मुंबई हॉकी लीग एअर इंडियाचा दणदणीत विजय
By admin | Published: June 27, 2016 03:10 AM2016-06-27T03:10:19+5:302016-06-27T03:10:19+5:30
एअर इंडिया वेस्टर्न रिजन (एआयडब्ल्यूआर) संघाने भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) स्पोटर््स क्लबचा ७-० असा फडशा पाडला
मुंबई : वृषभ ए. याने झळकावलेले धमाकेदार तीन गोल आणि जी. जितेंद्रचे दोन गोल या जोरावर एअर इंडिया वेस्टर्न रिजन (एआयडब्ल्यूआर) संघाने भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) स्पोटर््स क्लबचा ७-० असा फडशा पाडला. यासह एआयडब्ल्यूआर संघाने मुंबई हॉकी लीग स्पर्धेत दुसऱ्या श्रेणीमध्ये दिमाखात आगेकूच केली.
मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचएएल) वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी एअर इंडियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बीएआरसीला पूर्णपणे दबावाखाली ठेवले. सुरुवातीपासून एअर इंडियाच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
बीएआरसीच्या कमजोर बचावफळीचा फायदा घेत एअर इंडियाने आक्रमक चाली रचून दमदार खेळ केला. वृषभने प्रभावी कामगिरी करताना ३ गोल झळकावले. तसेच जितेंद्रने त्याला योग्य साथ देत दोन शानदार गोल झळकावले. तर आर. राहुल आणि के. अंकुश यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात हातभार लावला.
दरम्यान, बीएआरसीने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र एअर इंडियाचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. मोठ्या पिछाडीच्या दडपणाखाली त्यांच्या खेळाडंूमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. दुसरीकडे मध्य रेल्वे मुंबई विभाग व कॅथलिक जिमखाना यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. (क्रीडा प्रतिनिधी)