Asian Games 2018: धनुर्विद्येत थोडक्यात हुकल्या 'सुवर्ण'संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:04 PM2018-09-04T14:04:31+5:302018-09-04T14:08:08+5:30

दोन सांघिक रौप्य, वैयक्तिक स्पर्धांत मात्र निराशा

Asian Games 2018: we lost golden chances in archery | Asian Games 2018: धनुर्विद्येत थोडक्यात हुकल्या 'सुवर्ण'संधी

Asian Games 2018: धनुर्विद्येत थोडक्यात हुकल्या 'सुवर्ण'संधी

ठळक मुद्देरजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

ललित झांबरे : जाकार्ता-पालेमबांग आशियाडमध्ये भारताने 15 सुवर्णपदक पटकावून आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली, पण धनुर्विद्येत नशिबाने साथ दिली असती तर सोळावे आणि कदाचित सतरावेसुध्दा सुवर्णपदक आपल्या नावे लागून आतापर्यंतची आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदली गेली असती परंतु, पुरुष आणि महिला, दोन्ही गटात सांघिक कम्पाउंड प्रकारात आपले सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकले. 

 बलाढ्य कोरियासोबतच्या सुवर्ण पदकाच्या लढती एवढ्या अटीतटीच्या झाल्या की एकवेळ भारतीय पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकल्याच्या बातम्यासुध्दा झाल्या होत्या परंतु पंचांनी पुन्हा एकदा टारगेटची पाहणी केली आणि गेल्यावेळी जिंकलेल्या सोन्याच्या जागी चांदीचे पदक हाती आले. 

रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

त्याच त्रिमूर्तीने यावेळी अंतिम फेरीत 229-227 अशी बाजी मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते परंतु, पंचांनी पुन्हा एकदा पाहणी केल्यावर कोरियाचे दोन नेम नऊच्या ऐवजी 10 गुणांच्या जागी लागलेले असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे लढत 229-229 अशी बरोबरीवर आली. म्हणून मग शूटआऊट फेरी घेतली गेली.

 तोडीस तोड स्पर्धा बघा,  त्यातही स्कोअर 29-29 बरोबरीवर राहिला म्हणून मग ज्यांनी परफेक्ट टेन शॉट अधिक मारले तो विजेता या नियमाचा आधार घेतला गेला आणि कोरियाने बाजी मारली तर  चौहान, सैनी व वर्माच्या टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

पुरुषांप्रमाणेच ज्योती सुरेखा वेन्नम, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांच्या संघानेही अंतिम फेरी गाठली. यादरम्यान फिलिपीन्स व तैवानसारख्या तगड्या संघांना त्यांनी मात दिली. अंतिम फेरीतही त्यांनी बलाढ्य कोरियाला दिलेली झुंज कौतुकास्पद होती पण, शेवटी 231- 228 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकच हाती लागले. मधुमिता व मुस्कान या शेवटी-शेवटी परफेक्ट टेन करु न शकल्याने ही सुवर्णसंधी हुकली. 

कम्पाउड संघाची ही कामगिरी वगळता रिकर्व आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या तिरंदाजांनी निराशा केली. पदकाची आशा असलेली दीपिका कुमारी पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेत ढेपाळली. अतानु दासनेही निराशा केली. 

त्यामुळे चार वर्षांपूर्वी धनुर्विद्येत आपली जी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्यपदकाची कमाई होती ती यावेळी फक्त दोन रौप्यपदकांपूरतीच मर्यादीत राहिली.

Web Title: Asian Games 2018: we lost golden chances in archery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.