Commonwealth Games 2018 : वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी; विकास ठाकूरला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 12:39 PM2018-04-08T12:39:20+5:302018-04-08T12:40:54+5:30

भारतीय वेटलिफ्टर्सचा गोल्डन पंच

Commonwealth Games 2018 Vikas Thakur wins bronze in weightlifting | Commonwealth Games 2018 : वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी; विकास ठाकूरला कांस्यपदक

Commonwealth Games 2018 : वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी; विकास ठाकूरला कांस्यपदक

गोल्डकोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. आज सकाळी पूनम यादवने 69 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर आता विकास ठाकूरने कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे भारताची स्पर्धेतील एकूण पदक संख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताला मिळालेली 6 पैकी 5 सुवर्ण पदके ही वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत.

वेटलिफ्टिंगच्या 94 किलो वजनी गटात विकास ठाकूरने कांस्य पदक पटकावले. विकासने क्लिन आणि जर्कमध्ये 192 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले होते. मात्र शेवटच्या दोन प्रयत्नांमध्ये विकासला 200 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरला. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. विकासने एकूण 351 किलो वजन (स्नॅचमध्ये 159 किलो आणि क्लिन-जर्कमध्ये 192 किलो) उचलण्याची किमया साधली. याआधी ग्लास्गोमध्ये विकासने 85 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज (रविवारी) महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 69 किलो वजनी गटात  भारताच्या पूनम यादवने सुवर्ण पदकावर नाव कोरले. तिने क्लीन अॅण्ड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलले. त्याआधी दुसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले होते. पूनमने एकूण 222 किलो भार उचलला. या प्रकारात इंग्लंडच्या साराह डेव्हिसला रौप्य तर फिजीच्या अपोलोनिया वैवानी हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 

Web Title: Commonwealth Games 2018 Vikas Thakur wins bronze in weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.