राष्ट्रकुलमधील 'सोनेरी' यश भारतासाठी महत्त्वाचं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 01:48 PM2018-04-17T13:48:00+5:302018-04-17T13:48:00+5:30

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल सामन्यांतील भारताच्या २६ सुवर्णपदकांसह एकुण ६६ पदकांच्या यशाने सध्या आनंदलहर आहे

Is Golden Jubilee Successful for India? | राष्ट्रकुलमधील 'सोनेरी' यश भारतासाठी महत्त्वाचं का?

राष्ट्रकुलमधील 'सोनेरी' यश भारतासाठी महत्त्वाचं का?

ललित झांबरे 
नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल सामन्यांतील भारताच्या २६ सुवर्णपदकांसह एकुण ६६ पदकांच्या यशाने सध्या आनंदलहर आहे. विशेषत: बॅडमिंटन  व टेबल टेनिसमधील ऐतिहासिक यशाने या खेळांमध्ये आपण केलेल्या प्रगतीची प्रचिती आली आहे. याशिवाय भारोत्तोलन (वेटलिफ्टींग), मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) आणि शूटींग (नेमबाजी)मधील यश दिमाखदार आहे.

 असे असले तरी  राष्ट्रकुल फेडरेशनमधील सहभागी प्रतिस्पर्धी देश (क्रीडादृष्ट्या मागास) पाहता हे यश फसवे असल्याचीसुद्धा चर्चा आहे आणि ती काही अंशी खरीसुद्धा आहे मात्र त्याचवेळी भारताचे गोल्डकोस्टमधील यश अधिक आश्वासक असल्याबद्दल बहुमत आहे.

यावेळची २६ सुवर्णपदकं ही राष्ट्रकुलच्या इतिहासातील भारताची दिल्ली २०१० (३९ सुवर्ण) आणि मँचेस्टर २००२ (३० सुवर्णपदकं) नंतरची तिसरी सर्वात यशस्वी कामगिरी आहे. मात्र या तिन्ही सामन्यांवेळ्च्या स्पर्धांचा बारकाईने अभ्यास केल्यास यावेळचे आपले यश दिल्ली व मँचेस्टरपेक्षाही अधिक असल्याचे दिसून येईल.  मँचेस्टर २००२ मध्ये आपल्याला मिळालेल्या ३० सुवर्णपदकांपैकी १४ पदके  ही आता बाद झालेल्या स्पर्धाप्रकारातील होती. यात दुहेरी नेमबाजीची ८ ,  वेटलिफ्टींगच्या स्रॅचमध्ये ३ आणि  वेटलिफ्टींगच्या क्लिन अँड जर्कमधील ३ सुवर्णपदके होती. हे तिन्ही स्पर्धाप्रकारच आता राष्ट्रकूल  सामन्यांतून बाद झालेले आहेत. 

नेमबाजी दुहेरी (पेयर्स) च्या स्पर्धा आता होत नाहीत आणि वेटलिफ्टींगमध्ये आता फक्त कंबाईन्ड  (एकत्रित) कामगिरीचाच पदकासाठी विचार होतो.  क्लिन व जर्कसाठी स्वतंत्र पदके नव्हती. त्यामुळे गोल्डकोस्टशी तुलना केल्यास मँचेस्टरमध्ये आपण खऱ्या अर्थाने ३० नाही तर १६ च सुवर्णपदके जिंकली असे म्हणता येईल. 

याचप्रमाणे दिल्ली २०१० च्या राष्ट्रकूल  सामन्यांमध्ये आपली ३९ पैकी १५ सुवर्णपदकं - नेमबाजी दुहेरी (७), धनुर्विद्या (३), ग्रिको रोमन कुस्ती (४) आणि टेनिस (एक़) या स्पर्धाप्रकारातील होती. हे सर्व स्पर्धाप्रकार आता राष्ट्रकुल सामन्यांतून बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिल्लीतील आपली सुवर्णपदकंसुद्धा सध्याच्या स्थितीत ३९ नाही तर २४ च आहेत. हा तुलनात्मक विचार करता गोल्डकोस्टमधील यश हे आपले आतापर्यंतचे राष्ट्रकूल  सामन्यांतील सर्वोत्तम म्हणता येतील.

दुसऱ्या अंगाने विचार केल्यास २००६ च्या पूर्वीसारखे  गोल्डकोस्टमध्ये वेटलिफ्टींगच्या क्लीन अँड जर्क आणि स्रॅच या  प्रकारांना सुवर्णपदक दिले असते तर आपल्या सुवर्णपदकांमध्ये वेटलिफ्टींगच्या सात (स्रॅचचे ३ आणि क्लिन अँड जर्कचे ४) आणि नेमबाजीच्या पेयर्स प्रकाराची ११ अशी तब्बल १८ सुवर्णपदकांची भर पडली असती. म्हणजे आपल्या खाती गोल्डकोस्टला २६  अधिक ही १८ अशी ४४ सुवर्णपदकं लागली असती. 

या आकडेवारीच्या गोष्टी सोडा, प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरी पाहिली तर हॉकीचे दोन्ही संघ आणि नेमबाज गगन नारंग वगळता कुणी निराश केले असे म्हणता येणार नाही.  टेबल टेनिस व बॅडमिंटनमध्ये तर आपण अभूतपूर्व यश मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली.  या खेळांमध्ये सुवर्णपदकांवर पहिल्यांदा भारताचे नाव कोरले गेले. महिला एकेरीचा अंतिम सामना सायना विरूद्ध सिंधू असा होणे हे भारताच्या वर्चस्वाचे प्रतिकच होते. 

 नेमबाजीत हिना सिद्धू, तेजस्विनी सावंत  या अनुभवी खेळाडूंसह मनू भाकर, श्रेयसी सिंग, मेहुली घोष, अनिश भानवाला या नवोदितांनी मिळून स्पृहणीय यश मिळवले.  टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा तर या स्पर्धेची फार्इंड ठरली. दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा चार पदकांच्या कामगिरीची कुणी तिच्याकडून अपेक्षा तरी केली होती का? साथियान गणशेखरनचे यशसुद्धा असेच अनपेक्षीत! त्याने प्रत्येक रंगाचे प्रत्येकी एक पदक जिंकत अनुभवी अचंता शरथ कमलचा कित्ता गिरवला.

 नीरज चोप्राने प्रथमच भालाफेकीच्या सुवर्णपदकावर भारताचे नाव लागले.  राहुल आवारेने कुस्तीत झेंडा फडकावून महाराष्ट्राच्या मातीची शान राखली आणि गतकाळातील मानापमान व अन्यायाला झाकून टाकले. स्व्क्वॅशमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई आणि दोघीत दीपिका पल्लीकलचे योगदान याचा उल्लेख करावाचा लागेल. मेरी कोमने राष्ट्रकूलचे पदार्पणच सुवर्णपदकासह केले. 

याशिवाय मोहम्मद अनस व जिन्सन जॉन्सन या अ‍ॅथलीटना  पदक जिंकता आले नसले तरी त्यांनी नवे  राष्ट्रीय  विक्रम नोंदवून प्रगतीच दाखवून दिली आहे. अनसचे ४०० मीटरचे पदक तर अगदीच थोडक्यात हुकले. या यशाच्या वाढत्या व्यापकतेने आणि नव्या यशस्वी चेहऱ्यांच्या उदयाने उज्ज्वल भविष्याच्या आशा निश्चितच जागवल्या आहेत मात्र आता हे यश म्हणजे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ नव्हते हे सिद्ध करावे लागणार आहे आणि त्याची संधी यंदाच जाकार्ता आशियाडमध्ये मिळणार आहे. तेथे कोरिया, चीन, जपान, कतार, इंडोनेशियाच्या स्पर्धेत आपण कितपत यश मिळवतो त्यावरच गोल्डकोस्टच्या यशाचे मोल ठरणार आहे.
 
राष्ट्रकुलमध्ये दक्षिण आफ्रिका,  केनिया, जमैका हे पदकांमध्ये आपल्या कितीतरी मागे पडले असले तरी आॅलिम्पिकमध्ये ते आपल्या पुढे असतात ही वस्तुुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यादृष्टीने आपण आता काम करण्याची गरज आहे.

गोल्डकोस्टमधील भारत विशेष

  •  मनिका बत्रा- टेबल टेनिसचे राष्ट्रकूल सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
  •  नीरज चोप्रा- भालाफेकीत राष्ट्रकूल सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय
  •  मेरी कोम- राष्ट्रकूल पदार्पणात सुवर्णपदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली विद्यमान खासदार
  •  अनिश भानवाला- अवघ्या १५ वर्षे वयात नेमबाजीचे सुवर्णपदक
  •  बॅडमिंटन- पहिल्यांदाच मिश्र सांघिक सुवर्णपदक
  •  जितू राय- नेमबाजीत सलग दुसरे राष्ट्रकूल सुवर्ण 
  •  टेबल टेनिस- सिंगापूरचे वर्चस्व मोडून काढत प्रथमच सुवर्णपदक
  •  सीमा पुनीया - सलग चौथ्यांदा राष्ट्रकूलमध्ये पदक 
  •  दीपक - अवघ्या १८ वर्षे वयात पदक (कास्य). वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा सर्वात तरुण पदकविजेता.

Web Title: Is Golden Jubilee Successful for India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.