बुलडाण्याची मुलगी खेळणार तिरंदाजी विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:10 AM2019-05-04T03:10:28+5:302019-05-04T03:11:18+5:30

प्रेरणावाट : मोनाली जाधव तिरंदाजी विश्वचषकासाठी भारतीय संघात

Archery World Cup to play Buldhana's girl | बुलडाण्याची मुलगी खेळणार तिरंदाजी विश्वचषक

बुलडाण्याची मुलगी खेळणार तिरंदाजी विश्वचषक

Next

किशोर बागडे 

नागपूर: मनगटात बळ असेल तर परिस्थितीवर मात करीत कर्तृत्व सिद्ध करता येते. गावकुसाबाहेर राहणाऱ्या बुलडाणा येथील मोनाली चंद्रहर्ष जाधव या २५ वर्षाच्या कन्येने स्वत:च्या कर्तृत्वाची गाथा स्वत: लिहिली. भारतीय तिरंदाजी संघात आलेली मोनाली ६ ते १२ मे या कालावधीत चीनमधील शांघाय येथे आयोजित तिरंदाजी विश्वचषकात देशासाठी पदक मिळविण्याच्या निर्धाराने खेळण्यास सज्ज आहे.
मोनाली ५० मीटर कम्पाऊंड वैयक्तिक व सांघिक गटात खेळेल. रोहतकच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव आणि तयारीत महिनाभर व्यस्त राहिल्यानंतर मोनाली भारतीय संघासोबत स्पर्धास्थळी रवाना झाली. मुळात अ‍ॅथलिट असलेली मोनाली दोन वर्षांआधी तिरंदाजीकडे वळली. पाहता- पाहता अ. भा. तिरंदाजी स्पर्धा व राष्ट्रीय सुवर्ण जिंकून तिने थेट भारतीय संघात स्थान पटकावले.

मोनाली बुलडाणा पोलीस दलात महिला शिपाई पदावर कार्यरत आहे. वडील चंद्रहर्ष मजुरी करायचे. मोनालीला मोठी बहीण आणि भाऊ आहे. २०१२ ला वडील अपघातात मरण पावले. त्यावेळी मोनाली १२ वी ला होती. मदतीला कुणी नसल्याने आईने शिवणकाम करीत तिन्ही मुलांना सांभाळले. १२ वीला मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेल्या मोनालीने कुटुंबाचा आधार बनण्यासाठी पोलीस दलात भरती व्हायचे ठरविले. शिकून मोठे अधिकारी व्हावे अशी तिची इच्छा आहे. पोलीस दलात सहभागी झाल्यानंतरही शिक्षणाकडे तिने पाठ फिरविलेली नाही. मुक्त विद्यापीठातून ती पदवीचे शिक्षण घेत आहे. बुलडाण्याच्या मुख्य वस्तीपासून दूर आनंदनगर भागात गावाबाहेर नातेवाईकांच्या जागेवर मोनालीचे टिनशेडवजा घर आहे. आई आणि भाऊ तेथे राहतात. आई रजनी चार घरचे कपडे शिवते, तर भावाने शिक्षण सोडून बहिणीच्या यशासाठी आॅटो चालविणे सुरू केले. मोनालीला मात्र तो ‘देशासाठी मोठी कामगिरी कर’ असा धीर देतो. रांची (झारखंड) येथे झालेल्या अ. भा.पोलीस क्रीडा स्पर्धेत मोनालीने दोन सुवर्ण व कांस्य जिंकले होते. या बळावर चीनमधील जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली. देशात तिरंदाजी क्रमवारीत सातत्याने स्थान पटकविल्याने मोनालीची विश्वचषकासाठी प्रथमच निवड झाली आहे.

पोलीस खात्याची पाठीवर थाप...
१४ वर्षे सेनादलात असलेले राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग हे २०१२ ला महाराष्ट्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले. त्यांनी मोनालीमधील जिद्द हेरली. नागपूर पोलीस अकादमीत बेसिकपासून धडे दिले. दोन वर्षांत मोनाली ५० मीटर कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्र पोलीस क्रीडा प्रमुख बाजीराव कळंत्रे, नागपूर पोलीस अकादमीचे प्रमुख आरपीआय भरतसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात मोनालीने घेतलेली भरारी अनेकांसाठी प्रेरणास्पद ठरली आहे.

वयाच्या १८ वर्षी मोनालीने वडिलांचे छत्र गमविल्यानंतर आईने आपल्यासाठी घेतलेल्या सर्व कष्टांची आठवण करत, मोनाली भावूक झाली. ‘लोकमत’शी संवाद साधताना तिने, ‘आता तू फक्त आराम कर,’ असे आईला सांगितले. वडिलांच्या निधनानंतर आईच्या पाठिंब्यावर आणि इलग सरांच्या तिरंदाजीचा प्रवास सुरू झाला. मोनाली देशासाठी पदक जिंकणार, असा विश्वास प्रशिक्षकाला वाटतो.

Web Title: Archery World Cup to play Buldhana's girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस