हीना आणि रोनक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:17 AM2018-04-24T09:17:03+5:302018-04-24T09:17:03+5:30

हीना सिद्धूनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिचा प्रशिक्षक रोनक पंडित. तोच तिचा नवरा. लग्नानंतर मुलींचं खेळातलं करिअर उभं राहू शकतं याचं या जोडप्याहून उत्तम उदाहरण ते कोणतं..

Heena and Ronak | हीना आणि रोनक

हीना आणि रोनक

Next

- गौरी पटवर्धन

हीना सिद्धूनं आॅस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं आणि भारतातल्या पॉवर कपल्सबद्दलची चर्चा परत एकदा नवीन उत्साहानं सुरू झाली. कारण हीना सिद्धूचा कोच आहे रोनक पंडित. तोच हीनाचा नवरा !
ज्या देशात आजही अनेक ठिकाणी मुलीला नहाणं आलं की तिचं बाहेर फिरणंसुद्धा बंद करण्याची मानसिकता आहे, तिथे हीना सिद्धू - रोनक पंडितसारखी उदाहरणं म्हणजे ऐन उन्हाळ्यात सुखद गारव्याची झुळूक आल्याचा आनंद देतात. जिथे मुलींना खेळण्यासाठी प्रत्येक पातळीवर लढा द्यावा लागतो तिथे हीना सिद्धू - रोनक पंडितसारखी पॉवर कपल्स आशेचा किरण दाखवतात.
अर्थात हे बदल लगेच एका दिवसात होत नाहीत. मुलींनी मैदानी खेळ खेळूच नये असं म्हणणाऱ्या समाजानं आधी मुली मैदानावर खेळणार हे सत्य स्वीकारलं; पण लग्न झाल्यावर मात्र मुलींनी ‘असल्या’ गोष्टी सोडून संसारात रमावं अशी अपेक्षा ठेवली. त्या काळातल्या कित्येक महिला खेळाडूंनी या सामाजिक अपेक्षेपुढे मन झुकवलीदेखील, तर काहींनी मात्र बंडाचा झेंडा उंचावत लग्न झाल्यानंतरही आपला खेळ चालूच ठेवला.
हळूहळू लग्न करणाºया खेळाडू मुलींच्या सासरच्या माणसांनीही त्यांच्या पाठीशी उभं रहायला सुरुवात केली, आणि मग मात्र मैदानावरचं चित्र झपाट्यानं बदलायला लागलं.
अंजली भागवत-वेदपाठक, मेरी कोम यासारख्या खेळाडूंच्या करिअरमध्ये ‘लग्न’ या गोष्टीनं काहीच फरक पडला नाही आणि तोच वारसा आता कविता राऊत, सानिया मिर्झा, ज्वाला गट्टा अशा अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या घरचे-सासरचे लोक चालवत आहेत.
एखाद्या महिलेला घरातून संपूर्ण पाठिंबा मिळाला तर ती काय करू शकते याचं या सगळ्याजणी आणि अशा अनेकजणी उदाहरण आहेत. हळदीकुंकू महत्त्वाचं का प्रॅक्टिस? याचा निर्णय जेव्हा तिचा ती घेऊ शकते, त्या निर्णयावरून तिला कुठलेही टोमणे ऐकायला लागत नाहीत, त्यावेळी घरातलं कार्य सोडून खेळ निवडला म्हणून तिच्यावर टीका होत नाही तेव्हाच ती मेडल्स मिळवण्याचं स्वप्न बघू शकते.
पण ही झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरची उदाहरणं. वर्तमानपत्रातून सतत आपल्यासमोर येणारी नावं. पण आपल्या आजूबाजूला अशाही अनेक महिला खेळाडू असतात ज्या राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर त्यांच्या त्यांच्या परीनं जीवतोड मेहनत करून खेळत असतात. त्यांच्याही दृष्टीनं त्यांचा खेळ तितकाच महत्त्वाचा असतो. जिल्हा पातळीवरचं ब्रॉन्झ मेडलसुद्धा त्यांच्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. कारण तिथंवर पोचण्यासाठी, ते मेडल मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली असते, घाम गाळलेला असतो. स्पर्धा खालच्या पातळीवरची असेल म्हणून त्यातल्या सहभागाचं महत्त्व कमी होत नाही. कारण त्यातून त्या खेळाडूला मिळणारा आनंद तेवढाच मोठा असतो. त्यातून तिचा एक व्यक्ती म्हणून होणार विकास तितकाच महत्त्वाचा असतो. त्यातून कमावलेला फिटनेस तितकाच महत्त्वाचा असतो. कारण हे सगळं तिचं तिने कमावलेलं असतं. अशा वेळी, केवळ लग्न झालंय म्हणून एखाद्या मुलीला तिचा खेळ सोडायला लावणं हे निव्वळ क्रूर आहे. कारण एखादी मुलगी लग्न करण्याच्या वयाची होईपर्यंत तिचा खेळ हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग झालेला असतो. अशावेळी कुठल्यातरी जुनाट सांस्कृतिक विचारांनी तिला तिचा खेळ सोडून द्यायला लावणं म्हणजे समाज म्हणून आपण आपल्या हातानं पायावर कुºहाड मारून घेण्यासारखं आहे.
जितक्या महिला खेळाडू अधिकाधिक वयापर्यंत खेळत राहतील तितकी आपल्याकडची खेळाची संस्कृती अधिकाधिक सुदृढ होत जाईल. आणि म्हणूनच लग्न झालं तरी तिच्या खेळाला प्रोत्साहन देणारं, तिच्या पाठीशी उभं राहणारं प्रत्येक घर हे उद्याच्या सुदृढ आणि आरोग्यशाली समाजाचा पाय रचत असतं. आता आपलं काम आहे त्या पायावर उत्तम इमारत बांधायची. असा समाज निर्माण करायचा जिथे एखाद्या खेळाडूच्या कर्तृत्वाची मोजणी करताना ‘तिचं लग्न’ हा विषयच चर्चेला येऊ नये. अशी परिस्थिती यावी की खेळाडूकडे खेळाडू म्हणूनच बघितलं जावं, त्यात महिला-पुरुष असा काही भेद उरूच नये.
तरच आपल्याकडे प्रेग्नन्ट असतांनाही खेळणारी आणि डिलिव्हरीनंतर लगेच खेळण्याची स्वप्न बघणारी सेरेना विल्यम्सच्या तोडीची खेळाडू तयार होण्याची अशा आपण बाळगू शकतो.

(लेखिका मुक्त पत्रकार आहे. patwardhan.gauri@gmail.com)

Web Title: Heena and Ronak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.