी भारोत्तोलक संजिता चानू हिच्या अडचणीत गुरुवारी आणखी भर पडली. तिच्या डोप चाचणीचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती संजिता आता आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाच्या सुनावणी लवादाकडे दाद मागणार आहे. लवादापुढे आपली बाजू मांडण्यास असमर्थ ठरल्यास संजिताला किमान चार वर्षे बंदीचा सामना करावा लागेल.
संजिताचा भाऊ बिजेनसिंग म्हणाला,‘ब चाचणीचा अहवाल संजिताला ११ सप्टेंबरला मिळाला. आता बुडापेस्ट येथे लवादापुढे बाजू मांडू. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. येथे अपयश आल्यास स्वित्झर्लंडस्थित क्रीडा लवादाकडे धाव घेऊ.’ लवादापुढे उभे राहायचे की नाही हे कळविण्यासाठी संजिताला १८ सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
संजिताच्या डोपिंगचा अ नमुना विश्व चॅम्पियनशिपआधी १८ नोव्हेंबरला अमेरिकेतील स्पर्धेनंतर घेण्यात आला होता. १५ मे रोजी निकाल आला तेव्हा अ‍ॅनाबोलिक स्टेराईड आढळल्याचे सांगून अस्थायीरीत्या तिला निलंबित करण्यात आले. ब नमुन्याचा तपास करण्याचा जूनमध्ये आग्रह धरण्यात आला. याचा निकाल ११ सप्टेंबर रोजी आला.
दरम्यान विश्व भारोत्तोलन संघटनेने संजिताला पाठविलेल्या निकालपत्रात दुसऱ्याच एका खेळाडूच्या नमुन्याचा क्रमांक पाठविला होता. याबाबत आमची चूक झाल्याचे मान्य देखील केले होते. संजिताने त्या क्रमांकाच्या खेळाडूच्या नावाचा खुलासा करण्याची विनंतीदेखील केली आहे.

मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आंतरराष्टÑीय महासंघाच्या सुनावणी लवादाकडे आपल्या प्रतिनिधीमार्फत दाद मागणार आहे.
- संजिता चानू

Web Title: Sanjita Chanu's 'B' Sample Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.