दोन आॅलिम्पिक पदके जिंकण्याचे लक्ष्य : साक्षी
By Admin | Published: January 17, 2017 07:44 AM2017-01-17T07:44:16+5:302017-01-17T07:44:16+5:30
साक्षी मलिक ही भारताची आॅलिम्पिक जिंकणारी पहिली आणि एकमेव महिला पैलवान आहे
नवी दिल्ली : साक्षी मलिक ही भारताची आॅलिम्पिक जिंकणारी पहिली आणि एकमेव महिला पैलवान आहे; परंतु आता तिच्यासाठी ते यश पुरेशे नाही. कारण तिचे आता लक्ष्य आहे ते २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून सुशील कुमारच्या दोन पदके जिंकण्याच्या ऐतिहासिक कामगिरीची बरोबरी करणे.
साक्षी म्हणाली, माझे लक्ष्य २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून सुशील कुमारच्या ऐतिहासिक कामगिरीची बरोबरी करणे हे आहे. मी हे लक्ष्य गाठण्यासाठी आता पूर्ण लक्ष केंद्रित करीत आहे. मी दोन वेळेस आॅलिम्पिकपदक विजेती बनू इच्छिते. आॅलिम्पिकसाठी कोणत्याही खेळाडूला आपली ट्रेनिंग चार वर्षांआधीच सुरू करायला हवी आणि मी आपली ट्रेनिंग त्यानुसार सुरू केली आहे. विश्वचॅम्पियनशिपची तयारी करण्यावर सध्या लक्ष्य आहे. ही स्पर्धा वर्षअखेरीस होणार असल्याचे साक्षीने सांगितले.
साक्षीने गतवर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पैलवान म्हणून मान मिळवला होता. ती म्हणाली, या वर्षी माझे लक्ष्य विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करण्यावर आहे. सध्या माझी दिल्लीत मे महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याची योजना आहे. याशिवाय मी पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आॅलिम्पिक पदक जिंकल्याने पूर्ण जीवनातच परिवर्तन झाले आणि लोकांमध्ये ओळख निर्माण झाल्याचे या २४ वर्षीय महिला पैलवानाने मान्य केले.
साक्षी प्रो कुस्ती लीगमध्ये या हंगामात दिल्ली सुल्तान्स संघाची कर्णधार होती. या संघाकडून तिने चांगली कामगिरी केली; परंतु
तिचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. ती म्हणाली, ‘‘मी माझ्या सर्वच लढती जिंकल्या आणि त्यामुळे खूप समाधान वाटते. मी अन्य परदेशी पैलवानांकडूनही खूप काही शिकले. गेल्या हंगामात मी अनेक नवीन बाबी शिकल्या आणि त्यामुळे मला आॅलिम्पिकदरम्यान मदत मिळाली.’’
>जीवनात चांगले परिवर्तन झाले आहे. खूप लोकं मला ओळखू लागले आहेत आणि त्यामुळे मला चांगले वाटते. त्याने मला चांगले करण्याची प्रेरणा मिळत आहे. प्रत्येक वेळा मी जेव्हा मॅटवर खेळण्यास उतरते, तेव्हा अपेक्षांचा खूप दबाव असतो; परंतु त्यामुळे कठोर मेहनत करण्यास आणि आपला खेळ उंचावण्यासदेखील प्रेरणा मिळते. मी आपल्या उणिवा दूर करणे आणि चांगली ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मला चांगली तयारी करण्यास मदत मिळत आहे आणि लढतीसाठी माझ्यात आत्मविश्वासही निर्माण झाला आहे. - साक्षी मलिक